Tuesday 30 August 2022

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर

कडक कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे निर्देश

 

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना निवेदन सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व उपकुलसचिव निवास माने.


कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती तसेच अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी आज येथे दिले.

शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने काही अज्ञात समाजकंटकांनी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील परिपत्रकात फेरफार करून दि. २३ ऑगस्ट रोजीचा एम.एस्सी.चा फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर रद्द केल्याचे समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केले. तसेच, एका वृत्तपत्रातील बातमीही अशाच प्रकारे फेरफार करून समाजमाध्यमांतून व्हायरल केली. यामुळे परीक्षार्थींसह महाविद्यालये, प्राचार्य आदी घटकांत मोठा संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला ऐन परीक्षेच्या कालखंडात मोठी धावपळ करावी लागली. शिवाजी विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षाविषयक गंभीर, गोपनीय आणि अतिमहत्त्वाच्या कामाविषयी समाजात चुकीचा संदेश जाण्याबरोबरच विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेडरहेड यांचाही गैरवापर केल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्ययावत सायबर सेलमार्फत चौकशी करून समाजातील या विकृत मनोवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने दोषी व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज शिवाजी विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बलकवडे यांना आज प्रत्यक्ष भेटून दिले. त्यांच्यासमवेत परीक्षा विभागाचे उपकुलसचिव निवास माने होते.

शैक्षणिक क्षेत्रासह शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा आणणाऱ्या या गंभीर प्रकाराची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल आणि अशा समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. बलकवडे यांनी दिली. संबंधितांना या संदर्भातील कारवाई तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

माहितीची शहानिशा करण्याचे परीक्षा संचालकांचे आवाहन

विद्यार्थी तसेच सर्व संबंधित घटकांनीही अशा समाजमाध्यमांद्वारे व्हायरल होणाऱ्या बाबींवर पटकन विश्वास न ठेवता आपापले महाविद्यालय तसेच विद्यापीठ प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्याची शहानिशा करावी. असे प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास ते व्हायरल करण्याऐवजी ते तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणावे, म्हणजे अफवा पसरण्यास आपला हातभार लागणार नाही. तसेच संबंधित गैरप्रकारांना आपोआपच आळाही घातला जाईल, असे आवाहन या पार्श्वभूमीवर परीक्षा संचालक डॉ. जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment