Tuesday 21 September 2021

सैद्धांतिक मांडणीबरोबरच सामाजिक चळवळींतील

डॉ. गेल ऑम्वेट यांचे कृतीशील योगदान मौलिक

शिवाजी विद्यापीठात मान्यवरांकडून आदरांजली

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ. गेल ऑम्वेट आदरांजली सभेत बोलताना डॉ. भारत पाटणकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ. गेल ऑम्वेट आदरांजली सभेत डॉ. ऑम्वेट यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,डॉ. राजन गवस, डॉ. भारत पाटणकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

 

कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: डॉ. गेल ऑम्वेट यांनी समाजशास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची सैद्धांतिक, चिकित्सक मांडणी करण्याबरोबरच सामाजिक चळवळीत दिलेले कृतीशील योगदान मौलिक स्वरुपाचे आहे. त्यांचे हे कार्य समकालीन सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकास मार्गदर्शक आहे. डॉ. ऑम्वेट यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालविणे आवश्यक आहे, असे मत आज शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ.गेल ऑम्वेट आदरांजली सभेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉ.गेल ऑम्वेट: सैध्दांतिक आकलन व योगदान' या विषयावर सदर सभा आयोजित करण्यात आली. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते; तर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर प्रमुख उपस्थित होते.

Dr. Bharat Patankar
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, गेल ऑम्वेट या कोणत्याही अवांतर अभिनिवेशाविना भारतीय ग्रामीण समाजजीवनाशी निष्ठेने आणि मनापासून एकजीव झाल्या. मूळच्याच हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याने त्यांच्या सामाजिक संशोधनाला स्वाभाविक अधिष्ठान प्राप्त झाले. थेट तळागाळापर्यंत जाऊन चळवळीचा अभ्यास व संशोधन करण्याची त्यांची विशिष्ट शैली होती. त्यातून त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र संशोधन पद्धती विकसित झाली. त्याद्वारे सिद्ध होणारे संशोधनही दर्जेदार स्वरूपाचे होते.  चळवळीचा पिंड कायम ठेवून तिचे सिद्धांतन करण्याचे कौशल्य त्यांना साधले होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जाऊन बहुविद्याशाखीय सामाजिक संशोधन करण्याची हातोटी त्यांनी आत्मसात केली होती. मानवी अस्तित्वासंबंधाने नवे सिद्धांत उभे करणे, आणि पूर्णत: मानुष होणे हे त्यांचे जीवनध्येय होते.

Dr. Rajan Gavas
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस म्हणाले, डॉ. गेल ऑम्वेट या उत्तम संशोधक, सामाजिक कार्यकर्त्या होत्या, हे तर खरेच; पण, वक्तृत्वावरही त्यांचे प्रभुत्व होते. आपले म्हणणे कमीत कमी शब्दांत, कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कसब त्यांच्याकडे होते. सैद्धांतिक मांडणी करणारे खूप असतात;  पण, सिद्धांत उभे करणारे दिसत नाहीत. डॉ. गेल ह्या अशा सिध्दांत उभे करणाऱ्यांपैकी होत्या. माती, पाणी, स्त्री आणि विठ्ठल-बुद्ध या चार पायांवर त्यांनी आपल्या सिद्धांताला सक्षमपणे उभे केले होते.

Dr. D. T. Shirke
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यापीठीय मंचावरून डॉ.गेल ऑम्वेट यांच्या कार्याचा वेध घेत असताना त्यांचे शैक्षणिक आणि संशोधकीय योगदान प्रकर्षाने अधोरेखित करणे आवश्यक आहे. डॉ. गेल या लौकिकार्थाने कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेत पूर्णवेळ कार्यरत नव्हत्या. मात्र, तरीही त्यांनी समाजशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय व अमूल्य आहे. संशोधनाचा उपयोग सामाजिक चळवळींना अधिष्ठान देण्यासाठी करणे आणि सामाजिक चळवळींबाबतचे संशोधन पुन्हा पुढे नेणे, अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली होती. त्या अर्थाने त्यांच्याकडे एक 'बहुमुखी शिक्षणतज्ज्ञ' म्हणून पाहावे लागेल. विद्यापीठ परिवार त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध माध्यमांतून कार्यरत राहील, अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. 

यावेळी माजी समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. एस.एन. पवार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अर्थशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी.एस. कांबळे, शारदाबाई अध्यासनाच्या संचालक डॉ. भारती पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी मनोगते व्यक्त केली.

सुरवातीला कुलगुरू डॉ.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पाटील आणि डॉ.पाटणकर यांच्या हस्ते डॉ.गेल ऑम्वेट यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. ऑम्वेट यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्यासह निवडक ५० निमंत्रित उपस्थित होते.  डॉ.प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले; तर, अमोल मिणचेकर यांनी सूत्रसंचालन केले.


No comments:

Post a Comment