कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्यासाठी कष्टाचा पै न् पै साठवून ३५ लाख
रुपयांची बचत तिच्या अकाली निधनानंतर शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करणाऱ्या
मारुलकर दांपत्याच्या दातृत्वाचा सन्मान करीत अवघ्या १५ दिवसांत शिवाजी
विद्यापीठाने या दांपत्याच्याच हस्ते अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ
उभारावयाच्या शिवाजी विद्यापीठ हीरकमहोत्सवी संशोधक विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाचे आज भूमिपूजन केले. विशेष
म्हणजे पंडित मारुलकर आणि रजनी मारुलकर या दांपत्याच्याच हस्ते हे भूमिपूजन करून
या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला.
अस्मिता मारुलकर या आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्याची तरतूद म्हणून रजनी व पंडित
मारुलकर या दांपत्याने सुमारे ३५ लाख रुपयांची बचत केलेली होती. तथापि, तिच्या
अकाली निधनानंतर अस्मिताचाच अधिकार असलेला हा निधी स्वतःसाठी न वापरता समाजासाठी
वापरण्याचा निर्णय या ज्येष्ठ दांपत्याने घेतला आणि शिवाजी विद्यापीठाकडे गेल्या
१५ ऑगस्ट रोजी ३५ लाखांचा हा निधी सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी
या निधीमधून संशोधक विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभे करेल आणि त्याच्या
कोनशिलेवर अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ असा उल्लेख केला जाईल, याची ग्वाही
दिली.
यानंतर आज अवघ्या १५
दिवसांत ‘कमवा व शिका’ विद्यार्थिनी वसतिगृहाशेजारीच या संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मारुलकर
दांपत्याच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. भूमीपूजनासाठीची पहिली कुदळ
मारण्याचा मानही पंडित मारुलकर यांना देण्यात आला. मारुलकर दांपत्यांनी खास या
प्रसंगासाठी भूमीला अर्पण करण्यासाठी स्वतःच्या बागेतील फुले आणली होती. तीही या प्रसंगी
वाहण्यात आली. त्यांच्यानंतर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांनी भूमीपूजन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित
चौगुले यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनीही भूमीपूजन कार्यक्रमात
सहभाग घेतला.
यावेळी कुलगुरू डॉ.
शिर्के यांनी या निधीबद्दल मारुलकर दांपत्याचे पुनश्च एकदा आभार मानले.
त्याचप्रमाणे, सदर वसतिगृहाचे काम गतीने सुरू होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचा
सकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत असल्याचे सांगितले. हे काम पूर्ण करण्याचा
विद्यापीठाचा प्रयत्न राहील, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. श्री. मारुलकर
यांनीही सद्गदित अंतःकरणाने विद्यापीठ प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद दिले.
No comments:
Post a Comment