दिनेश ओऊळकर |
कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: सहकार हा समृद्धीकडे नेणारा मार्ग असून त्याच्याशी
संबंधित घटकांमध्ये त्या अनुषंगाने माहिती व जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
महाराष्ट्राचे माजी पणन संचालक दिनेश ओऊळकर यांनी आज येथे केले.
भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली, बँक ऑप इंडिया चेअर इन
रुरल बँकिंग, शिवाजी
विद्यापीठ कोल्हापूर आणि श्री रवळनाथ
को-ऑप. हाऊसिंग
फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सभासद प्रशिक्षण कार्यशाळा विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र
सभागृहात झाली. त्यावेळी ते बीजभाषण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
श्री. ओऊळकर म्हणाले, केंद्र सरकारला सुद्धा सहकाराच्या
बलस्थानांची जाणीव झालेली असून त्यामुळेच प्रथमच केंद्रीय स्तरावर स्वतंत्र सहकार
खाते निर्माण करण्यात आले आहे. त्याचा
अनुकूल परिणाम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर व संस्थांवर निश्चितपणाने होईल.
महाराष्ट्रातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी चळवळ अतिशय बळकट असून ६० टक्के पीककर्जाचे वाटप सहकारातूनच होत असते.
भांडवलावर मर्यादित लाभांश तसेच सभासदांना विविध प्रकारचे लाभ सहकारी संस्था देत
असतात. या बळावरच कृषी
आणि पणन हे विभागही सक्षम होण्यास हातभार लागत असतो. सभासदांना त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांची
जाणीव असल्यास सहकाराची वाटचाल योग्य प्रगतीच्या दिशेने राखता येते. त्या दृष्टीने
अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित होत राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त
केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
सभासद प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार
काढले. रवळनाथ सहकारी
गृहनिर्माण संस्था उत्कृष्ट दर्जाचे कार्य करत असून बहुराज्य संस्था म्हणूनही भविष्यकाळात ती नावारुपाला येईल, अशी आशाही
त्यांनी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले, विजय हरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. एम.एस. देशमुख यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्राचार्य निळपणकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेत महेश धर्माधिकारी, डॉ.विजय ककडे यांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment