Thursday 14 October 2021

विद्यापीठांकडून समाजाला आपत्तींशी मुकाबला करण्याचे मार्गदर्शन आवश्यक: कुलगुरू डॉ. एन.जे. पवार

 



शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना पुण्याच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार.


कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर: विविध समाजघटकांना आपत्तींशी मुकाबला करण्याबाबतचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विद्यापीठीय व्यवस्थेने उचलण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचे हवामान बदल आणि शाश्वत विकास अध्ययन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पुण्याच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी काल येथे व्यक्त केला.

विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमॅट चेंज अँड सस्टेनेबल स्टडीज् यांच्या वतीने ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ या ऑनलाईन व्याख्यानमालेतील अखेरचे पुष्प गुंफताना डॉ. पवार बोलत होते. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले, महापूर, भूकंप, वादळ आदी अंदाज वर्तवण्यायोग्य संकटांच्या बाबतीत हवामान तसेच पर्यावरणीय बदल मोठे चिंताजनक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या आपत्तींमध्ये झालेली वाढही चिंतेची आहे. या सर्व बदलांचा शास्त्रीय अभ्यास साकल्याने करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पाणी, हवा आणि माती यांचे उपयोजन आपण किती योग्य पद्धतीने करणार आहोत, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. जगाच्या पाठीवरील १ टक्क्यापेक्षाही कमी पाणी मनुष्य व प्राणीमात्राच्या उपयोगाचे आहे. औद्योगिकीकरण आणि प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ताही प्रचंड खालावलेली आहे. वनस्पतींचे आयुर्मान व भूजन्य संसाधनांचेही मोठ्या प्रमाणात अवमूल्यन व ऱ्हास झाला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे पाणी, हवा आणि मृदा यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे एक मोठे आव्हान आपल्या अस्तित्वासमोर ठाकले आहे. या बाबतीत आपली पिढी अपयशी ठरली आहे. परिस्थिती आपल्या हातातून निसटत चालली आहे, त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे. गेल्या शतकभरात पृथ्वीचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. ते कमी करण्यासाठी आपल्याला सर्वच स्तरांवर भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी काही कठोर धोरणे आखावी लागतील आणि पाणी, हवा, मृदा यांचे प्रदूषण तर करायचेच नाही, शिवाय, समस्त नैसर्गिक स्रोत, संसाधने यांचे जतन व संवर्धन करण्याचा पण करून त्या दिशेने काम करावे लागेल.

कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्राच्या विभागात पिण्याच्या पाण्यासह कृषी, सिंचन आणि उद्योग यांसाठी लागणाऱ्या पाण्याची मागणी कशी कमी करता येईल, त्याचे योग्य नियोजन कसे करता येईल, या दृष्टीने विचार व अभ्यास करण्याचीही गरज डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती खूप विपरित स्वरुपाची आहे. या विभागात एकाच वेळी प्रचंड पर्जन्यमान असणारी आणि दुष्काळ सोसणारी गावे आहेत. त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या विद्यापीठीय व्यवस्थेकडून वाढत्या अपेक्षा आहेत. विद्यापीठाचे हवामान बदलाविषयीचे केंद्र त्याअनुषंगाने काय करणार, याकडेही त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन संशोधनात पुढे जाण्याची विद्यापीठाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. पवार यांनी औपचारिक स्वरुपात शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमॅट चेंज अँड सस्टेनेबल स्टडीज्चे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. ज्येष्ठ जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे यांनी आधी केले, मग सांगितले या उक्तीप्रमाणे विद्यापीठाने आधी या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने समाजाला सादर करून त्यानंतर केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली, ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल कुलकर्णी यांनी ऑनलाईन स्वरुपात शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. केंद्राचे संचालक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment