डॉ. प्रदीप पुरंदरे |
कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी विकास
प्रक्रियेत बदल करणे गरजेचे असून ‘अल्प कार्बन अर्थकारणा’कडे (Low Carbon
Economy) वाटचाल
हाच हवामान बदलाला सामोरे जाण्याचा राजमार्ग आहे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.
प्रदीप पुरंदरे यांनी काल येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलीटी
स्टडिज्’मार्फत ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेत चौथे
पुष्प गुंफताना ते ‘हवामान बदल आणि महापुराचे नियोजन’ या विषयावर बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
डॉ. पुरंदरे म्हणाले, हवामान बदलानुसार जल व्यवस्थापन व पूर नियमन यात
बदल करावे लागतील. मान्सूनचा कालावधी बदलतो आहे, त्याप्रमाणे सिंचन हंगाम व धरण
भरण्याच्या तारखा बदलाव्या लागतील. ज्या धरणांना पुराचा अधिक धोका आहे, अशा निवडक धरणांच्या
जलाशयातील काही टक्के साठवण क्षमता पुरासाठी आरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, नैसर्गिकरित्या होणाऱ्या हवामान बदलाची तीव्रता व गती ही मानवी
हस्तक्षेपामुळे अधिक वाढली आहे. जून २०२१ मधील तापमान गेल्या १४२ वर्षातील
सर्वाधिक तापमान म्हणून नोंदविले गेले. याच महिन्यात सर्वात जास्त आपत्तीजनक
‘टोकाच्या घटना’ घडल्या. हरितगृह वायूंचे वातावरणात मिसळणे व त्याचे उत्सर्जन होणे
या प्रक्रियेतील संतुलन बिघडल्यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत जाऊन ते तापमानवाढीला
कारणीभूत ठरत आहे. हे प्रमाण कमी झाले नाही, तर पृथ्वीच्या सरासरी पृष्ठीय
तापमानात या शतकाच्या मध्यापर्यंत २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, हे इंटरगव्हर्नमेंटल
पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (IPCC) चे अनुमान त्यांनी अधोरेखित केले. टेरी (The
Energy & Resource Institute) या संस्थेने मांडलेल्या अहवालातील जिल्ह्यानिहाय
असुरक्षिता इंडेक्स व त्यातील काही ठळक मुद्यांचाही आढावा त्यांनी घेतला.
आपल्या व्याख्यानात त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जलकामगिरीचा
आढावा घेतला. महाराजांचा दुष्काळ दौरा, दुष्काळ आयुक्ताची नेमणूक, राधानगरी धरणाचे
बांधकाम, संस्थानाचे पाटबंधारे धोरण व स्वतंत्र पाटबंधारे खात्याची सुरवात या बाबी
महाराजांच्या अफाट जलदृष्टीची साक्ष देणाऱ्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, आजच्या काळात हवामान
बदलांचा अभ्यास ही अत्यावश्यक बाब असून त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे अद्ययावतीकरण
अत्यंत आवश्यक आहे. हवामान बदलांविषयीच्या दक्षतेची सुरवात प्रत्येकाने वैयक्तिक
स्तरापासून केली, तरच तिचे चांगल्या प्रकारे सार्वत्रिक परिमाम दिसून येतील, असे
मतही त्यांनी व्यक्त केले.
केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत केले व वक्त्यांचा
परिचय करून दिला.
No comments:
Post a Comment