कोल्हापूर, दि. १० जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील संशोधक डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांची ‘इंटरनॅशनल रिसर्च व सायन्स, हेल्थ अँड इंजिनीरिंग’ अर्थात ‘सायन्स फादर’ संस्थेच्या 'आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सायन्स फादर ही संस्था दरवर्षी विज्ञान शाखेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या संशोधकांचा विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करते. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
त्यांना गतवर्षी अमेरिकेच्या
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ %
शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच यावर्षी ‘एडी सायंटिफिक’ या
संस्थेच्या सर्वेक्षणात देखील जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांना स्थान लाभले आहे.
त्यांना ‘व्हिनस
इंटरनॅशनल’ संस्थेमार्फत
या वर्षीचा 'मटेरियल सायन्स विशेषज्ज्ञ' पुरस्कारही
जाहीर झाला आहे.
डॉ. मोहोळकर यांनी विविध विषयांवर
पेटंट मिळविले आहेत. शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतल्यानंतर दक्षिण
कोरियातून पोस्ट डॉक्टरेट केले. २००९ साली बॉईजकास्ट फेलो म्हणून भारतातून ७२, तर
महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ते एक आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय
स्तरावर १७५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांचा संदर्भ आधार जगभरातून
६८०० हून अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांमध्ये घेतला आहे. सध्या ते काही
आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक व रिव्ह्यूअर म्हणून काम
पाहतात. त्यांनी दीड कोटी रुपयांचे आठ मोठे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या
अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व
संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी डॉ. मोहोळकर पुढाकार घेतात. त्यांनी अनेक
गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना परदेशांत पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी मार्गदर्शन केले
आहे.
No comments:
Post a Comment