व्याख्यानमालेत बोलताना डॉ. सचिन पन्हाळकर |
कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: हवामान बदलाचा परिणाम म्हणून पंचगंगा खोऱ्यात साळवण व इचलकरंजी या
ठिकाणी सन २०१९मध्ये क्षमतेपेक्षा जास्त (अनुक्रमे १०४० मिमी, ८४ सेमी) पावसाची
नोंद झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पर्जन्याचे स्वरूप, त्याची
तीव्रता, कालावधी, प्रवणक्षेत्र यांचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलिटी
स्टडिज्’चे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी काल येथे केले.
केंद्रामार्फत ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ या ऑनलाईन व्याख्यानमालेतील
सहावे पुष्प गुंफताना ‘पंचगंगा महापूर: कारणे व उपाय’ या विषयावर ते बोलत होते. पर्यावरणशास्त्र
अधिविभागाचे माजी प्रमुख डॉ. पी.डी. राऊत
अध्यक्षस्थानी होते.
यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत केलेले जोखीम मूल्यांकन, पूर
वारंवारिता विश्लेषण तसेच असुरक्षिततेचे मुल्यांकन आणि त्यासाठी वापरलेली अभ्यास
पद्धती यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. लाल, निळ्या पूररेषांची पूरप्रवणता
निर्माण करण्यामधील भूमिका मांडली. तसेच प्रतिमांच्या साह्याने सन २००४ व २०२१
मधील पंचगंगा नदी किनारी झालेली विकासकामे, अनधिकृत बांधकामे दर्शविली व त्यांना
प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचेही सांगितले.
अलमट्टी धरणाचा पंचगंगा पुरावर फारसा परिणाम होत नसून जास्त ग्रेडीएंटमुळे
कृष्णा नदी पुराच्या वेळी पंचगंगेतील पाणी स्वीकारू शकत नाही. परिणामी, बॅकवॉटर
इफेक्ट वाढून पूर परिस्थिती उद्भवते. त्यासाठी त्यांनी डायव्हर्जन चॅनल हा उपाय
असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास देशभरातून विविध विद्यापीठांतील अभ्यासक, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधक
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय अभिजित
पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment