कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: हवामान बदलांच्या
अनुषंगाने आता तंत्रज्ञान खूप प्रगत होते आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध
अप्लीकेशन्सच्या माध्यमातून हवामानातील बदलांची माहिती लोकांसाठी खुली करून
त्यांना संभाव्य धोक्यांबाबत जागरुक करणे आवश्यक आहे, असे मत अमेरिकेतील पर्ड्यू
विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी काल येथे व्यक्त केले. डॉ. व्यंकटेश मेरवाडे
शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलीटी स्टडिज्’मार्फत
‘हवामान बदल व शास्वत विकास’ या मध्यवर्ती विषयाला अनुसरून आयोजित ऑनलाईन
व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना डॉ. मेरवाडे बोलत होते. ‘अमेरिकेतील महापुराचे नियोजन आणि त्या तंत्रज्ञानाचा भारतात वापर’ असा
त्यांचा विषय होता. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत होते.
डॉ. मेरवाडे म्हणाले, महापुराची शक्यता वर्तविणारे मॉडेल कोणते आहे, यापेक्षा
त्यासाठी वापरलेले मापदंड महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अचूक माहितीचा साठा
आणि पुरवठा गरजेचा आहे. पूर नकाशे स्थिर असून कोणत्या भागात पूर येईल याची कल्पना
ते देऊ शकत नाहीत. हा दोष दूर करत अमेरिकेत अनेक भागांचा वैज्ञानिक पद्धतीने
चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. एकमितीय व द्विमितीय हायड्रोडायनॅमिक मॉडेलचा
तुलनात्मक आढावाही त्यांनी घेतला. ही प्रतिमाने पूर परिस्थितीला कसा प्रतिसाद
देतात आणि पूर नियंत्रणासाठी ती कितपत सक्षम आहेत, याविषयीही त्यांनी विवेचन केले.
डॉ.मेरवाडे यांनी अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे (USGS), फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (FEMA), नॅशनल वेदर सर्व्हिसमार्फत चालणारे रेन गेज
स्टेशन यांची माहिती दिली. या स्रोतांमार्फत अमेरिकेतील पूर्वीचे पर्जन्यमान व
नकाशे प्राप्त करता येतात. त्यांच्या आधारे नॅशनल वेदर सर्व्हिसने संपूर्ण
युनायटेड स्टेट्ससाठी राष्ट्रीय जल शास्त्रीय मॉडेल तयार केले असून त्याच्या
सहाय्याने निअर रिअल टाईम मॉनिटरिंग करणे शक्य झाले असल्याचेही सांगितले.
या व्याख्यानासाठी देश-विदेशांतून विविध विद्यापीठांतील अभ्यासक, महाविद्यालयीन
शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कामत म्हणाले, गेल्या २० वर्षांत सुमारे २ अब्ज
लोक पुराच्या समस्येने बाधित झाले आहेत. अशा प्रकारच्या नैसर्गिक समस्येला योग्य रीतीने
सामोरे जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने डॉ.मेरवाडे यांनी दिलेल्या माहितीचा
अभ्यासक, संशोधकांना निश्चितपणे उपयोग होईल.
केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी वक्त्यांचा परिचय करून
दिला आणि कार्यक्रमाचे संयोजन केले.
No comments:
Post a Comment