Saturday, 2 October 2021

गांधींच्या स्वप्नातला भारत साकारण्यात वाढत्या विषमतेचा अडसर: तुषार गांधी

 


शिवाजी विद्यापीठातर्फे गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना तुषार गांधी


(श्री. तुषार गांधी यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: देशातील वाढती विषमता आणि प्रत्येक बाबीच्या उत्सवीकरणाला आलेले उधाण या अत्यंत चिंताजनक बाबी आहेत आणि महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला भारत साकारण्यामधला प्रमुख अडसर आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक व सामाजिक कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि महात्मा गांधी या विषयावरील विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधींची स्वप्नातल्या भारताची संकल्पना आदर्श रामराज्याची आहे. यामध्ये गांधीजींना एक असे प्रजासत्ताक अभिप्रेत आहे, ज्यामध्ये दुर्बलातल्या दुर्बल, गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या आवाजाला महत्त्व असेल, ज्यामध्ये गरीब-श्रीमंत, धर्म-जात, प्रांत-भाषा असा कोणताही भेद असणार नाही, समताधिष्ठित समाज असेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. मात्र, सध्या श्रीमंतांकडे एवढी अमाप संपत्ती आहे की इतक्या प्रचंड ऐश्वर्याचे करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, तर दुसरीकडे गरीबाला दोन वेळची भूक भागविण्याची भ्रांत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षानंतर सामोरी आलेली ही विषमता अत्यंत क्लेषकारक व चिंताजनक आहे. महामारीच्या कालखंडात या घोर विषमतेचे प्रत्यंतर प्रकर्षाने आले. जिथे लोकांना रोजगार आहेत, तिथे त्यांना आश्रय नाही; आणि जिथे आश्रय आहे, तिथे रोजगार नाहीत. त्यामुळे हजारो मैलांची पायपीट करून आपापल्या आश्रयस्थानी परतण्याचे केविलवाणे जिणे त्यांच्या वाट्याला आले. बापूंच्या स्वप्नातील भारतापासून घेतलेली फारकतच आपल्याला येथे दिसून येते.

प्रजासत्ताकात नागरिकांची जबाबदारी सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे सांगून श्री. गांधी म्हणाले, लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकरवी चालविलेली व्यवस्था म्हणून आपण लोकशाहीची व्याख्या करतो. यामध्ये लोकांचा त्रिवार उद्घोष आहे. केवळ मतदान केले की झाले, असा बेजबाबदारपणा आपल्यात आला आहे. प्रत्यक्षात जगण्यामध्ये श्वासाचे जे महत्त्व आहे, तेच प्रजासत्ताकात नागरिकांचे आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत. मला हवे ते मिळाले की झाले, मग लोकांचे काहीही होवो, हा वाढता स्वार्थभावही चिंतेचा आहे. राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करताहेत, त्या आंदोलनाप्रती आपली उदासीनता सुद्धा चिंताजनक आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, हे आपण विसरतो आहोत. उद्या शेतकऱ्यानेही जर ते विसरायचे ठरवले तर आपल्यावर कोण अनवस्था प्रसंग ओढवेल, याचा आपण विचार करीत नाही. शेतकरी हा उत्पादकच आहे. त्याने अन्य उत्पादकांप्रमाणेच नफेखोरी करण्याचे ठरविले तर काय होईल आपले? या देशातील मध्यमवर्ग व्यवस्थेवरील बांडगुळाप्रमाणे वागतो आहे. आपण कर भरतो, म्हणजे जणू काही या देशातील प्रत्येक घटकावर जणू उपकारच करतो आहोत, अशा थाटात तो आहे. मात्र, सक्ती आहे म्हणून कर भरला जातो. उद्या कर भरणे ऐच्छिक केले तर यातले किती लोक तो भरतील? म्हणजेच उपभोग घेणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून वागणाऱ्यांनी आपला स्वार्थ, चंगळवाद बाजूला ठेवून या देशाच्या भल्याचा थोडा तरी विचार करायला हवा.

आपल्या विकासाच्या संकल्पनेचाही फेरविचार करायला हवा, असे सांगून श्री. गांधी म्हणाले, विकास याचा अर्थ आपण सर्रास पायाभूत सुविधा विकास असाच घेतो. एखादा महामार्ग, एखादा उद्योग जेव्हा उभारला जातो, त्यासाठी उद्योजकांना सवलतीत अगर मोफतही जमिनी दिल्या जातात. या जमिनी शेतकऱ्यांच्या असतात. अशा किती शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, याचा आपण विचार करीत नाही. मोबदल्यात शेतकऱ्यांना, त्यांच्या वारसांना नोकरीचे आश्वासन दिले जाते. उद्योगातील कुशल, तांत्रिक मनुष्यबळ बाहेरूनच येते, शेतकऱ्यांना मिळतात ती हलक्या दर्जाची कामे. या विकास प्रक्रियेत बलिदान देणारा एक घटक आहे आणि लाभार्थी दुसराच आहे. त्यातही नफेखोरी आहे, तोवर उद्योग चालतात. नफा बंद झाला की उद्योग बंद होतात. त्या बरोबर जमिनीही गायब होतात. यात नुकसान शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचेच होते. अशा विकास प्रक्रियेमध्ये उद्योजकांबरोबर, विकसकांबरोबर वाटाघाटी करण्याचे अधिकार गावकऱ्यांना का दिले जात नाहीत? बड्यांच्या जमिनींना यात धक्काही लावला जात नाही. त्यांच्या जमिनींचे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी रस्ते वळविले जातात. राष्ट्रभर अशी विषमता फोफावलेली आहे. ती गांधीजींना निश्चितच अभिप्रेत नव्हती.

श्री. गांधी पुढे म्हणाले, बापूंना रामाची हिंसा नव्हे; तर त्याची मर्यादापुरूषोत्तमता अभिप्रेत होती. त्या मर्यादांचा आदर्श आपण घ्यायला हवा. बापूंचे रामराज्य सामाजिक न्याय, समता, समानता आणि आदर्श समाज प्रस्थापनेचे प्रतीक आहे. आपली दांभिकता सोडून आपण हे समजून घेत नाही, तोवर राष्ट्रसुधारणा अशक्य आहे. सध्याचे युग हे पोस्ट-ट्रूथ आहे, असे म्हणतात. म्हणजे जीवन खोटे आहे का? मग, मृत्यू सत्य मानायचा का? असे प्रश्न त्यातून निर्माण होतात. प्रत्यक्षात सत्यापासून पलायन करण्याची आपली वृत्ती ही संपूर्ण राष्ट्राचीच दुर्बलता बनली आहे. अशा कमजोर, कमकुवत राष्ट्राला कोणत्याही उत्सवीकरणाचा अधिकार नाही. देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपला थोडा वेळ, थोडा विवेक आणि थोडी निष्ठा या राष्ट्रासाठी अर्पण केली, तरच आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी एका आदर्श राष्ट्राचा वारसा मागे ठेवू शकू, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वच्छता व आरोग्य रक्षण, ग्रामविकासातून राष्ट्रविकास अर्थात शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन अशी विकासाची त्रिसूत्री दिलेली आहे. या त्रिसूत्रीच्या आधाराने देशातल्या प्रत्येक नागरिकाने राष्ट्रविकासासाठी सज्ज होण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत विकासाचे तत्त्वज्ञान आपल्याला सांगून ठेवले आहे. त्याकडे डोळेझाक न करता शाश्वत विकासाची कास आपण धरायला हवी. आपले पर्यावरण जतन करून पुढील पिढीकडे ते जसेच्या तसे स्वाधीन करण्याची जबाबदारी बापूजींनी आपल्यावर सोपविली आहे. ती आपण किती कसोशीने निभावणार, हा आजघडीचा कळीचा मुद्दा आहे. आपण सर्वांनीच त्यासाठी प्रतिबद्ध होण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

या व्याख्यानापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. ए.एम. सरवदे, गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अन्य अधिकारी, शिक्षक व कर्मचारी. 


No comments:

Post a Comment