Wednesday, 12 August 2026

भारत-चीन संबंधांमध्ये आर्थिक हितसंबंधांसोबत

सुरक्षाविषयक सावधगिरी आवश्यक: डॉ. अशोक चौसाळकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर डॉ. श्रीराम पवार, बाळ पाटणकर, नायब सुभेदारडी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. 

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: भारत आणि चीन हे आशियातील दोन प्राचीन संस्कृती असलेले आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे देश आहेत. मात्र, सीमावाद, चीन-पाकिस्तानची वाढती जवळीक, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे वर्चस्व आणि भारत-अमेरिका संबंध यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामुळे चीनसोबत आर्थिक संबंध वाढवत असतानाच भारताने सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने सावध राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभाग आणि एक्स सर्व्हिसेस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भारताचे सुरक्षा धोरण आणि भारत-चीन संबंध’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार-संपादक डॉ. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. बाळ पाटणकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर यांनी भारत-चीन संबंधांचा ऐतिहासिक आढावा घेताना या संबंधांचे चार प्रमुख टप्पे स्पष्ट केले. १९४९ ते १९६२ या काळातील ‘हिंदी-चीनी भाई भाई’पासून १९६२च्या युद्धापर्यंतच्या घडामोडी, त्यानंतरचा दीर्घकाळातील तणाव, १९९०च्या दशकानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली तुलनेने अनुकूल परिस्थिती आणि त्यानंतर चीनच्या बदललेल्या आक्रमक धोरणापर्यंतच्या प्रवासाचे त्यांनी विश्लेषण केले. ते म्हणाले, १९६२च्या युद्धाच्या संदर्भात भारताकडे लष्करी सामर्थ्याची कमतरता होती, हा समज पूर्णपणे योग्य नाही. त्या वेळी भारताकडे मोठ्या प्रमाणात सैन्य, रणगाडे आणि सक्षम हवाई साधने होती; मात्र नेतृत्वातील मतभेद आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे उपलब्ध सामर्थ्याचा प्रभावी वापर होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले. या युद्धानंतर चीनने अक्साई चीनचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनच्या बदलत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याकडे लक्ष वेधताना डॉ. चौसाळकर म्हणाले, आर्थिक सुधारणांनंतर चीनने विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच लष्करी आधुनिकीकरणामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आजचा चीन हा केवळ आर्थिक महासत्ता नसून तंत्रज्ञान आणि लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनेही प्रभावशाली शक्ती बनला आहे.

गलवाननंतर अविश्वासाचे वातावरण

भारत-चीन संबंधांतील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. चौसाळकर यांनी, २०२०च्या गलवान संघर्षाचा विशेष उल्लेख केला. या घटनेनंतर दोन्ही देशांनी सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून परस्परांमधील विश्वासाचे संकट कायम असल्याचे त्यांनी सांगितले. चीनचे धोरण अनेकदा अनपेक्षित स्वरूपाचे राहिले आहे. त्यामुळे भारताने चीनच्या धोरणाचा अभ्यास करताना त्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षमतेचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-चीन संघर्षातील प्रमुख मुद्द्यांवर भाष्य करताना चौसाळकर यांनी लडाखमधील सीमावाद आणि अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा हे दोन महत्त्वाचे प्रश्न असून मॅकमोहन रेषा, अक्साई चीन आणि तवांग या संदर्भातील चीनची भूमिका दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने तणाव निर्माण करणारी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीन-पाकिस्तान संबंध भारतासाठी महत्त्वाचा सुरक्षाविषयक घटक

चीन-पाकिस्तान संबंध हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यामध्ये चीनची भूमिका मोठी असून चीन-पाकिस्तान आर्थिक आणि सामरिक सहकार्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होतो. त्याचबरोबर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील पाकिस्तानमार्गे जाणारा प्रकल्प आणि त्यातील भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित प्रश्नही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताने क्वाडसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांमध्ये सहभाग घेतल्याने चीनच्या दृष्टीने भारताची सामरिक भूमिका अधिक महत्त्वाची ठरली आहे. दुसरीकडे, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेसारख्या व्यासपीठांवर भारत आणि चीन एकत्र कार्य करीत आहेत. त्यामुळे भारत-चीन संबंध हे केवळ संघर्षाचे नसून स्पर्धा, सहकार्य आणि परस्पर आर्थिक हितसंबंध यांचे मिश्रण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘दबाव ठेवत संवादही आवश्यक’

चीनसोबत पूर्णतः मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भविष्यातही अवघड असले तरी संवादाचे मार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे. भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंध मोठे आहेत. त्यामुळे एकीकडे चीनवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञान आणि सामरिक हितसंबंध यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे डॉ. चौसाळकर यांनी स्पष्ट केले.

मैत्री ठेवा, पण सावध राहा

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीराम पवार म्हणाले, भारत आणि चीन हे आशियातील दोन मोठे देश असून, दोघांनाही जागतिक राजकारणात प्रभावी भूमिका बजावायची आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील स्पर्धा आणि तणाव दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता आहे. १९६२च्या युद्धाच्या अनुभवातून भारताने चीनच्या सामरिक उद्दिष्टांचा आणि भू-राजकीय, भू-आर्थिक हालचालींचा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज स्पष्ट होते. जनरल थोरात यांनी त्यावेळी केलेल्या लष्करी अभ्यासातून चीनच्या संभाव्य हालचालींचा अचूक अंदाज घेण्याची आणि युद्धाच्या परिस्थितीत प्रभावी प्रतिकाराची आवश्यकता अधोरेखित केली होती. आजच्या परिस्थितीत चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि आर्थिक सहकार्य आवश्यक असले, तरी त्याचवेळी भारताने ‘मैत्री ठेवा, पण सतत सावध राहा’ ही भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. फार्मास्युटिकल्सपासून उद्योग आणि तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांत चीनशी असलेले आर्थिक संबंध लक्षात घेता चीनला पूर्णपणे दूर ठेवणे व्यवहार्य नाही; मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सामरिक स्वायत्तता आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हित यांचा विचार करून प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

कार्यक्रमात बाळ पाटणकर यांनी लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या सान्निध्यातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. जनरल थोरात यांनी आपल्याला पितृतुल्य प्रेम आणि मार्गदर्शन केले. ते अत्यंत मितभाषी, तत्त्वनिष्ठ, काटेकोर आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाचे होते. महाराष्ट्राला एनडीए अकादमी तसेच कोल्हापूरला गोल्फ कोर्स आणि नवीन राजवाड्यातील संग्रहालय निर्माण करण्यात त्यांनी अमूल्य योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रल्हाद माने यांनी डॉ. यशवंतराव थोरात यांच्या संदेशाचे वाचन केले. कर्नल सी.जे. रानडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. मोसीम पठाण यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश पवार, कर्नल विक्रम नलावडे, नायब सुभेदार टी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील, डॉ. अरूण भोसले, डॉ. अवनीश पाटील, सुरेश शिपूरकर, डॉ. सुरेश शिखरे यांच्यासह शिक्षक, अनेक आजी-माजी सैनिक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment