Friday, 19 August 2022

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत

विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी

 

शिवाजी विद्यापीठाचे दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र


कोल्हापूर, दि. १९ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून दुहेरी पदवी घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना केंद्र मानून त्यांची आवड, त्यांच्या क्षमता व कौशल्ये यांना पुरेपूर वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक सुधारणा, सुविधा प्रदान करण्याचा विचार करीत आहे. याचाच एक भाग म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांसाठी लागू आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकाच वेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत असे. मात्र आता दूरशिक्षणाच्या माध्यमातून एकाच वेळी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदविका/ पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा एक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अथवा पदविका आणि पदवी असे वेगवेगळे पर्याय शिक्षणासाठी उपलब्ध होतील.

पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाचीही निवड करता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगानुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर असणार नाही. हा निर्णय पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. मात्र, पीएचडी आणि एम.फिल. पदवीसाठी लागू होणार नाही.

यासाठीचे अन्य निकष पुढीलप्रमाणे-

·         हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून शिकू शकतो.

·         एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्ग उपस्थिती आणि दुसरा अभ्यासक्रम खुला (ओपन) अगर दूरशिक्षणातील अथवा ऑनलाईन स्वरुपातीलही असू शकतो.

·         दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईनही असू शकतात. किंवा दोन्ही खुले वा दूरशिक्षणातीलही असू शकतात.

No comments:

Post a Comment