Monday 15 August 2022

स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला ‘शिव-वाणी’च्या माध्यमातून उजाळा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वाणी' या युट्यूब ध्वनी-वाहिनीचे कळ दाबून लोकार्पण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव संजय कुबल.
 
शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वाणी' युट्यूब ध्वनी-वाहिनीच्या लोकार्पण प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत उपस्थित अधिकारी.



कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठ शिव-वाणी या वाहिनीचे लोकार्पण करीत आहे. या माध्यमातून अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना!’ या ध्वनी-मालिकेस प्रारंभ करण्यात येतो आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला उजाळा देण्याच्या विद्यापीठाच्या या प्रयत्नाचे निश्चितपणे स्वागत होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाच्या शिव-वाणी या युट्यूबवरील ध्वनी वाहिनीचे लोकार्पण आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यावर आधारित ध्वनीमालिका निर्माण करण्याची कल्पना सुचली. अवघ्या आठवडाभरात जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी शिव-वाणी या युट्यूब ध्वनी-वाहिनीच्या रुपाने तिला प्रत्यक्षात आणले, ही अभिनंदनीय बाब आहे. विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनिश पाटील आणि त्यांचे सहकारी तसेच सुस्मिता खुटाळे यांनीही अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना!’ ही ध्वनी-मालिका प्रत्यक्षात येण्यासाठी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. या सर्व घटकांच्या प्रयत्नातून ही मालिका प्रसारित होत आहे. शिवाजी विद्यापीठाने या तमाम स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला केलेले हे कृतज्ञ अभिवादन आहे. या प्रयत्नाचे सर्व घटकांतून स्वागत होईल.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी शिव-वाणी युट्यूब ध्वनी-वाहिनी आणि अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संगणकाची कळ दाबून शिव-वाणीचे लोकार्पण केले. यावेळी शिव-वाणीवरुन थेट सादर होत असलेल्या अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या मालिकेच्या पहिल्या भागाचे सामूहिक श्रवण सर्व उपस्थितांनी केले. शिरोळचे स्वातंत्र्यसैनिक दत्ताजीराव जाधव यांच्या कार्याची माहिती या भागात देण्यात आली. दररोज सकाळी ९ वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे.

या लोकार्पण प्रसंगी कुलगुरू ड़ॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीमती एस.एच. ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, आजीवन अध्ययन विकास केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी.बी. सुतार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, उपकुलसचिव संजय कुबल, माणिक कदम, डॉ. पी.एस. पांडव, रणजीत यादव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment