Thursday, 14 October 2021

‘कस्तुरी’च्या यशोकीर्तीचा सुगंध दिगंतात सर्वदूर दरवळेल: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिचे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.
 
कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रशस्तीपत्र प्रदान करताना  प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. शेजारी दीपक सावेकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


कस्तुरी सावेकर हिचे शिवाजी विद्यापीठाकडून अभिनंदन (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर: कस्तुरी सावेकर हिच्या यशोकीर्तीचा सुगंध दिगंतात सर्वदूर दरवळेल, अशी कामगिरी तिच्या हातून होईल, असे आशिषपर गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल (दि. १३) येथे काढले.

जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टची मोहीम अगदी अखेरच्या टप्प्यात खराब हवामानामुळे अर्धवट सोडून परतावे लागले तरी माऊंट मनस्लू हे अष्टहजारी शिखर सर करून कोल्हापूरला परतलेल्या कस्तुरी सावेकर हिची काल सायंकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी तिच्या निवासस्थानी भेट घेतली. कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रियाआणि शिवचरित्र: एक अभ्यास या विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या दोन ग्रंथांसह प्रशस्तीपत्र देऊन कुलगुरू, प्र-कुलगुरूंनी कस्तुरीचे अभिनंदन केले आणि तिच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कस्तुरीने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. अत्यंत कमी वयात माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत इतक्या उंचीवर जाणारी तसेच माऊंट मनस्लू सर करणारी ती केवळ कोल्हापूरचीच नव्हे, तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पहिली कन्या ठरली आहे. या क्षेत्रातील आपली क्षमता तिने सिद्ध केली आहे. पुढील काळात तिने खराब हवामानामुळे अर्धवट सोडावी लागलेली माऊंट एव्हरेस्टची मोहीम तर पूर्ण करावीच आणि जगभरातील अशी सर्वोच्च शिखरे सर करावीत. कोल्हापूरचे नाव दिगंतात उंचावावे. तिच्या या गिर्यारोहण प्रेमास प्रोत्साहन देणाऱ्या आईवडिलांचेही कुलगुरूंनी कौतुक व अभिनंदन केले.

एक तासाहून अधिक काळ झालेल्या या भेटीवेळी कस्तुरीने तिच्या मोहिमांचे व्हिडिओ व छायाचित्रे दाखवून उपस्थितांना त्याविषयी सविस्तर माहिती दिली आणि मुग्ध करून सोडले. यावेळी तिचे आईवडिल मनस्विनी व दीपक सावेकर, बंधू अमित सावेकर, गीतांजली पाटील आणि अन्य कुटुंबिय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment