Thursday 30 September 2021

हवामान बदलांच्या धोक्याबाबत लोकांमध्ये जागरुकता आवश्यक: डॉ. व्यंकटेश मेरवाडे

 


डॉ. व्यंकटेश मेरवाडे
कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: हवामान बदलांच्या अनुषंगाने आता तंत्रज्ञान खूप प्रगत होते आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध अप्लीकेशन्सच्या माध्यमातून हवामानातील बदलांची माहिती लोकांसाठी खुली करून त्यांना संभाव्य धोक्यांबाबत जागरुक करणे आवश्यक आहे, असे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी काल येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलीटी स्टडिज्’मार्फत ‘हवामान बदल व शास्वत विकास’ या मध्यवर्ती विषयाला अनुसरून आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना डॉ. मेरवाडे बोलत होते. अमेरिकेतील महापुराचे नियोजन आणि त्या तंत्रज्ञानाचा भारतात वापर’ असा त्यांचा विषय होता. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत होते.

डॉ. मेरवाडे म्हणाले, महापुराची शक्यता वर्तविणारे मॉडेल कोणते आहे, यापेक्षा त्यासाठी वापरलेले मापदंड महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अचूक माहितीचा साठा आणि पुरवठा गरजेचा आहे. पूर नकाशे स्थिर असून कोणत्या भागात पूर येईल याची कल्पना ते देऊ शकत नाहीत. हा दोष दूर करत अमेरिकेत अनेक भागांचा वैज्ञानिक पद्धतीने चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. एकमितीय व द्विमितीय हायड्रोडायनॅमिक मॉडेलचा तुलनात्मक आढावाही त्यांनी घेतला. ही प्रतिमाने पूर परिस्थितीला कसा प्रतिसाद देतात आणि पूर नियंत्रणासाठी ती कितपत सक्षम आहेत, याविषयीही त्यांनी विवेचन केले.

डॉ.मेरवाडे यांनी अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे (USGS), फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (FEMA), नॅशनल वेदर सर्व्हिसमार्फत चालणारे रेन गेज स्टेशन यांची माहिती दिली. या स्रोतांमार्फत अमेरिकेतील पूर्वीचे पर्जन्यमान व नकाशे प्राप्त करता येतात. त्यांच्या आधारे नॅशनल वेदर सर्व्हिसने संपूर्ण युनायटेड स्टेट्ससाठी राष्ट्रीय जल शास्त्रीय मॉडेल तयार केले असून त्याच्या सहाय्याने निअर रिअल टाईम मॉनिटरिंग करणे शक्य झाले असल्याचेही सांगितले.

या व्याख्यानासाठी देश-विदेशांतून विविध विद्यापीठांतील अभ्यासक, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कामत म्हणाले, गेल्या २० वर्षांत सुमारे २ अब्ज लोक पुराच्या समस्येने बाधित झाले आहेत. अशा प्रकारच्या नैसर्गिक समस्येला योग्य रीतीने सामोरे जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने डॉ.मेरवाडे यांनी दिलेल्या माहितीचा अभ्यासक, संशोधकांना निश्चितपणे उपयोग होईल.

केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

शिवाजी विद्यापीठाकडून लाभलेले प्रेम व सहकार्य अविस्मरणीय

निरोप समारंभात परदेशी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञ भावना

 

शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसमवेत 
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व अन्य अधिकारी, शिक्षक.


 

कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठ परिवारातील विविध घटकांसह कोल्हापूरकरांकडून लाभलेले प्रेम व सहकार्य अविस्मरणीय स्वरुपाचे आहे, अशा भावना विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतून पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच.डी. संशोधन पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

विद्यापीठाच्या अधिविभागांध्ये तसेच संलग्नित महाविद्यालयांत केंद्रीय परराष्ट्र विभागाच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (नवी दिल्ली) स्कॉलरशीप स्कीम अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये पदवीसाठी व सन २०१९-२० मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी प्रवेशित झालेले होते. त्याचप्रमाणए सन २०१७-१८मध्ये पीएच.डी.साठीही काही विद्यार्थी प्रवेशित झाले. सदर विद्यार्थ्यांनी येथील शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना निरोपादाखल मंगळवारी सायंकाळी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

परदेशी विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये आपल्याला खूपच आपुलकी लाभल्याचे सांगितले. विशेषतः कोविड-१९ साथीच्या कालखंडात घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही विद्यापीठाने खूप जिव्हाळ्याने काळजी घेतली. विशेषतः आंतरराष्ट्रीय कक्षाचे डॉ. अनिल घुले, वसतीगृह अधीक्षक डॉ. जे.बी. यादव यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही कोल्हापूरवासीयांकडून कोठेही परकेपणाची वागणूक मिळाली नाही. येथील नागरिकांमध्ये खूप आत्मियतेची भावना असल्याचे नमूद केले. या प्रेमाबद्दल विद्यापीठाचे तसेच कोल्हापूरचे आपण कायम ऋणी आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी कोविड-१९सारख्या विपरित परिस्थितीतूनही या विद्यार्थ्यांनी आपापले अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.

डॉ. जी.एस. राशीनकर यांनी या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्याबाबतची कार्यवाही केली. यावेळी डॉ. ए. व्ही. घुले यांनी प्रास्ताविक केले, तर जे.बी. यादव यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. व्ही. वाय. धुपधाळे आदी उपस्थित होते.

 

इराणचे वर्घा मोखलेसी विद्यापीठाचे पहिले परदेशी पीएच.डी.धारक विद्यार्थी

 

सन २०१७-१८मध्ये शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र या विषयात पीएच.डी.साठी प्रवेश घेणारे वर्घा बाहमन मोखलेसी हे इराणचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे पहिले परदेशी विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्यासह एकूण २० विद्यार्थ्यांनी यंदा शिवाजी विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यात तीन पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांत इराक, मॉरिशस, अफगाणिस्तान, मोझांबिक आणि गिनिआ बिस्सू या देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. यात चार विद्यार्थिनीही आहेत.

Monday 27 September 2021

शिवाजी विद्यापीठातर्फे २ ऑक्टोबरला

तुषार गांधी यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान

 


तुषार गांधी


कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठातर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून महात्मा गांधी यांचे पणतू, ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आणि महात्मा गांधी या विषयावर श्री. गांधी संवाद साधतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के असतील तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित असतील.

शनिवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना अभिवादनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर १०.४५ वाजता विद्यापीठाच्या शिव-वार्ता (https://www.youtube.com/c/ShivVarta) या वाहिनीवरून श्री. गांधी यांचे व्याख्यान प्रसारित करण्यात येईल. सर्व शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.

प्रा. चंद्रकांत लंगरे यांचे महात्मा गांधींविषयक दोन आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथ

अमेरिकेतील विद्यापीठाकडून म. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला होणार प्रकाशन

 


प्रा. टेरी बेट्झल आणि प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी संपादित केलेल्या संदर्भग्रंथांची मुखपृष्ठे


 

Dr. Chandrakant Langare
कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर व्हर्जिनिया (अमेरिका) येथील जेम्स मॅडिसन विद्यापीठातील दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि येथील शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्याविषयी संपादित केलेल्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (दि. १ ऑक्टोबर), गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन स्वरुपात करण्यात येणार आहे. अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. इंग्लंड पार्लमेंटमधील मजूर पक्षाचे सदस्य ज्येष्ठ विचारवंत प्रा. लॉर्ड भिकू पारेख आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती असेल.

प्रा. बेट्झल आणि प्रा. लंगरे यांनी रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह आणि रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल हे दोन संदर्भग्रंथ संपादित केले आहेत. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे महात्मा गांधी सेंटर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभासाठी प्रा. पारेख आणि श्री. गांधी यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. हीथर कोल्टमन, मॅडिसन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे अधिष्ठाता डॉ. रॉबर्ट ऑग्युरे, महात्मा गांधी सेंटरच्या संचालक डॉ. टैमी कासल उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://linktr.ee/gandhicenterjmu या लिंकवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. कासल यांनी कळविले आहे.

जगातील ६१ गांधी अभ्यासकांचे लेखन

दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी इंडो-अमेरिकन बुक प्रोजेक्ट २०१९अंतर्गत महात्मा गांधी यांच्याविषयीच्या ग्रंथांचा प्रकल्प हाती घेतला. त्यातून रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह आणि रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल हे दोन संदर्भग्रंथ साकार झाले आहेत. दोन्ही ग्रंथांत मिळून जगभरातील एकूण ६१ गांधी अभ्यासक-संशोधकांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूंवर संशोधनपर लेख लिहीले आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, जपान आणि भारतातील गांधी विचारवंत व संशोधकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रंथांसाठी जागतिक ख्यातीचे गांधी तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत, भाषाशास्त्रज्ञ, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रदीर्घ काळापासून मजूर पक्षाचे सदस्य, लंडन स्कूल ऑप इकॉनॉमिक्स, वेस्टमिन्स्टर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ब्रिटीश अॅकॅडमीचे सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांची प्रस्तावना लाभली आहे. तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक तुषार गांधी यांचा अभिप्राय लाभला आहे.

Saturday 25 September 2021

शिवाजी विद्यापीठात ‘धरणे, महापूर आणि हवामान बदल’ या विषयावर विशेष व्याख्यान

स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्माण करणे आवश्यक: नंदकुमार वडनेरे

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानामध्ये बोलताना माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे


कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: राज्यात स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमॅट चेंज अँड सस्टेनॅबिलीटी स्टडीज यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना धरणे, महापूर आणि हवामान बदल या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.

डॉ. वडनेरे म्हणाले, पूर हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. तो थांबविता येणार नसला तरी त्याची तीव्रता कमी करणे निश्चितपणे शक्य आहे. त्या दृष्टीने पूर, हवामान बदल या बाबींकडे आता आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. राज्य व केंद्र सरकार आता हवामान बदल धोरणासंदर्भात गांभीर्याने विचार करीत आहेत, ही बाबही महत्त्वाची आहे. पुराच्या अनुषंगाने स्वतंत्र खाते निर्माण करून केवळ पूरकाळातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर त्याचे नियोजन व संनियंत्रण करण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागांतील उच्चपदस्थांमध्ये सुसंवाद व समन्वय साधणे त्यामुळे शक्य होईल. यामध्ये जलसंपदा, जलसंधारण, शेती, सहकार, वित्त, मदत व पुनर्वसन अशा सर्वच संबंधित विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे असेल. जलशास्त्राचा नव्याने अभ्यास करावा लागेल. विभागातील तज्ज्ञांची संख्या वाढवावी लागेल. माहिती तंत्रज्ञान, मदत व पुनर्वसन व्यवस्था यांचे सक्षमीकरण करावे लागेल. मदत-पुनर्वसनासाठी भरीव आर्थिक तरतूद ही सुद्धा महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

श्री. वडनेरे पुढे म्हणाले, सातत्याने महापूर येत असलेल्या सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूररेषेची काटेकोर अंमलबजावणी, प्रसंगी कायदा करून करायला हवी. ही दोन्ही ठिकाणे नद्यांच्या दोन्ही बाजूला वसलेली असल्याने तेथे महापूर आला. मात्र, केवळ तेवढे एकच कारण त्यामागे नाही. योग्य सांडपाणी निचरा व्यवस्थापनाचा अभाव हा तर तेथे आहेच, त्याचबरोबर कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी, तिला कारणीभूत आहे ते हवामान बदल ही नैसर्गिक कारणे, भौगोलिक परिस्थिती आणि भराव, धरणे, बंधारे, पूल, बांधकामे आदी मानवी अतिक्रमणे ही कारणेही आहेत.

धरणांवरील पूर व्यवस्थापन हे जलाशय प्रचालन आराखड्यानुसार व्हायला हवे, असे मत व्यक्त करून श्री. वडनेरे म्हणाले, हवामान, धरण सुरक्षितता आणि साठवण क्षमता या तीन मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला धरणांवरील जल व्यवस्थापनाचा विचार करावा लागतो. नैसर्गिक कारणे, भौगोलिक परिस्थिती आणि मानवी अतिक्रमणे यामुळे पूर येत राहणार, हे खरे आहे. मात्र, मोठा पाऊस झाला की धरणांतून पाणी सोडावेच लागते. पूरनियंत्रण हे हे कुशल धरण अभियंत्याचे कर्तव्य असते. मात्र, या अनुषंगाने अभियंत्यांसमोर द्विधावस्था असते. कारण पाणी साठवण ही सुद्धा त्याची जबाबदारी असते. त्यामुळे पाणी साठवण आणि पूरनियंत्रण या प्रत्यक्षात परस्परविरोधी बाबी आहेत. त्यांचे सुयोग्य परिचालन करणे हे म्हणूनच कौशल्याचे काम आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत पुराला गाळ जबाबदार असल्याची चर्चाही केली जाते. मात्र सध्या आपल्या धरणांमध्ये साधारण दहा टक्क्यांच्या वर गाळ आहे. त्याची फार काळजी करण्याचे कारण नसले, तरी धरणांत कमीत कमी गाळ साठेल, या दृष्टीने प्रयत्न मात्र निश्चितपणे करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.

धरणाचे आयुष्य हे त्याच्या संरचनात्मक स्थैर्यावर अवलंबून असते. चांगल्या धरणाचे आयुष्य हे साधारण शंभर वर्षे असते, असे अभियांत्रिकी शाखा सांगते. त्यामुळे आणखी काही वर्षांत आपल्याला त्यांच्या नूतनीकरणाचा विचार करावाच लागणार आहे. तथापि, या धरणांची चांगल्या पद्धतीने देखभाल व सक्षमीकरण करीत राहणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, सद्यस्थितीत बदलते हवामान आणि मानवी अतिक्रमणे ही कारणे महापुराला कारणीभूत आहेत. केवळ धरणांना त्यासाठी जबाबदार धरणे चुकीचे आहे. तथापि, मानवाने आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करणे हे अधिक आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणेही गरजेचे आहे.

केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. डॉ. वडनेरे यांनी उपस्थितांच्या शंकांचेही समाधान केले.

Thursday 23 September 2021

गुणवत्तापूर्ण आशयावर डिजिटल माध्यमांची भिस्त: विश्‍वनाथ गरूड

 


शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्याख्यानात बोलताना श्री. विश्वनाथ गरूड


कोल्हापूर, दि. २३ सप्टेंबर: डिजिटल माध्यमांतून सध्या तितकासा गंभीर आशय तयार होत नाही; परंतु, यापुढील काळात गुणवत्तापूर्ण आशयावरच या माध्यमांची भिस्त असेल, असे मत पुणे येथील डिजिटल माध्यम अभ्यासक विश्‍वनाथ गरूड यांनी आज येथे व्यक्‍त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने कोरोनानंतरचा डिजिटल मीडियाया विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. गरूड म्हणाले, ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढत आहे. नजीकच्या काळात डिजिटल माध्यमांचा वापरही तेथे वाढणार आहे. तथापि, या माध्यमांनी ज्ञान आणि विचार देण्याचे कामही जाणीवपूर्वक केले पाहिजे, तरच समाज त्यांच्याकडे गांभीर्याने बघेल. लोकांना घाबरवणे, थिल्‍लर माहिती देणे अशा गोष्टींपासून डिजिटल माध्यमांनी दूर राहिले पाहिजे. गंभीरपणे विचारपूर्वक आशयाची निर्मिती केली तरच या माध्यमांना भवितव्य आहे. यापुढील काळात केवळ चांगला आशय असून उपयोग नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोडही आवश्यक आहे.

श्री. गरूड पुढे म्हणाले, डिजिटल माध्यमांना बाजारस्नेही धोरण स्वीकारणे अपरिहार्य आहे. परंतु बाजाराच्या किती आहारी जायचे, याचाही विचार त्यांना करावा लागेल. व्यवसाय आणि कर्तव्य याच्यात मेळ साधणे आवश्यक आहे. कोरोनानंतही डिजिटल माध्यमांतील अनिश्‍चितता आणि अस्थिरता कायम रहाणार आहे. त्यामुळे या माध्यमात करिअर करताना अस्थिरतेचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे.
तसेच, यापुढील काळात व्हिडिओ आणि ऑडिओचा आशय वाढणार आहे. दृश्य स्वरूपातील आशयाची मागणी सातत्याने वाढत आहे. यासाठी डिजिटल माध्यमांनी व्हिडिओ किंवा पॉडकास्टिंगकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. उत्तम गुणवत्ता असलेला आशय निर्माण झाला तरच वर्गणी भरून लोक डिजिटल माध्यमांकडे आकर्षित होतील. अन्यथा या माध्यमांचे आर्थिक सक्षमीकरण होणार नाही.

यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. वेबिनारला विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संरक्षण क्षेत्रात करिअरच्या मुबलक संधी: डॉ. नरेंद्र विसपुते

  

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलताना डॉ. नरेंद्र विसपुते


कोल्हापूर, दि. २३ सप्टेंबर: भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या मुबलक संधी आहेत. त्यासाठी योग्य तयारी करून त्यांचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मुंबई दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक व संरक्षण विभागाचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. नरेंद्र विसपुते (आय.आय.एस.) यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये 'संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर ते बोलत होते.

Dr. Narendra Vispute
डॉ. विसपुते यांनी संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी अगदी पहिलीपासून कशा प्रकारे शैक्षणिक संधी आहेत, याची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले, जिथे जिथे संरक्षणविषयक क्षेत्रे, कार्यालये आहेत, अशा कॅन्टॉनमेंट क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यांच्या शाळा असतात. अशा शाळांमध्ये विद्यार्त्यांना प्रवेश घेता येतो. सी-कॅडेट स्कूलमध्ये चौथीपासून प्रवेश घेता येतो. तिथे या विद्यार्थ्यांना अगदी तराफा बांधणीपासून ते तराफा, छोट्या बोटी चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात येते. त्याखेरीज देशभरात ३१ सैनिक स्कूल आणि पाच मिलीट्री स्कूल आहेत. त्यांमध्ये सहावी आणि नववी या दोन टप्प्यांवर प्रवेश घेता येतो. दहावीनंतर तिन्ही संरक्षण दलांमध्ये ग्राऊंड लेव्हल भरती करण्यात येते. त्यांत जवानांपासून ते सर्व प्रकारच्या पदांच्या भरतीचा समावेश असतो. बारावीनंतर एनडीएच्या माध्यमातून प्रवेशाचा राजमार्ग तर सर्वांनाच ठाऊक आहे. एनडीएद्वारे विद्यार्थिनींसाठी तिन्ही दलांसाठी ऑफिसर्स स्तरीय भरती आणि प्रशिक्षणही देण्यात येते. पदवी परीक्षेनंतर कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस (सी.डी.एस.) या माध्यमातून संरक्षण दलात ऑफिसर पदासाठी तसेच पदव्युत्तर पात्रतेनंतरही शैक्षणिक, लॉजिस्टीक्स, प्रशासकीय अशा अनेक सेवांमध्ये संधी आहेत. तांत्रिक पदांमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेक्नीकल ग्रॅज्युएशन केलेले असणे आवश्यक आहे.

यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. पी.एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.