Wednesday 20 October 2021

नव्या पिढीला चैतन्यदायी गांधीविचारांशी जोडणे आवश्यक: अरुण खोरे

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे



कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: महात्मा गांधी यांच्या विचारांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी गांधीविचारांचे सैद्धांतिक, भावनिक आणि वैचारिक पातळीवर प्रसारण करावे लागेल. नव्या पिढीला गांधीजींच्या चैतन्यदायी विचारांची नव्याने ओळख करून द्यावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व गांधी विचारांचे अभ्यासक अरुण खोरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रामार्फत डॉ. उषा मेहता स्मृती व्याख्यानमाला-२०२१अंतर्गत आयोजित गांधींच्या पुनःस्मरणाची गरज का?’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.

श्री. खोरे म्हणाले, महात्मा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासह सामाजिक योगदान अतुलनीय स्वरुपाचे आहे. त्याची दखल जगभरातील देशांनी घेतली आहे. गतसहस्रकावर ठसा उमटविणारे सर्वाधिक प्रभावी नेतृत्व म्हणून गांधीजींच्या नावावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. मार्टिन ल्युथर किंग यांच्या कृष्णवर्णीय चळवळीपासून ते नेल्सन मंडेला ते अगदी अलीकडील बराक ओबामा यांच्यापर्यंत हा गांधीविचारांचा प्रभाव दिसून आलेला आहे. मात्र, अलिकडील काळात गांधीविचार पुसून टाकण्याचे तसेच त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. गांधीचरित्रातील छोटे छोटे तपशील घेऊन त्यांची मोडतोड करून सादर करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेतली जात आहे, हे चिंताजनक आहे. गांधीजींच्या संदर्भात कार्य करणाऱ्या सेवा संस्था, संघटनांची जबाबदारी त्यामुळे वाढली आहे. त्यांना गांधीजींच्या मार्गानेच गांधीविचारांचे विद्रुपीकरण थांबविण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. नव्या पिढीला खऱ्या गांधीविचारांशी जोडण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, हत्या, हिंसा, द्वेष अथवा सूडभावना या मानवजातीच्या विरुद्ध आहेत. त्यांचे गौरवीकरण अथवा समर्थन करणे चुकीचे आहे. अशा प्रकारांनी कोणत्याही देशाचे, मानवसमूहाचे भले झालेले नाही. भल्या-बुऱ्या प्रवृत्तींचे द्वंद्व हे चालतच आले आहे. मात्र, दुष्प्रवृत्तींचे गौरवीकरण चिंताजनक आहे. निरामय समाजनिर्मितीसाठी महात्मा गांधी यांच्या सद्विचारांचेच अनुसरण करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. व्याख्यानास रामदास भटकळ, दशरथ पारेकर, नागोराव कुंभार, डॉ. अरुण भोसले, डॉ. नंदा पारेकर, विवेक कोरडे, प्रा. चंद्रकांत लंगरे, किशोर बेडकिहाळ  आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment