शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठातापदी नियुक्तीचे पत्र डॉ. एम.एस. देशमुख यांना प्रदान प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी. |
कोल्हापूर, दि. १८ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या
मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख यांची आणि क्रीडा व शारीरिक
शिक्षण संचालकपदी डॉ. शरद बनसोडे यांची निवड आज घोषित करण्यात आली. विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज या दोघांना नियुक्तीपत्रे प्रदान
करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी तसेच
क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पदासाठी गेल्या आठवड्यात मुलाखती घेण्यात आल्या.
आज त्यांची निवड घोषित करण्यात येऊन नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, डॉ.
पी.डी. राऊत, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, संगणक विभागाचे प्रभारी संचालक अभिजीत
रेडेकर, सहाय्यक कुलसचिव सुनीता यादव आदी उपस्थित होते.
मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्त करण्यात आलेले डॉ. महादेव
श्रीरंग तथा एम.एस. देशमुख हे सध्या विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे
संचालक तसेच इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस कक्षाचे प्रभारी संचालक म्हणूनही
कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळासह अधिसभेवर
देखील त्यांनी कार्य केले आहे. विद्यापीठाच्या तसेच शासनाच्या विविध समित्यांवर
त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून
त्यांचे ५३ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. २१ पुस्तकांचे ते लेखक आहेत. गेली २५
वर्षे ते अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या हाताखाली सहा संशोधकांनी
पीएच.डी. तर एकाने एम.फील. केली आहे. पाच संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले
आहे. सुमारे ८६ लाख रुपयांच्या कन्सल्टन्सी प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. दोन
आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांच्या संपादक मंडळावर ते सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठ
अर्थशास्त्र संघटनेचा डॉ. धनंजयराव गाडगीळ पुरस्कार, नवी दिल्ली येथील शैक्षणिक
संघटनेकडून राधाकृष्ण सुवर्णपदक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.Dr. M.S. Deshmukh
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे नूतन संचालक डॉ. शरद बनसोडे हे
वीस वर्षांहून अधिक काळ देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक
शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः
बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी बजावली आहे.
शारीरिक शिक्षण या विषयात ते सेट परीक्षा उत्तीर्ण असून पीएच.डी.ही प्राप्त केली
आहे. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल
फेडरेशनचे ते गेली १५ वर्षे इंटरनॅशनल इलाईट रेफ्री आहेत. बास्केटबॉल, फुटबॉल आणि
हँडबॉल या तिन्ही खेळांमध्ये दहा वर्षे त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व
केले आहे. एकाच वर्षात या तिन्ही खेळांत सहभागी होण्याचा विक्रमही त्यांनी
नोंदविला आहे. त्यांनी सुमारे ७५ राज्यस्तरी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
बास्केटबॉल स्पर्धांत सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये २७ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा
सहभाग आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून त्यांचे १८ शोधनिबंध
प्रकाशित आहेत. त्याखेरीज त्यांनी २२ राष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदांतून
सहभाग घेतला आहे, तर १६ परिषदांत विषयतज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. शिवाजी
विद्यापीठासह देशातील विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांच्यासाठी त्यांनी संघ
निवड समिती सदस्य, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.Dr. Sharad Bansode
No comments:
Post a Comment