Wednesday 20 October 2021

कोविड काळातील सामाजिक सेवेबद्दल कुलगुरूंना ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र

 


कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीतर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना कोविड-१९ साथीच्या कालखंडात बजावलेल्या सामाजिक सेवेबद्दल कोरोना योद्धा सन्मानपत्र आज प्रदान करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या नेतृत्वाखाली कोविड कालखंडात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या कॅम्पसवरील वसतिगृहे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली. तेथे कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण विद्यापीठ कार्यक्षेत्रात समाजात जाणीवजागृती करण्याचे काम करण्यात आले. या कामांची दखल घेऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांना सदरचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाच्या सूचनेनुसार, कर्तव्याचे निष्ठेने पालन करून कोरोना काळामध्ये आपण बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्हा सेवा दलाच्या वतीने आणि आदरणीय पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रेरणेतून आपणास कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित करीत आहोत, असे कुलगुरूंना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे.

या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष रंगराव देवणे व कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिर्के यांना मानाचा फेटा बांधून व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह कोल्हापूर शहर काँग्रेस महिला सेवा दलाच्या उपाध्यक्ष सविता रायकर, राजकुमार मिठारी, रणजीत रायकर, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment