ऑनलाईन ४०व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना विवेकानंद महाविद्यालयाचा संघ. |
कोल्हापूर, दि.
५ ऑक्टोबर: विद्यार्थ्यांमध्ये
विविध कलागुणांबरोबरच कौशल्ये विकसित करण्यात युवा महोत्सव महत्त्वाची भूमिका
बजावतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज
येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आज सकाळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या
४०व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. कोविड-१९
महामारीची साथ, त्यानंतरचे लॉकडाऊन यानंतर गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या
उत्साही सहभागात आणि कोविड-१९चे निकष पाळून हा समारंभ पार पडला. कोल्हापूरच्या
विवेकानंद महाविद्यालयाने युवा महोत्सव २०२०-२०२१ चे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले
असून या संघास माजी कुलगुरू स्व. आप्पासाहेब पवार चांदीचा फिरता चषक आणि
प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर
जिल्हास्तरीय तसेच मध्यवर्ती युवा महोत्सव ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरित्या आयोजित
केले. जिल्हास्तरीय महोत्सव न्यू कॉलेज, कोल्हापूर (कोल्हापूर), मालती वसंतदादा
पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर (सांगली) आणि बाळासाहेब देसाई महाविद्यालय,
पाटण (सातारा) येथे झाले, तर मध्यवर्ती महोत्सव वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड
येथे आयोजित करण्यात आला. आज विद्यापीठात सदर मध्यवर्ती युवा महोत्सवातील विविध
विभागांतील विजेत्यांसह विभागीय तसेच सर्वसाधारण विजेतेपदाची पारितोषिकेही वितरित
करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले,
विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सावटातून बाहेर काढून पुन्हा त्यांच्यामध्ये चैतन्य
निर्माण करण्याच्या दृष्टीने युवा महोत्सवाचे आयोजन करणे विद्यापीठाला गरजेचे वाटत
होते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी त्यावर ऑनलाईन
युवा महोत्सव साजरा करण्याचा तोडगा काढला आणि सर्वच महाविद्यालयांच्या,
विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यंत सुरळीतपणाने पार पाडला. विद्यार्थ्यांना यंदा
कलागुणांबरोबरच तांत्रिक कौशल्यांचाही अवलंब करावा लागल्याने ती एक वेगळीच देणगी
या महोत्सवाने दिली, असे म्हणावे लागेल. तसेच, यंदा सहभागी विद्यार्थ्यांना या
कामी त्यांच्या कुटुंबियांचेही सहकार्य लाभले, ही बाबही नोंद घेण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांच्या
पदवीनंतरच्या आयुष्यात उद्भवणारे सारे प्रश्न ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असतात. त्यांची
उत्तरे आपण मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारावर आणि व्यावहारिक निकषांवर ज्याची
त्यालाच शोधावयाची असतात. त्याची पूर्वतयारीच जणू या महोत्सवाने विद्यार्थ्यांकडून
करवून घेतली, असे म्हणावे लागेल.
यावेळी आयोजक महाविद्यालयांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव
यांनी मनोगत व्यक्त केले. त्याखेरीज मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.
नीलेश सावे, विवेकानंद महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक डॉ. अरित महात, विद्यार्थी
प्रतिनिधी म्हणून केआयटी महाविद्यालयाच्या स्वरदा फडणीस यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध पारितोषिक वितरणाबरोबरच नॅक पिअर टीमसमोर सादर करण्यात
आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा गौरव
करण्यात आला. तसेच, ऑनलाईन युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनय,
सूरवाद्य, तालवाद्य, नकला, लावणीनृत्य आदी निवडक कलांचे या प्रसंगी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी केले तर
प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी
सूत्रसंचालन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांच्यासह संयोजन समिती सदस्य, यजमान महाविद्यालयांचे प्राचार्य, संघ
व्यवस्थापक, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद
सदर ऑनलाईन युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद विवेकानंद महाविद्यालय,
कोल्हापूर यांनी पटकाविले. त्यांना माजी कुलगुरू स्व. आप्पासाहेब पवार चांदीचा
फिरता चषक प्रदान करण्यात आला.
यावेळी शहीद तुकाराम ओंबाळे विशेष कला, साहित्य व सांस्कृतिक प्राविण्य
स्मृतिचिन्ह पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी चारुकेशी उमेश चव्हाण यांचा सत्कार
करण्यात आला.
कार्यक्रमात मध्यवर्ती युवा महोत्सवातील वक्तृत्व (मराठी), वक्तृत्व (हिंदी),
वक्तृत्व (इंग्रजी) सुगम गायन, शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य एकल गायन, शास्त्रीय
सूरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य एकल वाद्यवादन, सास्त्रीयनृत्य, नकला,
एकपात्री अभिनय, व्यंगचित्र, भित्तीचित्र, स्थळचित्र, कातरकाम, मातीकाम, रांगोळी
आणि मेहंदी आदी १९ कलाप्रकारांतील वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांना प्रशस्तीपत्रे
व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पाच कलाप्रकारांसाठी विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी महोत्सव विभागवार
विजेतेपदाचा फिरता चषक प्रदान करण्यात आला. वाङ्मय प्रकारासाठीचा पुरस्कार ईस्माईलसाहेब
मुल्ला लॉ कॉलेज, सातारा, श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय,
इस्लामपूर आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांना विभागून देण्यात आला. संगीत
प्रकारातील पुरस्कार देशभक्त रत्नाप्पा कॉलेज ऑफ कॉमर्स यांना, नृत्य प्रकारातील
पुरस्कार श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली यांना, कला प्रकारातील
पुरस्कार मुधोजी कॉलेज, फलटण यांना तर नाट्य प्रकारातील पुरस्कार ईस्माईलसाहेब
मुल्ला लॉ कॉलेज, सातारा व केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर यांना विभागून
देण्यात आला.
पारितोषिकांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे-
No comments:
Post a Comment