Saturday 30 October 2021

तंत्रज्ञान अधिविभागातील ११ विद्यार्थ्यांची ‘टीसीएस’मध्ये निवड; ३.४ लाखांचे पॅकेज

 



कोल्हापूर, दि. ३० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील ११ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)” या नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत निवड झाली. त्यांना प्रत्येकी प्रतिवर्ष ३.४ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात बी.टेक. अंतिम वर्षात (सन २०२१-२२) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टीसीएस कंपनीमार्फत निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखेतून सुशांत जाधव, ऋषिकेश घडक, विरेन शहा, रोहित पाटील आणि जान्हवी नांदवडेकर या पाच विद्यार्थ्यांची, कॉम्प्युटर सायन्स व टेक्नॉलॉजी या शाखेतून कोमल पुरोहित, तेजल आंबोळकर, श्रेयस पाटील व ओंकार चौगुले या चार तर केमिकल टेक्नॉलॉजी शाखेतील अंकेष चौगुले आणि मेकॅनिकल इंजिनिरिंग शाखेतून आशुतोष शिरोळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची असिस्टंट सिस्टीम इंजिनिअर या पदावर निवड झाली असून प्रतिवर्ष ३.४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, तंत्रज्ञान अधिविभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. बी. सादळे, तसेच डॉ. पी.डी. पाटील, डॉ.ए.बी. कोळेकर, डॉ. रश्मी देशमुख आणि डॉ. श्यामकुमार चव्हाण यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. अमर डुम, चेतन आवटी, प्रशांत पाटील व एस.बी. काळे यांनी प्लेसमेंटसाठी प्रयत्न केले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment