Wednesday, 12 August 2026

वारसा लष्करी इतिहासाचा; प्रेरक अन् अभिमानाचा!

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सुरेखा अडके, डॉ. सावळीराम घाणे, डॉ. कबीर खराडे आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि अन्य अधिकारी.


(उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचा इतिहास, जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात आज दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या दोनदिवसीय प्रदर्शनास प्रारंभ झाला. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे प्रृकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सुरू असलेल्या या प्रदर्शनात सन १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि कारगील इत्यादी युद्धांमधील अत्यंत दुर्मिळ अशा ३५० छायाचित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलांचा गौरवशाली इतिहास, विविध युद्धांतील पराक्रम तसेच देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांनी दिलेल्या योगदानाची माहिती करून देण्यात आली.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरात भारतीय लष्करी इतिहासाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, नकाशे, ऐतिहासिक दस्तऐवज यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनातून भारतीय जवानांचे शौर्य, युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी आणि लष्करी रणनीती यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आली. लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांच्यासह नितीन शास्त्री आणि जे.आर. भट यांनी उपस्थितांना त्यांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता देशाचा इतिहास, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रसेवेची मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी अभिमान, कर्तव्यभावना आणि राष्ट्रनिष्ठा दृढ होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांनी भारतीय लष्करी इतिहासातील विविध घटनांमधून सैनिकांचे शौर्य, नेतृत्व, शिस्त आणि त्याग यांची माहिती दिली. युद्धातील विजयामागे केवळ शस्त्रसामर्थ्य नसून नियोजन, नेतृत्व, धैर्य, शिस्त आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना महत्त्वाची असते, याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, सुरेखा अडके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरचे प्रदर्शन उद्या, गुरूवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त संख्येने ही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी लष्करी अधिकाऱ्यांनी जागविल्या युद्धाच्या आठवणी

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आणखी एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात माजी लष्करी अधिकारी आणि अभ्यासकांनी विविध भारतीय युद्धांच्या स्मृतींना उजाळा दिला. लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांनी १९६५ च्या युद्धातील असल उत्तरची लढाई आणि १९७१च्या युद्धातील बसांतर याविषयी विद्यार्थ्यांनी अतिशय रोमहर्षक शब्दांत सादरीकरणासह माहिती दिली. तसेच, नितीन शास्त्री यांनी १९६२ चे युद्ध आणि १९६५ च्या युद्धाची पार्श्वभूमी या विषयावर तर, जे.आर. भट यांनी १९६५ मधील सर्जिकल स्ट्राईक (पेशावरवरील बॉम्बहल्ला) याविषयी सविस्तर माहिती दिली. 

No comments:

Post a Comment