Tuesday, 29 September 2026

कविता ही समाजाच्या जगण्याचे प्रतिबिंब: वसंत आबाजी डहाके

प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

 

शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार प्रभा गणोरकर यांना प्रदान करताना डॉ. राजन गवस आणि वसंत आबाजी डहाके. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार विजेते रवी कोरडे आणि आदित्य काळसेकर.

शिवाजी विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, प्रभा गणोरकर, डॉ. राजन गवस, रवी कोरडे व आदित्य काळसेकर.

शिवाजी विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २९ सप्टेंबर: कविता ही केवळ व्यक्तीगत नसते, तर तिच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवाचे अनेक पदर सामावलेले असतात. आजच्या मराठी कवितेत विस्थापन, बदलती कृषी संस्कृती, पर्यावरणाचा ऱ्हास, स्त्रीचे अस्तित्व आणि मानवी जगण्यातील संघर्ष यांचे संवेदनशील प्रतिबिंब उमटत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२६ च्या काळसेकर पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस अध्यक्षस्थानी होते, तर आदित्य काळसेकर प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे २०२६ सालचे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार हे अनुक्रमे ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर आणि कवी रवी कोरडे यांना प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप अनुक्रमे २१ हजार रुपये व १० हजार रुपये आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह असे आहे.

यावेळी कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठाशी असलेल्या आपल्या दीर्घकाळच्या ऋणानुबंधांना उजाळा देताना डहाके यांनी गोविंद पानसरे, डॉ. चंद्रशेखर जहागीरदार तसेच साहित्यिक मित्र सतीश काळसेकर आणि प्रकाश विश्वासराव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रभा गणोरकर यांच्या कवितेविषयी बोलताना डहाके यांनी त्यांच्या दीर्घ साहित्यिक सहप्रवासाच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, त्यांच्या कवितेत स्त्रीजीवन, मानवी अस्तित्व, प्रेम, पर्यावरण आणि सामाजिक वास्तवाचे विविध पैलू व्यक्त होत असून, व्यक्तिगत अनुभवांच्या पलीकडे जाऊन अनेक स्त्रियांचे जगणे त्यात सामावले आहे. त्यांच्या कवितेतील ‘झाड’ आणि ‘प्रवास’ हे महत्त्वाचे आदिबंध असून सर्जनाची प्रेरणा आणि नष्ट होण्याची जाणीव यांचा संघर्षही त्यांच्या कवितेत दिसतो, असे त्यांनी सांगितले.

स्त्रियांनी लिहिलेली कविता व्यक्तिगत आहे की सामाजिक, हा भेदच कृत्रिम असल्याचे सांगत डहाके म्हणाले की, “प्रत्येक कवीची कविता एकाच वेळी व्यक्तिगत आणि सामाजिक असते.” प्रेमाचा कवीही समाजाविषयी तितक्याच तीव्रतेने लिहू शकतो, कारण प्रेमातूनच जगाचा कळवळा आणि अन्यायाविषयीची संवेदना निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डहाके म्हणाले, रवी कोरडे यांच्या कवितेची मुळे ग्रामीण जीवन, जमीन आणि कृषी संस्कृतीत रुजलेली आहेत. विकासाच्या प्रक्रियेत शेतजमिनी जाणे, जंगलांचा ऱ्हास, गावांचे विस्थापन आणि पर्यावरणाचे प्रश्न यांचे प्रभावी प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटते. त्यामुळे आजच्या मराठी कवितेतील नवी पिढी ही ‘विस्थापितांची पिढी’ असल्याचे सांगत डहाके यांनी कोरडे यांच्या कवितेतील संवेदनशीलता, चित्रमयता आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या मानवी जिद्दीचे विशेष कौतुक केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. राजन गवस म्हणाले, काळसेकर पुरस्कार हा मराठीतील महत्त्वाच्या कवींच्या सन्मानाची आणि साहित्यपरंपरेच्या जतनाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. प्रभा गणोरकर यांनी कविता आणि समीक्षा या दोन्ही क्षेत्रांत मूल्यनिष्ठ, निर्भीड आणि संवेदनशील लेखनातून मराठी साहित्यविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या साहित्याने स्त्रीजीवनातील अनुभवांना व्यापक सामाजिक संदर्भ दिला असून, त्यांच्या समीक्षेनेही मराठी साहित्याला आत्मपरीक्षणाची दृष्टी दिली आहे. तर, रवी कोरडे यांच्या कवितेत कृषी संस्कृती, ग्रामीण जीवन आणि मातीशी असलेले नाते वेगळ्या जाणिवेने व्यक्त झाले असून, रूढ ग्रामीण कवितेच्या वाटा न स्वीकारता त्यांनी स्वतःचा स्वतंत्र काव्यस्वर निर्माण केला आहे. गणोरकर आणि कोरडे यांच्या साहित्यामुळे मराठी कविता आणि साहित्यविश्व अधिक समृद्ध होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी प्रभा गणोरकर आणि रवी कोरडे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कविता ननावरे आणि प्रांजली क्षीरसागर यांनी त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. अवनीश पाटील, सुधीर पोटे, काळसेकर कुटुंबिय यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

Tuesday, 22 September 2026

फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांकडून

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाबाबत जनजागृती

साक्षी वाघमोडेच्या रीलची कोल्हापूर पोलिसांकडून दखल

साक्षी वाघमोडे या विद्यार्थिनीचा हा रील


साक्षी वाघमोडे
 

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: डॉल्बीमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नांना साथ देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभागानेही आपला वाटा उचलला आहे. याअंतर्गत विभागाची विद्यार्थिनी साक्षी वाघमोडे हिने तयार केलेल्या जनजागृतीपर रीलची जिल्हा पोलिसांनी दखल घेत ती आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केली आहे.

गणेशोत्सवातील डॉल्बीचा दणदणाट आणि त्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळावे, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या रीलमधून डॉल्बीला टाळून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. या जनजागृतीपर रीलच्या स्क्रिप्टचे लेखन बी.ए. फिल्म मेकिंग कोर्सचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि शिक्षक अनुप जत्राटकर यांनी केले. अवधूत चव्हाण याने संकलन केले. विद्यार्थ्यांनी फिल्म मेकिंगच्या अभ्यासक्रमातून आत्मसात केलेल्या दृक्-श्राव्य कौशल्याचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आशयगर्भ रीलची कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने दखल घेत आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून तिचा प्रसार केला. https://www.instagram.com/reel/Dci_SN3jYEL/?igsi=MXd4cTBpN2JzaWV1Nw== अशी या रीलची लिंक आहे. ‘गणेशोत्सवाचा उत्साह असू द्या… पण डॉल्बीचा दणदणाट नको!’ या संदेशातून ध्वनीप्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन या रीलमधून करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल विभागाचे अभिनंदन केले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन



कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक व शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू ज्योती जाधव यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्येही कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, गणित अधिविभागाचे प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. मीना पोतदार, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. सुधीर पोवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 21 September 2026

ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास भेट

शैक्षणिक व संशोधकीय सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा

दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील कॅम्पसचे कुलगुरू डॉ. अमित चाकमा,  त्यांच्या सहकारी डॉ. केलिथा चेरियन यांनी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील कॅम्पसचे कुलगुरू डॉ. अमित चाकमा,  त्यांच्या सहकारी डॉ. केलिथा चेरियन यांनी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या क्रीडा व कुस्ती संकुलास भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील कॅम्पसचे कुलगुरू डॉ. अमित चाकमा,  त्यांच्या सहकारी डॉ. केलिथा चेरियन यांनी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या जलसंवर्धन कार्याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.




कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: ऑस्ट्रेलियातील द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) च्या भारतातील शाखेने, म्हणजेच यू.डब्ल्यू.ए. (इंडिया) येथील कुलगुरू प्रा. अमित चाकमा यांनी आज शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शिवाजी विद्यापीठासोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन तसेच नव्या ज्ञानक्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यता यावेळी चर्चेत आल्या.

दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या विद्यापीठाने अंधेरी (मुंबई) येथे भारतातील पहिला कॅम्पस सुरू केला असून त्या कॅम्पसचे डॉ. चाकमा हे कुलगुरू आहेत. त्यांच्यासह विद्यापीठाच्या अकादमिक व धोरणात्मक सहकार्य व्यवस्थापक डॉ. केलिथा चेरियन यांनीही शिवाजी विद्यापीठास आज सकाळी भेट दिली. कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

कुलगुरू डॉ. चाकमा यांनी सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध सुविधा पाहण्यात मोठा रस दाखविला. विद्यापीठातील विविध अधिविभाग, संशोधन सुविधा, क्रीडा सुविधा यांसह विद्यापीठ परिसरातील जैवविविधता, विद्यापीठाने केलेले जलसंवर्धन इत्यादी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नजीकच्या कालखंडात शिवाजी विद्यापीठासमवेत निश्चितपणाने शैक्षणिक व संशोधकीय बंध निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

कुलगुरू डॉ. कामत यांनीही त्यांच्या भेटीविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, या भेटीमुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्ससारख्या भविष्यवेधी क्षेत्रांतील उपक्रम यांसाठी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधकांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या भेटीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे हेही उपस्थित होते.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविषयी थोडक्यात...

द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे जगातील आघाडीच्या शंभर विद्यापीठांपैकी एक असून क्यूएस-२०२६ क्रमवारीत ७७ व्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित 'ग्रुप ऑफ एट' (Go8) संशोधन विद्यापीठांपैकी ते एक आहे. भारतात कॅम्पस सुरू करणारे ते पहिले ‘Go8’ विद्यापीठ आहे. त्यांचे १३ विषय जगातील अव्वल ५० मध्ये गणले जातात. यूडब्ल्यूए-इंडियाचे कॅम्पस अंधेरी (मुंबई) आणि चेन्नई येथे आहेत. मुंबई कॅम्पससाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मंजुरीचे पत्र मिळाले असून चेन्नई कॅम्पसच्या मंजुरीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

यूडब्ल्यूए-इंडियाकडून कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, बिझनेस मॅनेजमेंट, ग्लोबल बिझनेस, एंटरप्राइज अँड इनोव्हेशन हे पदवी अभ्यासक्रम, तसेच एमबीए आणि मास्टर ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी आणि उद्योगजगताशी जोडलेले शिक्षण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

 

Tuesday, 15 September 2026

विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेला प्रतिसाद

संशोधन पोस्टर व टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धाही उत्साहात



शिवाजी विद्यापीठात आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.


कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याबरोबरच पर्यावरणविषयक संशोधन, सर्जनशीलता आणि शाश्वत विचारांना चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेसह जागतिक ओझोन दिनानिमित्त संशोधन पोस्टर स्पर्धा आणि टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या वतीने भारतीय वातानुकूलन, उष्मा व शीतकरण अभियंता संस्था (ISHRAE) व आरएएसएसएस (RASSS) यांच्या सहकार्याने आणि शाश्वतता मंडळाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. ११) आयोजित गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत कागदाचा लगदा व माती यांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कलाकार श्रद्धा शशिकांत पोंबुर्लेकर आणि स्वतंत्र व्यावसायिक कलाकार योगेश अरुण साटम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ५५ पेक्षा अधिक विद्यापीठाबाहेरील सहभागींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जागतिक ओझोन दिनानिमित्त ‘पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावर संशोधन पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय आव्हाने, संशोधन व नाविन्यपूर्ण उपाययोजना पोस्टरच्या माध्यमातून मांडल्या. तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून उपयुक्त व सर्जनशील वस्तू तयार करण्याची स्पर्धाही घेण्यात आली. संशोधन पोस्टर स्पर्धेसाठी डॉ. सुषमा पाटील व डॉ. चैताली बगाडे, तर टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धेसाठी डॉ. दीप्ती एन. कुर्‍हे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कराड येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पुष्पलता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कार्यशाळा व स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थी व सहभागींचे कौतुक केले. बदलत्या हवामानासह पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक व शाश्वत उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांच्या आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, डॉ. सोनल चोंदे, डॉ. पल्लवी भोसले आणि डॉ. स्मिता पोरे यांनी नियोजन केले. संशोधन विद्यार्थी हसन म्हणा, गौरी पवार, अमृता सूर्यवंशी तसेच पदव्युत्तर भाग-१ व भाग-२च्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Friday, 11 September 2026

संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठात ‘विचारशलाका’ विशेषांकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात संत तुकाराम व कबीर यांच्याविषयी 'विचारशलाका' विशेषांकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. भारती पाटील आणि डॉ. प्रकाश पवार.


कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या विचारांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विचारशलाका’ त्रैमासिकाच्या ‘संत तुकाराम व संत कबीर विचारविश्व विशेषांका’च्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते. यावेळी ‘विचारशलाका’चे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुलगुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. कामत यांनी संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्याचे तसेच त्यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाचे महत्त्व स्पष्ट करताना ‘विचारशलाका’च्या माध्यमातून वैचारिक साहित्याची निर्मिती व प्रसार करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. संत तुकाराम आणि कबीर यांनी समाजातील रूढी, विषमता आणि कर्मकांडावर प्रखर प्रहार करत समता, बंधुता आणि मानवतावादी मूल्यांची मांडणी केली. त्यांच्या साहित्याचा आणि सामाजिक विचारांचा आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेतही मोठा संदर्भ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी संत तुकाराम आणि कबीर यांच्या साहित्याचा समाजजीवनावर पडलेला प्रभाव विषद केला. या दोन्ही संतांची वैचारिक व सैद्धांतिक मांडणी स्पष्ट करताना त्यांनी त्यांच्या विचारांमधील सामाजिक समतेचा आग्रह अधोरेखित केला. तसेच सूफी परंपरा आणि वारकरी परंपरेच्या संदर्भात कबीर आणि तुकाराम यांचे महत्त्वही स्पष्ट केले.

डॉ. नंदकुमार मोरे यांनी संत तुकाराम आणि कबीर यांनी लोकभाषेच्या माध्यमातून व्यापक समाजाशी साधलेला संवाद हा त्यांच्या साहित्याच्या प्रभावाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.

प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी ‘विचारशलाका’च्या प्रवासाची माहिती दिली. तसेच, समाजात चिकित्सक आणि विवेकशील विचारांची निर्मिती करण्यासाठी वैचारिक साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.

Monday, 7 September 2026

शिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!

(फोटोफीचर)

श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला की त्याबरोबर रानपुष्प बहराला सुरवात होते. सातारा जिल्ह्यातील कास पठार हे खास त्याच्या अशा पुष्पवैभवासाठी ओळखले जाते. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातही याच वेळेला विविध रानफुलांच्या बहराला सुरवात होत असते. यंदाही अशी अनेक रानफुले विद्यापीठाच्या परिसरात बहरली आहेत. त्यातीलच काही फुलांचे हे देखणे, चित्ताकर्षक दर्शन... 

(सर्व छायाचित्रे: डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)