Friday 1 October 2021

महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान हा जागतिक वारसा: लॉर्ड भिकू पारेख

 


संदर्भग्रंथ प्रकाशन समारंभात बोलताना लॉर्ड भिकू पारेख

डॉ. चंद्रकांत लंगरे संपादित आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथांचे ऑनलाईन प्रकाशन

कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: महात्मा गांधी बहुआयामी विचारव्यक्तीत्वाचे धनी होते. त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान हा जागतिक वारसा आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गांधीवादी विचारवंत लॉर्ड भिकू पारेख यांनी आज येथे केले.

व्हर्जिनिया (अमेरिका) येथील जेम्स मॅडिसन विद्यापीठातील दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि येथील शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्याविषयी संपादित केलेल्या रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्हआणि रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथांच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जेम्स मॅडिसन विद्यापीठाच्या प्रोव्होस्ट डॉ. हीथर कोल्टमन आणि कॉलेज ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे अधिष्ठाता डॉ. रॉबर्ट ऑग्युरे यांची विशेष उपस्थिती होती.

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे महात्मा गांधी सेंटर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभात बोलताना लॉर्ड पारेख म्हणाले, महात्मा गांधी धार्मिक होते, पण मूलतत्त्ववादी नव्हते; राष्ट्रभक्त होते, पण जागतिक विचारसरणी जोपासणारे होते. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील हे वैशिष्ट्य आजच्या ग्लोबल युगातही प्रकर्षाने लागू पडते. त्या विचारसरणीचा अंगिकार करून जगाने त्यानुसार वाटचाल करणे दूरगामी हितावह आहे.

तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधींचा वारसा मला वारसाहक्काने लाभला आहे. त्याचा मला अभिमान आहे. मात्र, हा वारसा सांभाळणे मोठे जबाबदारीचे काम आहे. कारण हा केवळ माझ्या एकट्यासाठीचा वारसा नाही, तर संपूर्ण जगासाठी आहे. मात्र, आज सभोवताली नजर टाकली असता असे लक्षात येते की, आपण सारे दांभिकतेने भरलेल्या जगात राहतो आहोत. त्यामुळे मूल्यांची जाणीव कोठे तरी हरपत चालली आहे, असे दिसते. आजकाल हिंसात्मकताही वाढीस लागली आहे. शारीरिक हिंसेबरोबरच पर्यावरणीय हिंसा, औद्योगिक हिंसा असे हिंसेचे विविधांगी विखारी स्वरुप जागतिक स्तरावर दृष्टीस पडते. हे चित्र महात्मा गांधींना अपेक्षित मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विपरित आहे. ते बदलण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसा यांच्या संदर्भात केलेले विविध प्रयोग, त्यांची सामाजिक न्यायाची आणि मनुष्यविकासाची संकल्पना, त्यांच्या मनी असलेली शिक्षण आणि पर्यावरणाविषयीची आस्था तसेच स्वावलंबन आणि ग्रामस्वराज्याची अर्थात तळागाळापासून विकासाची संकल्पना राबविण्याची आकांक्षा या बाबी आजघडीला जगाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवरील उत्तर आहेत. त्यांच्या विचारांनीच जगात शांतता, सामाजिक सौहार्द प्रस्थापित करणे शक्य आहे. जेम्स मॅडिसन विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रासमवेत सुरू झालेले हे शैक्षणिक सहकार्य या पुढील काळातही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात या संदर्भग्रंथांचे संपादक दिवंगत डॉ. टेरी बिट्झेल यांनी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात केलेल्या भाषणाची चित्रफीत दर्शविण्यात आली. तसेच, संदर्भग्रंथांचे संपादक शिवाजी विद्यापीठातील डॉ. चंद्रकांत लंगरे यांच्यासह लेखक डॉ. गीता धरमपाल, डॉ. विवेक सचदेवा आणि डॉ. क्विनी प्रधान यांनी प्रातिनिधीक मनोगते व्यक्त केली. प्रोव्होस्ट डॉ. हीथर कोल्टमन यांनी स्वागत केले, तर डॉ. रॉबर्ट ऑग्युरे यांनी प्रास्ताविक केले.  महात्मा गांधी सेंटरच्या संचालक डॉ. टैमी कासल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment