Friday, 12 August 2022

डॉ. उत्तम सकट यांचे लेखन सामाजिक बांधिलकीने प्रेरित: डॉ. शरद गायकवाड

 

डॉ. उत्तम सकट यांच्या ग्रंथाचे गुरूवारी प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. गिरीष मोरे, डॉ. एस.एन. पवार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सकट, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.


अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि मातंग समाज ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: डॉ. उत्तम सकट यांचे संशोधन व लेखन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रेरित झालेले आहे. त्यातून साकारलेला ग्रंथ समाजास दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांनी काल सायंकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. उत्तम सकट यांच्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि मातंग समाज या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात झाले. या प्रकाशन समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. एस.एन. पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शरद गायकवाड म्हणाले, डॉ. सकट यांच्या सामाजिक चिंतनातून सदर अभ्यासपूर्ण लेखन साकारले आहे. पाऊण कोटी लोकसंख्या असणाऱ्या मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यातून मातंग समाजाला झालेले लाभ, समाजाची नेमकी झालेली प्रगती याचा संशोधनपर वेध या ग्रंथातून घेतला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लिहीलेला हा ग्रंथ समाजास आणि महामंडळासही दिशादर्शक स्वरुपाचा आहे. भूतकाळ वर्तमान यांचे वास्तव स्वीकारून महामंडळाच्या सद्यस्थितीला नवीन दिशा देण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ग्रंथाचे भाष्यकार डॉ. गिरीश मोरे म्हणाले, डॉ. सकट यांनी सदर ग्रंथलेखनाच्या माध्यमातून सामाजिक चिंतन करून समाजाचे देणे पार पाडले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यासाठी लाभत असणारे प्रोत्साहनही अत्यंत मोलाचे आहे, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, डॉ. सकट यांनी या विषयावर पीएच.डी. करून ग्रंथ प्रकाशित केल्यामुळे महामंडळ आणि मातंग समाज यांच्यापुढे आदर्शवत स्वरुपाचे कार्य साकारले आहे. तळागाळातील समाजघटकांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या महामंडळांचा अभ्यास विद्यापीठांमधून होतो आहे, याचे समाधान आहेच, पण त्याचबरोबर अशा महामंडळांच्या योगदानाचा तुलनात्मक अभ्यासही होणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर सुश्मिता खुटाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. दीपक भोसले, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह डॉ. सकट यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment