Thursday, 4 August 2022

डॉ. कामत यांच्या समर्पितभावाचे कुलगुरूपद हे फलित: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचा सत्कार करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व शिक्षक.


कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती हे डॉ. रजनीश कामत यांनी उच्चशिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने केलेल्या कामाचे फलित आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रजनीश कामत यांची काल सायंकाळी डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा राजभवनकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे डॉ. कामत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. कामत यांची निवड ही शिवाजी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, संस्थेप्रती समर्पित भावनेतून काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी डॉ. कामत हे एक आहेत. अध्यापन आणि प्रशासन या दोहोंचे योग्य संतुलन सांभाळत त्यांनी विद्यापीठास बहुमोल योगदान दिले आहे. नॅकचे सर्वोत्कृष्ट मानांकन त्यांनी विद्यापीठाला मिळवून दिलेच, पण आपल्या अनुभवाचा लाभ संलग्नित महाविद्यालयांबरोबरच राज्यातील व देशातील विविध विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांनाही मिळवून दिलेला आहे. त्यांच्या रुपाने आता डॉ. होमी भाभा विद्यापीठाशीही शिवाजी विद्यापीठाचे नवे ऋणानुबंध व साहचर्य संबंध प्रस्थापित होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. कामत हे सृजनशील व्यक्तीमत्त्वाचे धनी आहेत. विद्यापीठ प्रशासनासमोर कोणतीही समस्या अथवा प्रश्न उभा ठाकला की त्यावर योग्य उपाय योजण्यासाठी सर्वप्रथम डॉ. कामत यांचेच नाव सामोरे येते. तेही प्रशासनाचा विश्वास सार्थ ठरवित संबंधित प्रश्न तडीस नेण्यासाठी अथक मेहनत घेतात. स्वतःला केवळ इलेक्ट्रॉनिक्स शाखेपुरते सिमीत न राखता त्यांनी ज्ञानाच्या विविध शाखांशी स्वतःला जोडून घेतले. नवनवे ज्ञान मिळवित राहण्याची त्यांना आस आहे. त्यासाठी आवश्यक सकारात्मक मानसिकता त्यांच्याकडे आहे. ज्ञाननिर्मितीसाठी सजगता आणि नेतृत्वगुण ही त्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या बळावर ते आपली नवी कारकीर्द निश्चितपणे यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाचा आपल्या या यशात मोलाचा वाटा असल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. कामत यांनी सांगितले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा माझ्या रक्तातच आहे. कागल येथील माझे आजोबा शाहू महाराजांचे डॉक्टर होते. त्यांचे बाबासाहेबांशीही स्नेहाचे संबंध होते. हा वैचारिक वारसा जोपासतच आजवरची वाटचाल केलेली आहे. यापुढेही करत राहणार आहे. बी.एस. भणगे यांच्यापासून आजतागायत मला नऊ कुलगुरूंसमवेत काम करण्याची संधी लाभली. त्या सर्वांनी मला माझ्या गुणदोषांसह स्वीकारले आणि विद्यापीठासाठी काम करण्याची संधी दिली. त्यांच्या कार्यपद्धतीचा माझ्यावर प्रभाव आहे. आपल्या क्षमता आणि मर्यादांसह नव्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा निश्चित प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. कामत यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, गजानन पळसे, डॉ. आलोक जत्राटकर, आशिष घाटे, अनुष्का कदम आणि अभिजीत रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment