Thursday, 14 October 2021

विद्यापीठाच्या कल्याण निधी योजनेअंतर्गत

सहा महिन्यांत १ कोटीहून अधिक निधी प्रदान

 

डॉ. आर.व्ही. गुरव

शिवाजी विद्यापीठाच्या कल्याण निधी योजनेची सविस्तर माहिती देणारी डॉ. आर. व्ही. गुरव यांची मुलाखत (व्हिडिओ)


मृत विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा दिलासा: डॉ. आर.व्ही. गुरव

कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजनेअंतर्गत कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या कालखंडात १ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांचे एकूण ११३ प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी दिली. कल्याण निधी योजनेच्या अनुषंगाने शिव-वार्ता संवाद या विशेष मुलाखतीमध्ये डॉ. गुरव बोलत होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.

कल्याण निधी योजनेची माहिती देताना डॉ. गुरव म्हणाले, शिवाजी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध संलग्नित महाविद्यालये तसेच अधिविभागांतील विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी विद्यार्थी विकास विभागामार्फत सन २०१४-१५ पासून कल्याण निधी योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत या घटकांकडून प्रतिवर्षी अत्यंत माफक शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांकडून रु. ५०, शिक्षकांकडून रु. २०० तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून रु. १०० (ज्यांचा ग्रेड पे रु. ६०००पेक्षा अधिक असेल, त्यांच्याकडून रु. २००) असा निधी आकारला जातो. या संकलित रकमेमधून योजनेसाठीचा खर्च केला जातो.

यातील कोणाही घटकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपये कल्याण निधी दिला जातो. विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत असताना बाहेरगावी नैसर्गिक वा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना २ लाख रुपये दिले जातात. अपंगत्व आले तरी सुद्धा अपंगत्वाच्या प्रमाणात २५ हजारांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत निधी प्रदान केला जातो. विद्यार्थ्यांच्या पालकांचा नैसर्गिक वा आकस्मिक मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यास ७५ हजार रुपये दिले जातात. पालकांना अपंगत्व आल्यास २५ हजारांपासून कमाल ५० हजारांपर्यंतचा निधी प्रदान केला जातो.

डॉ. गुरव पुढे म्हणाले, सन २०१४-१५पासून ते सन २०२०-२१ या कालावधीत कल्याण निधीपोटी रु. ४ कोटी ४६ लाख १५ हजार ७९२ रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. या काळात एकूण ३३३ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापोटी २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीचे विविध घटकांना वितरण करण्यात आले आहे. सन २०२०-२१मध्ये ६६ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता. तथापि, या वर्षी कोविड-१९च्या साथीमुळे कल्याण निधीसाठी एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ११३ प्रस्ताव प्राप्त झाले. यात दहा विद्यार्थ्यांसह ८५ पालक आणि १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापोटी एकूण १ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. विद्यापीठाने सहानुभूतीचा दृष्टीकोन स्वीकारून एकाच कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांनी पालक गमावला असल्यास त्या दोघांच्या नावेही कल्याण निधी प्रस्ताव मान्य केले. विभागाने त्रुटीपूर्ण प्रस्ताव परत न पाठविता संबंधितांकडून आवश्यक ती कागदपत्रे अगदी ई-मेल, वॉट्सअपद्वारेही मागवून घेतली आणि प्रस्ताव मार्गी लावले.

विद्यार्थी-पालकांत सुसंवादाची गरज

या निधीच्या अनुषंगाने आपली निरीक्षणे नोंदविताना डॉ. गुरव यांनी तरुण वयातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकांच्या मनावरील ताणतणाव विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवेत. अनेक पालकांचे मृत्यू व्यसनाधिनतेमुळे झाल्याचे दिसते. त्याची कारणमीमांसा केल्यास त्यामागेही बहुतेकदा मानसिक तणावग्रस्तताच असते. सुसंवादातून यावर मार्ग निघू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मृत्यू हे बहुतांशी बेदरकारपणाने दुचाकी वाहने चालविल्याने अपघातांत झाल्याचे दिसते. त्या संदर्भातही विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यापासून ते जबाबदारीने वर्तन करण्यापर्यंत समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मतही डॉ. गुरव यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment