Saturday 31 July 2021

विद्यापीठाकडून एका दिवसात उच्चांकी ११.५१ लाख लीटर पाणीपुरवठा

 

कोल्हापूर, दि. ३१ जुलै: शिवाजी विद्यापीठामार्फत काल शुक्रवारी (दि. ३० जुलै) एका दिवसात शहराला ११.५१ लाख लीटर इतका उच्चांकी पाणीपुरवठा करण्यात आला.

महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये विद्यापीठाने गेल्या रविवारपासून दररोज शहर व परिसराला महानगर पालिका प्रशासनाच्या सहकार्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. याअंतर्गत दररोज सरासरी सव्वातीन लाख पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, शहरवासियांची पाण्याची गरज भागविण्यासाठी विद्यापीठाने काल क्रीडा अधिविभागाशेजारील रुसा विहीर क्र.२ ला आणखी एक पंप वाढविला. त्या विहीरीतून दोन पाच हॉर्सपॉवरच्या पंपांच्या सहाय्याने दोन पॉईंटवरुन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे एकूण ७४ वाहनांच्या माध्यमातून तेथून एकूण ८ लाख ८८ हजार लीटर पाणी पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळील भरणा केंद्रातून तीस वाहनांतून २ लाख ६३ हजार लीटर पाणी पुरविण्यात आले. त्यामुळे काल एका दिवसांत विद्यापीठ शहराला ११ लाख ५१ हजार लीटर इतके उच्चांकी पाणी पुरवू शकले.

सदर पाणी पुरवठ्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, आयुक्त कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाचे मिलींद जाधव आणि कर्मचारी तसेच विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारीही सक्रिय योगदान देत आहेत.

तसेच, विद्यापीठ मुक्या जनावरांसाठी आपल्या परिसरातील गवत चारा म्हणूनही उपलब्ध करीत आहे. काल सुमारे शंभर पशुपालक शेतकऱ्यांनी ५५ मोटारसायकल, तीन ट्रॅक्टर्स, दोन रिक्षा, तीन एपे रिक्षा, दोन जीप ट्रॉली आणि चार बैलगाड्यांतून चारा नेला आहे.

धर्मनिरपेक्षता मूल्यातूनच लोकशाही बळकट

‘लोकशाही आणि अल्पसंख्याक विचार’ वेबिनारमध्ये तज्ज्ञांचा सूर

 

कोल्हापूर दि, ३१ जुलै: धर्मनिरपेक्षता या घटनात्मक मूल्याची जोपासना कसोशीने केल्यास लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा सूर लोकशाही आणि अल्पसंख्याक विचारया विषयावरील एकदिवसीय वेबिनारमध्ये विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलमेंट (वायसीएसआरडी) अधिविभागाच्या वतीने काल (दि. ३०) या वेबिनारचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के होते.

यावेळी सोलापूर येथील वालचंद कॉलेजच्या संस्कृत आणि प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. महावीर शास्त्री यांनी लोकशाही: जैन समाज विषयक विचार’, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी लोकशाही: मुस्लिम समाज विषयक विचार’, बेळगावच्या जी.एम.एस. कॉलेजचे प्राचार्य आनंद मेणसे यांनी लोकशाही: लिंगायत समाज विषयक विचारतर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी महर्षि शिंदे यांचे धर्मविषयक विचारया विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. महावीर शास्त्री म्हणाले, भगवान महावीर यांच्या काळातच लोकशाहीची बीजे रोवली गेली होती. अनेक धर्मांना सामावून घेणारा महावीरांचा अनेकान्तवाद याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, अल्पसंख्याक ही संकल्पना जगभरात आहे. संयुक्त राष्ट्रानेही अल्पसंख्याकांचे प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले आहे. भारतात अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाने इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा नीटपणे इस्लाम समजून घेणे आवश्यक आहे.

कृष्णा मेणसे म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी जातविरहित समाजाची संकल्पना मांडली होती. बसवेश्वर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे होते. जातव्यवस्था संपल्याशिवाय लोकशाही मूल्ये रूजणार नाहीत, अशी त्यांची धारणा होती.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, परिघाबाहेरील समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पसंख्याकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. यासाठी बहुसंख्यांनी स्वतःत बदल करावा. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशाच पद्धतीचे सर्वसमावेशक विचार केला होता.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, लोकशाही मूल्य रूजण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकशाहीला अनेकवेळा हादरे बसले असले तरी प्रत्येक वेळी लोकशाही त्यातून अधिक बळकट होत गेली. लोकशाहीत परस्पर सामंजस्य खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः सर्व समाजघटकांचे सौहार्द आणि अल्पसंख्याक समूहाकडे पाहण्याचा बहुसंख्याकांचा दृष्टीकोनही तितकाच सकारात्मक असला पाहिजे. यातून निकोप लोकशाही वाढीस लागण्यास मदत होईल.

डॉ. नितीन माळी यांनी स्वागत केले. डॉ. वैशाली भोसले आणि डॉ. संतोष सुतार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंतराव चव्हाण स्कूलचे प्रभारी संचालक प्रा. प्रकाश पवार यांनी वेबिनारचा हेतू विशद केला. डॉ. कविता वड्राळे यांनी आभार मानले.

Thursday 29 July 2021

शिवाजी विद्यापीठाकडून शहराला अविरत पाणीपुरवठा

 

विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाकडील विहीरीकडील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाकडील विहीरीतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी.



पाच दिवसांत १६ लाख लीटर पाणी पुरविले; 

जनावरांच्या चाऱ्यासाठी २५ ट्रॉली गवत

कोल्हापूर, दि. २९ जुलै: महापूरग्रस्त कोल्हापूरकरांची तहान भागविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून अविरत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी सव्वा तीन लाख लीटर या प्रमाणे १६ लाख लीटरचा पाणीपुरवठा आपल्या जलशुद्धीकरण केंद्रामधून केला आहे. त्याचप्रमाणे दररोज पाच ट्रॉली इतके गवतही जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण केंद्रे पुराच्या पाण्याखाली गेल्याने शहर व परिसराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. सन २०१९चा अनुभव लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातून यंदा पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा होऊन रविवार, दि. २४ जुलैपासून महानगरपालिकेच्या टँकर्समधून शहर परिसराला पिण्याचे पाणी पुरविले जाऊ लागले. रविवारी (दि. २४) २ लाख ७० हजार लीटर, सोमवारी (दि. २५) ३ लाख १८ हजार लीटर, मंगळवारी (दि. २६) ३ लाख २७ हजार ५०० लीटर, बुधवारी (दि. २७) २ लाख ७६ हजार लीटर आणि गुरूवारी (दि. २८) ४ लाख २५ हजार लीटर असे एकूण १६ लाख १६ हजार ५०० लीटर पाणी महानगरपालिकेच्या यंत्रणेद्वारे विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्रांमधून टँकरने शहराला पुरविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या एका जल शुद्धीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील विहीरीच्या विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागातील संशोधकांमार्फत पाण्याची नमुना तपासणी करण्यात आली. हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्राप्त झाल्यानंतर त्या विहीरीचे पाणीही उचलण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे दोन केंद्रांमधून आणखी गतीने पाणी पुरविणे शक्य होऊ लागले आहे. अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपकुलसचिव आर.पी. यादव आणि त्यांचे सर्व सहकारी याचे नियोजन करीत आहेत.

पाण्याप्रमाणेच जनावरांच्या चाऱ्यासाठी विद्यापीठाच्या परिसरातील काही राखीव कुरणांवरील गवत काढण्यास चारा छावण्या व गरजू नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दररोज पाच ट्रॉली भरेल, इतके गवत जनावरांसाठी विद्यापीठाकडून दिले जात आहे.

दरम्यान, काल सायंकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी क्रीडा अधिविभागाकडील विहीरीमधून करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्याची पाहणी केली. सलगपणाने उपसा होऊनही विहीरीतील पाण्याची पातळी उत्तम असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. महापालिका प्रशासनाकडून नियुक्त कर्मचारी आणि विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग हे अतिशय चांगला समन्वय राखून शहराला पाणी पुरवठा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे जोवर गरज लागेल, तोवर ही यंत्रणा सुरळीत राहील, याबाबत दक्षता घेण्याची सूचनाही केली.

नागरिकांकडून समाधान व्यक्त

शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात गेल्या काही वर्षांत सातत्याने जलसंवर्धनाचे, जल साठवणुकीचे विविध प्रयोग केले आहेत. परिणामी विद्यापीठाच्या परिसरात सुमारे ३२ कोटी लीटर पाणी साठविले जाते. त्याचेच फलित म्हणून महापुरामध्येही भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई काळात विद्यापीठ मदतीसाठी तत्परतेने कार्य करीत आहे. केवळ माणसांची तहानच नव्हे, तर जनावरांची भूक भागविण्याकडेही लक्ष देत आहे. एके काळी पाण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबून असणारे विद्यापीठ आता पाणी देणारे बनले आहे, याबद्दल नागरिकांतूनही मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Saturday 24 July 2021

पूरग्रस्त कोल्हापूरवासियांच्या मदतीसाठी सरसावले शिवाजी विद्यापीठ

 


(व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्रामधून महानगरपालिकेच्या टँकरद्वारे कोल्हापूर शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. टँकरमध्ये पाणी भरण्यात येत असताना. 

कोल्हापूर शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी शनिवार (दि. २४ जुलै) रोजी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्राद्वारे शहराला पाणी पुरविण्यास सुरवात करण्यात आली. या प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे सहकारी.

विद्यापीठाच्या जलप्रकल्पातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू;

परिसरातील गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी पुरविणार


कोल्हापूर, दि. २४ जुलै: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शहर व परिसरात निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्यासाठी परिसरातील गवत पुरविण्याचाही निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे काल शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न उद्भवल्याचे लक्षात येताच कालपासूनच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शहराला पाणी पुरविण्याची तयारी केली. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा होऊन आज सकाळपासून महानगरपालिकेच्या टँकरच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी पाळीव पशुधनासाठी चारा छावण्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पुरामुळे या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातून गवत पुरविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.

या संदर्भात माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन २०१९च्या पूरस्थितीमध्ये कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळीही शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून शहराला पिण्याचे पाणी पुरविले होते. गतानुभव लक्षात घेऊन यंदाही विद्यापीठाने आपली यंत्रणा तयार ठेवली होती. त्यानुसार शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यास आज सकाळपासून सुरवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असतो. त्यासाठीही विद्यापीठाने आपल्या परिसरातील गवत पुरविण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.


Saturday 10 July 2021

डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांना

‘आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स’ पुरस्कार

कोल्हापूर, दि. १० जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील संशोधक डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांची इंटरनॅशनल रिसर्च व सायन्स, हेल्थ अँड इंजिनीरिंग अर्थात सायन्स फादर संस्थेच्या 'आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सायन्स फादर ही संस्था दरवर्षी विज्ञान शाखेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या संशोधकांचा विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करते. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

त्यांना गतवर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच यावर्षी एडी सायंटिफिक या संस्थेच्या सर्वेक्षणात देखील जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांना स्थान लाभले आहे. त्यांना व्हिनस इंटरनॅशनल संस्थेमार्फत या वर्षीचा 'मटेरियल सायन्स विशेषज्ज्ञ' पुरस्कारही जाहीर झाला आहे.

डॉ. मोहोळकर यांनी विविध विषयांवर पेटंट मिळविले आहेत. शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतल्यानंतर दक्षिण कोरियातून पोस्ट डॉक्टरेट केले. २००९ साली बॉईजकास्ट फेलो म्हणून भारतातून ७२, तर महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ते एक आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १७५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांचा संदर्भ आधार जगभरातून ६८०० हून अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांमध्ये घेतला आहे. सध्या ते काही आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक व रिव्ह्यूअर म्हणून काम पाहतात. त्यांनी दीड कोटी रुपयांचे आठ मोठे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी डॉ. मोहोळकर पुढाकार घेतात. त्यांनी अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना परदेशांत पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

Friday 9 July 2021

फोटोकॅटॅलिसीस, सौरघट संशोधनात डॉ. पी.एस. पाटील देशात दुसरे

जागतिक ‘टॉप-१५०’ संशोधकांत समावेश; देशात सर्वाधिक संशोधन वाचले जाण्याचा बहुमान

 

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

डॉ. पी.एस. पाटील

कोल्हापूर, दि. ९ जुलै: फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक तथा प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत टॉप-१५०मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.

डॉ. पी.एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना केली जाते. काही काळापूर्वीच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या २ टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होतेच. त्याचप्रमाणे वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्येही डॉ. पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. नुकताच सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील स्कोपस डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये डॉ. पी.एस. पाटील हे १४७व्या स्थानी आहेत. त्यांच्यावर १३१व्या स्थानी ओडिशा येथील आय.टी.ई.आर. शिक्षा अनुसंधान या संस्थेचे डॉ. के.एम. परिदा हे आहेत. भारतीय संशोधकांच्या यादीत डॉ. पारिदा हे प्रथम स्थानी तर डॉ. पाटील हे द्वितिय स्थानी आहेत.

भारतीय संशोधकांच्या टॉप-५००च्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठातील अन्य सात संशोधकांनाही स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये डॉ. व्ही.एल. पाटील, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए.जी. दोड्डमणी, डॉ. ए.व्ही. मोहोळकर आणि डॉ. एन.एल. तरवाळ यांचा समावेश आहे.

सदर यादी सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील स्कोपस डाटाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या विज्ञानपत्रिकांमधून प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा आधार घेण्यात आला असून स्कॉलरली आऊटपुट, व्ह्यूज काऊंट, फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट आणि सायटेशन काऊंट आदींच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. पी.एस. पाटील यांचा स्कॉलरली आऊटपुट ८३ असून त्यांच्या संशोधनाला देशात सर्वाधिक ३७०८ व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट १.९१ इतका असून सायटेशन काऊंट १७२६ इतका आहे.

Dr. P.S. Patil
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत शिवाजी विद्यापीठ हे फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट या क्षेत्रांमध्ये भरीव संशोधन करीत आहे. या संशोधन क्षेत्रात आपण सातत्याने आघाडी टिकवून आहोत. गेल्या पाच वर्षांतील वाटचालही त्याला अपवाद नाही. त्याचेच हे फलित आहे. या पुढील काळातही व्यक्तीगत स्तरावर तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संशोधन परंपरा अखंडित पुढे चालवित राहणे महत्त्वाचे आहे. केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर जगभरात पसरलेले शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी सुद्धा संशोधनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देत आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

Prof. D.T. Shirke
या क्रमवारीची माहिती समजल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी ही सातत्याने चमकदार राहिली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य हे अभिनंदनीय स्वरुपाचे आहेच. त्यांच्या बरोबरीने विद्यापीठाच्या अन्य सात संशोधकांनीही देशातल्या आघाडीच्या ५०० संशोधकांत स्थान मिळविले, यातूनही विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सिद्ध होतो. त्यांची कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे. या संशोधकांसह समस्त संशोधक, विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधकीय कारकीर्दीत सातत्य राखून असे अनेक मानसन्मान प्राप्त करावेत, आपले स्थान उंचावत राहावे. त्यासाठी विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

काय आहे एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’?

'एल्सव्हिअर-सायव्हॅल ही वेब-बेस्ड संशोधन विश्लेषण प्रणाली असून सर्व देशांतील सुमारे २० हजार शैक्षणिक व संशोधन संस्था आणि तेथे कार्यरत असणारे संशोधक यांच्या संशोधनकार्याचा लेखाजोखा या प्रणालीद्वारे मांडला जातो. संशोधकाचा संशोधन प्रवास, संशोधनातील प्रवाह, नवसंशोधनाची त्यांची सांगड अशा अनेक अभिनव पद्धतीने हे विश्लेषण केले जाते. संशोधकांना वेळोवेळी ते पुरविले जाते. त्यासाठी जगातल्या पाच हजारांहून अधिक प्रकाशनांच्या २२ हजारांहून अधिक संशोधन पत्रिकांचे विश्लेषण सातत्याने केले जात असते. अशा सुमारे ५५ दशलक्ष प्रकाशित संशोधनांचा डाटा सायव्हॅलकडे आहे. ३०० ट्रिलियन मॅट्रिक व्हॅल्यूच्या आधारे तत्काळ विश्लेषण करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

Wednesday 7 July 2021

प्रिया पाटील हिच्या सेवाभावाचा

शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव

         

प्रिया पाटील हिचा ग्रंथभेट देऊन सत्कार करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत अभय जायभाये, प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. एच.बी. पाटील, प्रा. संदीप पाटील, चंद्रशेखर दोडमणी.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते गौरव स्वीकारल्यानंतर प्रिया पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या प्रसंगी तिच्यासमवेत राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक अभय जायभाये, प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. एच.बी. पाटील, प्रा. संदीप पाटील, चंद्रशेखर दोडमणी.

कोल्हापूर, दि. ७ जुलै: प्रिया पाटील हिने कोरोना कालखंडामध्ये सेवाभावाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिचे मदतकार्य सर्व तरुणाईसाठी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी गौरव केला.

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका असलेली प्रिया पाटील ही सध्या कोल्हापूरमध्ये कोविड-१९मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वाहून नेणाऱ्या शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने ती कोरोना काळात अखंड कार्यरत आहे. कोरोनाबधितांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यापर्यंत तसेच कोरोनाग्रस्तांच्या निधनानंतर मृतदेहाला शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन प्रसंगी अंत्यसंस्कार करण्याचे कामही करत आहे. आजपर्यंत २४० हून अधिक मृतदेह वाहून नेऊन त्यांच्यावर तिने अंत्यसंस्कार केले आहेत.

प्रिया पाटील हिच्या या कार्याबद्दल शिवाजी विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते तिचा ग्रंथभेट देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक अभय जायभाये, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, कार्यक्रम अधिकारी डॉ.एच बी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, अधीक्षक चंद्रशेखर दोडमणी उपस्थित होते.

 

विद्यापीठाच्या दुबार गुणपत्रिकेसाठी

ऑनलाईन संगणकप्रणालीचे लोकार्पण

 

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राच्या दुबार गुणपत्रिका ऑनलाईन पोर्टलचे लोकार्पण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि श्री. अमित कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राच्या दुबार गुणपत्रिका ऑनलाईन पोर्टलचा स्क्रीनशॉट


कोल्हापूर, दि. ७ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिकांची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीचे सोमवारी (दि. ५ जुलै) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते आणि व्यवस्थापन परिषदेचे कुलपतीनियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते studentapps.unishivaji.ac.in/suksfc/ या लिंकवर क्लिक करून सदर सेवेचे लोकार्पण करण्यात आले. उपरोक्त लिंकसह online.unishivaji.ac.in या पेजवर students online applications या टॅबवरही सदर सेवा उपलब्ध असणार आहे.

या सेवेमुळे विद्यार्थ्यांचा येण्याजाण्याचा खर्च, वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर त्यांना सध्याच्या कोविड-१९ साथीच्या कालखंडात जागेवर गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकणार आहे, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळात विद्यार्थीभिमुख अन्य सेवांचेही टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी केले.

विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिका घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी लागत असे. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने ऑनलाईन संगणक प्रणाली स्वनिर्मित केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारास ऑनलाईन अर्ज सादर करणे, पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरणे या बाबी ऑनलाईन स्वरुपात करता येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार विद्यार्थ्यास दुबार गुणपत्रिकेची सॉफ्ट कॉपी नोंदणीकृत ई-मेलवर तातडीने पाठविण्यात येईल, त्याचप्रमाणे त्याची मूळ दुबार गुणपत्रिका अर्जदाराकडून विहीत शुल्क आकारून त्याने नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे अगर हस्ते देण्यात येईल.

यावेळी विद्यापीठाच्या संगणक केंद्राच्या प्रभारी संचालक स्वाती खराडे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Thursday 1 July 2021

शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती

 

शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. शेजारी डॉ. व्ही. वाय. धुपदाळे.

शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. व्ही. वाय. धुपदाळे, व्ही.टी. पाटील.


कोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्ट्राच्या कृषीक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. व्ही. वाय. धुपदाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९च्या निकषांचे पालन करीत हा कार्यक्रम करण्यात आला.