शिवाजी विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सवांतर्गत विशेष स्वराज्य रॅली कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. |
शिवाजी विद्यापीठात स्वराज्य महोत्सवांतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासमवेत विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित सामूहिक राष्ट्रगीत गायनामध्ये सहभागी झालेले राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
कोल्हापूर, दि. १७
ऑगस्ट: स्वातंत्र्याचा
अमृतमहोत्सव आणि स्वराज्य महोत्सव या निमित्ताने आज शिवाजी विद्यापीठात विशेष स्वराज्य रॅलीसह सामूहिक
राष्ट्रगीत गायन उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा या उपक्रमात सहभाग राहिला.
आजादी का अमृतमहोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव आणि स्वराज्य महोत्सव
अशा संयुक्त निमित्ताने विद्यापीठातर्फे अनेकविध उपक्रमांचे गेल्या पंधरवड्यात
आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना सर्वच घटकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्वराज्य महोत्सवाच्या
अंतिम पर्वामध्ये आज सकाळी १० वाजता विशेष स्वराज्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड रिसर्च अर्थात सायबर संस्थेपासून या
रॅलीस प्रारंभ झाला. चिखली येथील आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी
स्वराज्य ज्योत घेऊन रॅलीत सहभागी झाले. ही रॅली विद्यापीठाच्या एनसीसी भवन येथील द्वार
क्रमांक ८ येथे येऊन तेथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा पूर्ण
करून मुख्य प्रशासकीय भवनापासून राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात रॅलीचे आगमन झाले. संपूर्ण
रॅलीदरम्यान सहभागी विद्यार्थी राष्ट्रभक्तीपर घोषणा देत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीपर
गीतेही वाजविण्यात येत होती. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या नेतृत्वाखाली रॅली
संपन्न झाली.
राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात रॅलीचे रुपांतर सभेत होऊन सकाळी ठीक ११ वाजता
सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन,
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये
यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांचे समन्वयक, प्राचार्य, विद्यापीठातील
विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय सेवा
योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि संगीत व
नाट्यशास्त्र अधिविभाग यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
दरम्यान, आज दुपारी राष्ट्रीय सेवा योजना आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
No comments:
Post a Comment