Thursday, 28 October 2021

विशेष वृत्त:

सहकाऱ्यांचा सण सुगंधी बनविणारा अवलिया


अनिल साळोखेंच्या उटण्याने विद्यापीठाला लागते दिवाळीची चाहूल

अनिल साळोखे

कोल्हापूर, दि. २८ ऑक्टोबर: रस्तोरस्ती रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदिलांची दुकाने थाटली जाऊ लागली, तयार फराळ अगर फराळाच्या साहित्य विक्रीचे फलक लागू लागले, कपड्यांच्या दुकानांमधील झगमगाट आणि ग्राहकांची गर्दी वाढू लागली की दिवाळीची चाहूल आपसूक लागते. शिवाजी विद्यापीठात गेली बारा वर्षे ही दिवाळीची चाहूल अनिल साळोखे यांच्या सुवासिक उटण्याच्या माध्यमातून लागते. त्यांच्या उटण्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांची दिवाळी दरवर्षी सुगंधित होत असते.


दिवाळी आठवडाभरावर असतानाच अत्यंत प्रसन्नवदनी अनिल विजयराव साळोखे समोर येऊन उभे राहतात. खरे तर त्यांच्याआधीच त्यांच्याजवळील उटण्याच्या सुवासाने खोलीचा ताबा घेतलेला असतो. हातातील पिशवीतून उटण्याचे पाकिट काढून ते आपल्याकडे सोपवितात. हॅप्पी दिवाळी असे म्हणून प्रेमभराने नमस्कार करून अनिलराव पुढच्या दालनाकडे जायला वळलेलेही असतात. गेली बारा वर्षे हा प्रघात त्यांनी नित्यनेमाने आणि अत्यंत निरपेक्ष भावनेने जोपासलेला आहे. आपला एखादा सहकारी या दिवाळी भेटीपासून वंचित राहू नये म्हणून गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सहकार्याने त्यांच्या दिवाळी भेटीसमवेत अनिल साळोखे यांचीही ही सुगंधी भेट प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचते आहे.

अनिल साळोखे यांचे उटण्याचे पाकिट

विद्यापीठाच्या संलग्नता (टी-१) विभागात सध्या सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल साळोखे यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल बोलते केले असता आपल्या सहकाऱ्यांच्या जीवनात सणासुदीच्या दिवसांत आपण सुगंध पसरवू शकतो, याचे मोठे समाधान मिळते, अशी भावना ते व्यक्त करतात. साळोखे यांचा हा सुगंधी उटणे विनामूल्य भेट स्वरुपात वाटण्याचा उपक्रम गेली १२ वर्षे सुरू आहे. दरवर्षी साधारण १५०० उटण्याची पाकिटे तयार करून ते विद्यापीठातील सहकाऱ्यांसह त्यांच्या देवकर पाणंद परिसरातील शेजारी, परिचित आणि नातेवाईक यांना भेट देतात. पतसंस्थेच्या माध्यमातूनच ५५० सहकाऱ्यांपर्यंत त्यांची ही सुगंधी भेट पोहोचलेली असते.

हे उटणे तयार करण्यासाठी ते खास चंदन, नागरमोथा, कचोरा, संत्रा, आंबेहळद, मुलतानी माती, गुलाब, वाळा, वेखंड, हिरडा आणि अनंतमूळ असे पदार्थ बाजारातून विकत घेतात. त्यांची बारीक पूड करून विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून त्यापासून उटणे तयार करतात. कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्यामुळे शुद्ध स्वरुपातील उटणे ही अनिल साळोखे यांच्या उटण्याची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणेच विद्यापीठ परिसरात पसरलेली आहे.

1 comment:

  1. गेली कित्येक वर्ष अनिल राव हा उपक्रम अत्यंत निरपेक्ष भावनेने राबवित आहेत. अतिशय शांत व मनमिळाऊ ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांचे वडिलांचे बरोबर काम करण्याची संधीही मला मिळाली होती. त्यांच्या उपक्रमास व दिवाळी निमित्ताने त्यांना व त्यांचे सर्व कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete