‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडीज्’चा
उपक्रम
कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमॅट चेंज व सस्टेनॅबिलिटी
स्टडीज’तर्फे प्रथमच ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवारपासून
(दि २१ सप्टेंबर) व्याख्यानमालेस प्रारंभ होत असून ती १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. देशविदेशातील अनेक नामवंत शास्त्रज्ञ याअंतर्गत व्याख्याने देतील, अशी माहिती
केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी दिली आहे.
डॉ. पन्हाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल कुलकर्णी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर यांच्या व्याख्यानाने उद्या सायंकाळी ५ वाजता व्याख्यानमालेचे
उद्घाटन होणार आहे. ‘तापमान वाढ व जलस्रोतांवर होणारा परिणाम’ या विषयावर ते मार्गदर्शन करतील. या व्याख्यानमालेत पुढे माजी
प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडनेरे (दि. २५ सप्टेंबर) यांचे ‘धरणे, महापूर आणि
हवामान बदल’ या विषयावर,
डॉ. व्यंकटेश मेरवाडे, पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिका (दि. २८ सप्टेंबर) यांचे ‘अमेरिकेतील महापुराचे
नियोजन आणि त्या तंत्रज्ञानाचा भारतात वापर’ या विषयावर, जलतज्ज्ञ डॉ. प्रदीप पुरंदरे (दि. २९ सप्टेंबर) यांचे ‘बदलते हवामान आणि
महापूर व्यवस्थापन’ या विषयावर, पर्यावरणतज्ज्ञ
डॉ. पी. डी. राऊत (दि. १ ऑक्टोबर) यांचे ‘हवामान बदलाच्या अनुषंगाने
शैक्षणिक संस्थांची जबाबदारी’ या विषयावर, डॉ.
सचिन पन्हाळकर (दि. ५ ऑक्टोबर) यांचे ‘पंचगंगेचा महापूर: कारणे आणि उपाय’ या विषयावर आणि भारतीय सुदुर संवेदन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. भास्कर निकम (दि. ९ ऑक्टोबर) यांचे ‘हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांवरील हवामान बदलाचा परिणाम’ या
विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानमालेचा समारोप दि. १२ ऑक्टोबर रोजी शिवाजी
विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. एन.जे. पवार यांच्या व्याख्यानाने होईल. ते ‘हवामान बदल आणि शाश्वत
विकास’ या विषयावर
मार्गदर्शन करतील. या व्याख्यानमालेचा लाभ क्षेत्रीय स्तरावरील हवामान बदलाचे परिणाम अभ्यासण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी होईल. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. पन्हाळकर यांनी केले आहे.
केंद्राकडून
उपयुक्त योगदान अभिप्रेत: कुलगुरू डॉ. शिर्के
भारत अनेक समस्यांना तोंड देत आहे. हवामान बदल ही त्यापैकी एक आहे. हा बदल विविध प्रतिकूलतेशी संबधित आहे. शेती व जलसंपदा, जंगल आणि जैव विविधता, आरोग्य यांवर याचा परिणाम जाणवणार आहे. हवामान बदलाचा कोल्हापूर, सातारा, सांगली व पश्चिम घाट परीक्षेत्रामध्ये होणाऱ्या परीणामांचा सखोल शास्त्रीय स्तरावर अध्ययन करण्यासाठी विद्यापीठामध्ये ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडीज्’ची स्थापना करण्यात आली असून या केंद्राकडून समाजासाठी उपयुक्त
योगदान निश्चितपणे लाभेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली आहे.
या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील अनेक विभाग शाश्वत विकास व समाजासाठी एकत्र येऊन काम करू शकतील. पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन व निर्मुलन करणे त्यामुळे शक्य होईल. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञाचे सहकार्य या कार्यासाठी घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी पंचगंगा नदीचा महापूर, पश्चिम घाटातील भूस्खलन व बदलत्या हवामानाचा पर्जन्यवृष्टीवरील परिणाम यांविषयीच्या संशोधनास अग्रक्रम देण्याचा मानस या प्रसंगी व्यक्त केला. सदर सेंटर उभारणीसाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता
डॉ. आर. के. कामत यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment