शिवाजी विद्यापीठातील बैठकीस संबोधित करताना खासदार उदयनराजे भोसले. सोबत (डावीकडून) अमित कुलकर्णी, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. |
कोल्हापूर, दि. ११
ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या
सातारा येथील नियोजित उपकेंद्रासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज येथे दिली. उद्या (दि. १२ ऑक्टोबर)
सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपकेंद्राच्या जागेसाठीचा प्रश्न मार्गी
लावण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवाजी विद्यापीठात आज सायंकाळी खासदार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार
पडली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, केवळ आर्थिक आणि भौगोलिक कारणांनी कोणताही
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची आपली जबाबदारी
आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य
प्रवाहात सामील करवून घेण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर विद्यापीठाचे उपकेंद्र
अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकविसाव्या शतकात नवतंत्रज्ञानाचा, नवज्ञानाचा वेग
मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, अभियांत्रिकीच्या
आंतरविद्याशाखीय शाखा असे अनेक नवे अभ्यासक्रम येत आहेत, येऊ घातले आहेत. त्यांचा
लाभ आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे. गावाकडून मोठ्या
शहरांकडे होणारे विद्यार्थ्यांचे, कामगारांचे स्थलांतर रोखणे आणि त्यांना स्थानिक
पातळीवर विविध उद्योग-व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या केंद्राच्या
माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. शहरांमध्ये जाऊन कामगार होण्यापेक्षा स्थानिक
पातळीवर स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारून मालक होण्यासाठी युवकांना मदत करण्याचे
धोरण यामध्ये अंतर्भूत आहे. त्याअंतर्गत त्यांना आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा
स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात येतील. युवकांचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच
विभागाचाही विकास आम्हाला अभिप्रेत आहे. विद्यापीठाने या उपकेंद्रासाठी काय हवे,
ते सांगावे आणि त्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर पाठपुरावा करू आणि एक आदर्श शिक्षण
व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शिवाजी
विद्यापीठाची उपकेंद्रे अगर उपपरिसर निर्माण करीत असताना त्या ठिकाणी आम्हाला केवळ
‘आणखी एक महाविद्यालय अगर
विद्यापीठाचे विस्तारित स्वरुप’
अभिप्रेत नसून स्थानिक संसाधने, तेथील भौगोलिक वैशिष्ट्ये या सर्वांचा समावेश करून
त्यांची नव्या शैक्षणिक धोरणाशी सांगड घालून विद्यार्थ्यांना स्थानिक वैशिष्ट्यांची
रोजगाराभिमुखता प्रदान करून संपन्न व समृद्ध बनविणारे अभ्यासक्रम अपेक्षित आहेत. त्याचबरोबर
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, प्रवास व पर्यटन,
औषधनिर्माण, व्यवस्थापन आणि अन्नविज्ञान व तंत्रज्ञान अशा निवडक ताज्या
विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांची सुरवात करण्यासाठीही उपकेंद्रे उपयुक्त ठरतील, जेणे
करून केवळ स्थानिकच नव्हे, तर अन्य विभागांतील विद्यार्थ्यांचाही ओढा त्यांच्याकडे
राहील. शिक्षणाबरोबरच संशोधन व विकास, कौशल्य विकास आणि अन्य समाजाभिमुख उपक्रम
यांसाठीही उपकेंद्र उपयुक्त राहील. एकूणातच एक आदर्श शैक्षणिक व्यवस्था
उपकेंद्राच्या ठिकाणी विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
या प्रसंगी खासदार श्री. भोसले यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, ग्रंथभेट,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार
करण्यात आला. या प्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी विद्यापीठाने
सातारा येथे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांची माहिती
दिली. सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,
तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी अधिसभा सदस्य डी. जी. बनकर, वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव वैभव ढेरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment