सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुटुंबियांकडून विद्यापीठास
सात लाखांचा निधी
कोल्हापूर, दि.
१८ सप्टेंबर: मराठीतील दिवंगत कवी सतीश काळसेकर तसेच ऋत्विज काळसेकर यांच्या नावे शिवाजी
विद्यापीठाच्या वतीने दोन कवींना सन्मानित केले जाणार आहे. सतीश काळसेकर यांच्या वाङ्मयीन कार्याचे स्मरण म्हणून शिवाजी
विद्यापीठाने दरवर्षी मराठीतील लक्षणीय काव्यलेखन करणाऱ्या कवीला पुरस्कार देण्यात
यावा, अशी इच्छा सतीश काळसेकर यांच्या पत्नी सुप्रिया काळसेकर यांनी व्यक्त
केली. त्यानुसार त्यांनी सात लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
सतीश काळसेकर हे
मराठीतील नामवंत कवी, लेखक, अनुवादक, संपादक व ग्रंथसंग्राहक होते. सतीश काळसेकर हे लघुनियतकालिक
चळवळीतील बिनीचे शिलेदार होते. वाङ्मयीन वर्तुळात एक उत्तम वाचक व ग्रंथ संग्राहक म्हणून त्यांचा लौकिक
होता. त्यांच्या ‘वाचनाऱ्यांची रोजनिशी’ या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘ऋत्विज काळसेकर हेही
नव्या पिढीतील आश्वासक कवी होते. त्यांचा ‘काळोखाच्या तळाशी’ हा लक्षणीय संग्रह प्रकाशित आहे. सतीश काळसेकर यांचा कोल्हापूर शहराशी
जवळचा ऋणानुबंध होता.
सतीश काळसेकर यांच्या
वाङ्मयीन कार्याचे स्मरण तसेच आधुनिक मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवींचा सन्मान
या निमित्ताने होणार आहे. याचा शिवाजी विद्यापीठाला निश्चितच आनंद आहे, अशी भावना यावेळी
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या रकमेच्या व्याजातून ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ व ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. मराठीतील ज्येष्ठ कवीस ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ दिला जाणार आहे; तर, ऋत्विज काळसेकर पुरस्कार नव्या पिढीतील
कवीस दिला जाणार आहे. सदर दोन्ही पुरस्कार पुढील वर्षापासून दिले जाणार आहेत.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. मेघा पानसरे, आदित्य काळसेकर, विप्लव काळसेकर, डॉ. उदय नारकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment