'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथा'चे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. एस.एस. महाजन, नामदेवराव कांबळे, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर आदी. |
महाकाव्यग्रंथाचे मुखपृष्ठ |
कोल्हापूर, दि. २०
ऑक्टोबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील २०२१
कवितांचा समावेश असलेला महाकाव्यग्रंथ कृतज्ञतेने ओथंबलेला आहे, असे भावोद्गार
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले.
तरोडा-खुर्द (जि. नांदेड) येथील प्रा. अशोककुमार दवणे यांनी संपादित केलेल्या ‘महामानव’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या २०२१
कवितांचा समावेश असलेल्या महाकाव्यग्रंथाचे आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये
एकाच वेळी प्रकाशन करण्यात आले. कोल्हापूर येथील प्रकाशन सोहळा कुलगुरू डॉ. शिर्के
यांच्या हस्ते विद्यापीठ कार्यालयात पार पडला. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ’
हा उपक्रम एकमेवाद्वितिय स्वरुपाचा
असून त्यासाठी संपादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या प्रा. दवणे यांचे
कार्य अभिनंदनीय आहे. राज्यभरातून आलेल्या सुमारे पाच हजारांहून अधिक कवितांमधून
निवडक २०२१ कवितांचे संकलन व संपादन करणे, ही फार मोठी कामगिरी आहे. तीन
पिढ्यांतील कवींच्या कविता यात आहेत. त्याचप्रमाणे या संग्रहामध्ये शिवाजी
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील साठहून अधिक कवींच्या कवितांचा समावेश असणे, ही बाबही
महत्त्वाची आहे. यातील प्रत्येक कवीच्या कवितेमधून बाबासाहेबांप्रती कृतज्ञताभाव
ओसंडून वाहताना दिसतो. या महाकाव्यग्रंथाचे वाचक मनापासून स्वागत करतील, अशी आशा
त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक
डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी
आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक
जत्राटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव कांबळे यांच्यासह प्रा. जेलीत
कांबळे, प्रा. प्रेरणा व्यवहारे, डी.एस. कौशल कांबळे, डॉ. मधुकर धुतूरे, गौतम
वर्धन, संजय कुर्डूकर, पी.डी. सरदेसाई, प्रमोद जवळगेकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment