Friday 22 October 2021

‘सीईसी’च्या शैक्षणिक सुविधा आता विद्यापीठाच्या पदवीस्तरीय विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध: डॉ. नमिता खोत यांची माहिती

 

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वेबपेजवरील 'सीईसी'ची लिंक

'सीईसी'चे होमपेज

'सीईसी'चे चार मुख्य विभाग

'सीईसी'वर उपलब्ध विविध अभ्यासक्रमांची यादी



कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन(सीईसी) या उपक्रमांतर्गत विविध ऑनलाईन शैक्षणिक सुविधा शिवाजी विद्यापीठाच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते या उपक्रमाचे नुकतेच ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले असून तो विद्यार्थ्यांना वापरण्यास खुला करण्यात आला आहे.

डॉ. खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशनहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आंतरविद्यापीठ केंद्रांपैकी एक प्रमुख व लोकप्रिय व्यासपीठ आहे. दूरदर्शनचे प्रभावी माध्यम तसेच अलीकडील काळात माहिती तंत्रज्ञानाची उपलब्ध नवसाधने व मंच या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उच्चशैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ते विकसित करण्यात आले आहे. दूरदर्शनची शैक्षणिक ज्ञान प्रसाराचे साधन म्हणून काम करण्याची क्षमता व शक्ती लक्षात घेऊन युजीसीने १९८४ मध्ये देशव्यापी वर्ग (कंट्रीवाईड क्लासरुम) कार्यक्रम सुरू केले. या कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सहा विद्यापीठांमध्ये मीडिया केंद्रांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९९३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर अशा शैक्षणिक उत्पादनांचे समन्वयन, मार्गदर्शन आणि सुविधा प्रदान करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून सीईसीउदयास आली. आजसीईसीअंतर्गत २१ माध्यम केंद्रे या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत आहेत.

सीईसीने तयार केलेल्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठीचे स्टडी मटेरियल तसेच ई-कन्टेन्ट आपल्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी शिवाजी विद्यापीठाने त्यांच्यासमवेत सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत सीईसीचे स्टडी मटेरियल पदवी स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता उपलब्ध करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या e-contents for Under Graduate Students या वेबपेजवर सीईसीच्या http://cen.in/cec/curriculum_class या लिंकवरील ई-कन्टेन्ट व्हिडिओसह उपलब्ध केले आहेत.

 

कोणते अभ्यासक्रम उपलब्ध?

उपरोक्त लिंकमधील मॉड्यूलमध्ये चार विभाग (क्वाड्रंट) आहेत. त्यापैकी पहिल्या विभागात लिखित (टेक्स्ट) स्वरुपातील संसाधने आहेत. दुसऱ्या विभागात ऑडिओ-व्हिज्युअल स्वरुपातील व्याख्याने (लेक्चर) उपलब्ध आहेत. तिसऱ्या विभागात संदर्भ साधने आहेत. आणि चौथ्या विभागात स्वयं-मूल्यांकनासाठी प्रश्नावली व स्वाध्याय समाविष्ट आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान, व्यवस्थापन व व्यावसायिक, सामाजिक शास्त्रे आणि कला व संस्कृती या चार मुख्य विषयांमधील ६६ उपविषयांचे ७४० पेपरची व्याख्याने याअंतर्गत उपलब्ध करण्यात आली आहेत. बी.एस्सी., बी.ए. आणि बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी ती उपयुक्त ठरणार आहेत.

याप्रमाणे विविध विषयांची सविस्तर माहिती सर्व पदवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. तरी, विद्यार्थ्यांनी या ई-कन्टेन्टचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नमिता खोत यांनी केले आहे.

 

पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व प्रभावी साधने: कुलगुरू डॉ. शिर्के

युजीसीचा सीईसीहा उपक्रम अत्यंत विद्यार्थीभिमुख असून देशातील विद्यार्थ्यांसाठी तो अतिशय उपयुक्त सिद्ध झाला आहे. म्हणूनच शिवाजी विद्यापीठाने त्यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांच्याकडील अभ्यासाची संसाधने आपल्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून देण्याचे ठरविले. कोविडच्या कालखंडाने आपल्याला प्रत्यक्ष शिक्षणाबरोबरच ऑनलाईन शैक्षणिक साधने व उपक्रमांचीही गरज पटवून दिली आहे. त्यामुळे सीईसीच्या व्यासपीठावरील अत्यंत उपयुक्त व प्रभावी स्टडी मटेरियल आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असताना मनस्वी आनंद होतो आहे. या सुविधेचा आपले सर्वच पदवी स्तरावर शिक्षण घेत असणारे विद्यार्थी निश्चितपणे लाभ घेतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment