पाच दिवसांत १६ लाख लीटर पाणी पुरविले;
जनावरांच्या चाऱ्यासाठी २५ ट्रॉली गवत
कोल्हापूर, दि. २९
जुलै: महापूरग्रस्त कोल्हापूरकरांची तहान भागविण्यासाठी शिवाजी
विद्यापीठाकडून अविरत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी सव्वा तीन लाख लीटर या प्रमाणे १६
लाख लीटरचा पाणीपुरवठा आपल्या जलशुद्धीकरण केंद्रामधून केला आहे. त्याचप्रमाणे
दररोज पाच ट्रॉली इतके गवतही जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण केंद्रे पुराच्या पाण्याखाली गेल्याने शहर व परिसराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. सन २०१९चा अनुभव लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातून यंदा पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा होऊन रविवार, दि. २४ जुलैपासून महानगरपालिकेच्या टँकर्समधून शहर परिसराला पिण्याचे पाणी पुरविले जाऊ लागले. रविवारी (दि. २४) २ लाख ७० हजार लीटर, सोमवारी (दि. २५) ३ लाख १८ हजार लीटर, मंगळवारी (दि. २६) ३ लाख २७ हजार ५०० लीटर, बुधवारी (दि. २७) २ लाख ७६ हजार लीटर आणि गुरूवारी (दि. २८) ४ लाख २५ हजार लीटर असे एकूण १६ लाख १६ हजार ५०० लीटर पाणी महानगरपालिकेच्या यंत्रणेद्वारे विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्रांमधून टँकरने शहराला पुरविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या एका जल शुद्धीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील विहीरीच्या विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागातील संशोधकांमार्फत पाण्याची नमुना तपासणी करण्यात आली. हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्राप्त झाल्यानंतर त्या विहीरीचे पाणीही उचलण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे दोन केंद्रांमधून आणखी गतीने पाणी पुरविणे शक्य होऊ लागले आहे. अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपकुलसचिव आर.पी. यादव आणि त्यांचे सर्व सहकारी याचे नियोजन करीत आहेत.
पाण्याप्रमाणेच जनावरांच्या चाऱ्यासाठी विद्यापीठाच्या परिसरातील काही राखीव कुरणांवरील
गवत काढण्यास चारा छावण्या व गरजू नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार
दररोज पाच ट्रॉली भरेल, इतके गवत जनावरांसाठी विद्यापीठाकडून दिले जात आहे.
दरम्यान, काल सायंकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी क्रीडा
अधिविभागाकडील विहीरीमधून करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्याची पाहणी केली.
सलगपणाने उपसा होऊनही विहीरीतील पाण्याची पातळी उत्तम असल्याचे पाहून त्यांनी
समाधान व्यक्त केले. महापालिका प्रशासनाकडून नियुक्त कर्मचारी आणि विद्यापीठाचा
अभियांत्रिकी विभाग हे अतिशय चांगला समन्वय राखून शहराला पाणी पुरवठा करण्यामध्ये
महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे जोवर गरज लागेल, तोवर ही यंत्रणा सुरळीत राहील, याबाबत दक्षता
घेण्याची सूचनाही केली.
नागरिकांकडून समाधान व्यक्त
शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात गेल्या काही वर्षांत सातत्याने
जलसंवर्धनाचे, जल साठवणुकीचे विविध प्रयोग केले आहेत. परिणामी विद्यापीठाच्या
परिसरात सुमारे ३२ कोटी लीटर पाणी साठविले जाते. त्याचेच फलित म्हणून
महापुरामध्येही भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई काळात विद्यापीठ मदतीसाठी
तत्परतेने कार्य करीत आहे. केवळ माणसांची तहानच नव्हे, तर जनावरांची भूक भागविण्याकडेही
लक्ष देत आहे. एके काळी पाण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबून असणारे विद्यापीठ
आता पाणी देणारे बनले आहे, याबद्दल नागरिकांतूनही मोठे समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
No comments:
Post a Comment