Wednesday 27 July 2022

विद्यापीठाच्या ‘एनएसएस’चे कार्य आदर्शवत: जयंत किशोर




कोल्हापूर, दि. २७ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य समाजाभिमुख आणि आदर्शवत स्वरुपाचे आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचे सहाय्यक सचिव जयंत किशोर (आय.ए.एस.) यांनी काल येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागास काल श्री. किशोर यांनी भेट देऊन योजनेच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी यांच्यासमवेत आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी श्री. किशोर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेशी निगडित घटकांसाठी शासकीय स्तरावर आणखी धोरणात्मक योजना आखण्याचा मनोदय असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी कुलसचिव डॉ शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही स्वयंसेवकांच्या तनामनामध्ये रुजलेली असते त्यातून त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास घडतो.

यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अभय जायभाये यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ. संजय ठिगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार व माजी राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ समन्वयक डॉ.संजय ठिगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पोपटराव माळी यांनी आभार मानले. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ४५० स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी, श्री. किशोर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्याशी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांबाबत चर्चा केली. त्यानंतर विद्यापीठातील व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागांना भेटी दिल्या.

Monday 25 July 2022

ज्ञानसंपन्न पिढीच्या निर्मितीसाठी नवे शैक्षणिक धोरण राबविणे आवश्यक: शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेतील सूर

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित नव्या शैक्षणिक धोरणविषयक विशेष कार्यशाळेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. बी.एन. जगताप, आनंद मापुस्कर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. आर.एस. माळी, अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन आणि कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.



कोल्हापूर, दि. २५ जुलै: भारताची युवा पिढी ज्ञानसंपन्न आणि विचारी होऊन तिने देशाच्या सामाजिक-आर्थिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये योगदान देण्यास सक्षम बनविण्याच्या दृष्टीने नवे शैक्षणिक धोरण राबविले जाणे आवश्यक आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत उमटला.

विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आज शिक्षणसंस्था चालक, त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी नवे शैक्षणिक धोरण (उच्च शिक्षण): उद्दिष्ट्ये व अंमलबजावणी या विषयावर विशेष एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एन. जगताप, डॉ. आर.एस. माळी आणि आनंद मापुस्कर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

Dr. B.N. Jagtap
यावेळी डॉ. जगताप यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा सर्वंकष आढावा आपल्या व्याख्यानात घेतला. ते म्हणाले, सन १८३५ पासून देशात शैक्षणिक सुधारणेच्या अनुषंगाने साधारण वीस महत्त्वाची धोरणे आली. तथापि, त्यातल्या कित्येक चांगल्या गोष्टी आपण अंमलात आणल्या नाहीत. परिणामी, आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. सन १८८२मध्ये महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर एतद्देशीय विद्यार्थ्यांना गणित, इतिहास, व्याकरण, भूगोल इत्यादी विषयांच्या पलिकडे जाऊन शेतीचे मूलभूत शिक्षण देण्याची सूचना केलेली होती. तांत्रिक कलाकौशल्यांचे प्रदान शालेय जीवनापासून करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. इथली नवी पिढी केवळ पोथीनिष्ठ राहू नये, तर ती कार्यकुशलही व्हावी, यासाठी ते आग्रही होते. त्यानंतरच्या शंभर वर्षांत सुद्धा शिक्षण म्हणजे केवळ विद्यार्थ्याला सुसंस्कृत बनविणे, एवढाच मर्यादित हेतू बाळगून काम सुरू राहिले. मात्र, या शिक्षणाने आपला विद्यार्थी रोजगाराभिमुख झाला का, त्याला रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त झाली का, एकविसाव्या शतकामध्ये जगण्यासाठीची कौशल्ये त्याला मिळाली का, शिपायाच्या नोकरीसाठी पीएच.डी. पदवीधारक मुले का अर्ज करतात, आपले विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी का जाऊ इच्छितात, असे अनेक प्रश्न अनुत्तरित स्वरुपात आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. लोकांकडे पैसा आहे, मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. अर्थकारण व शिक्षण यांच्यातील संबंध हे वर्तुळाकार असतात. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना या क्षेत्रातील शिक्षकांसह धुरिणांनी आपल्या विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानून अंमलबजावणी केल्यास ते निश्चितपणे हितावह ठरेल. परदेशी शिक्षणसंस्था आज भारतात येऊन उलाढाल करण्यात उत्सुक आहेत कारण सुमारे ३०० अब्ज डॉलरची उलाढाल त्यांना खुणावते आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांनीच या क्षेत्रामध्ये अधिक उत्तुंग कामगिरी करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

प्रा. आर.एस. माळी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमधील मूल्यांकनाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाचा सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण संस्थांच्या सद्यस्थितीमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना मंजूर असलेल्या जागा, अनुदान, विनाअनुदान यांची संरचना जशीच्या तशी राहणार आहे. तथापि, त्यांनी स्वायत्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी नॅकचे मूल्यांकन करून घेणे आवश्यक ठरणार आहे. नॅकच्या मूल्याकनानुसार त्यांच्या गुणवत्तेची प्रतवारी निर्धारित केली जाऊन त्यांना त्या अनुषंगाने विविध सोयी-सवलती प्रदान केल्या जाणार आहेत. अशा नॅकला अद्याप सामोऱ्या न गेलेल्या महाविद्यालयांना विशेष कार्यशाळा घेऊन प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

यावेळी आनंद मापुस्कर म्हणाले, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाने, विशेषतः शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या भावी पिढ्यांच्या शैक्षणिक-सांस्कृतिक प्रगतीसाठी ते अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी छोटे-छोटे आधुनिक व गरजेचे अभ्यासक्रम राबविले जाण्याचीही आवश्यकता आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये संस्थाचालकांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरणार आहे. येत्या दहा ते पंधरा वर्षांत शिक्षण क्षेत्रात आपल्या केवळ संख्यात्मकच नव्हे, तर गुणात्मक बदलही घडवायचे आहेत. या कालावधीत उच्चशिक्षणाचा सकल प्रवेश निर्देशांक ५० टक्क्यांच्या घरात न्यावयाचा आहे. म्हणूनच आता आधुनिक शिक्षणाचा अंगिकार करून शिक्षणाचा चौफेर विस्तार करण्याचा निर्धार आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांचे संचालक, सचिव, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Friday 22 July 2022

संशोधन नितीमत्तेतूनच गुणात्मक दर्जा प्राप्त करणे शक्य: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात “संशोधन व प्रकाशन नितीमानता” या विषयावर राष्ट्रीय वेबिनार


कोल्हापूर, दि. २२ जुलै: संशोधकीय नितीमत्तेखेरीज शैक्षणिक कार्यात कोणत्याही प्रकारचा गुणात्मक दर्जा प्राप्त करता येणे अशक्य आहे. त्यामुळे या नितीमत्तेला संशोधकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग यांच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज “संशोधन व प्रकाशन नितीमानता” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

      या वेबिनारसाठी डॉ. मुरारी पी. तपस्वी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा व डॉ. महेंद्र. एन. जाधव, ग्रंथपाल, केंद्रीय ग्रंथालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मद्रास (चेन्नई) हे मार्गदर्शक होते. वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी प्र–कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी संशोधन पद्धती आराखडा, शास्त्र / सामाजिक शास्त्रातील संशोधन इत्यादींच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिनकुमार पाटील, प्रभारी अधिविभागप्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.पी.बी. बिलावर यांनी अनुक्रमे डॉ. मुरारी पी. तपस्वी व डॉ. महेंद्र. एन. जाधव या मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. डॉ. मुरारी पी. तपस्वी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांनी “रिसर्च इंटिग्रिटी: बर्ड्स आय व्ह्यू” या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. महेंद्र. एन. जाधव, ग्रंथपाल, केंद्रीय ग्रंथालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मद्रास (चेन्नई) यांनी “क्राइटेरिया फॉर सिलेक्टिंग जर्नल फॉर पब्लिकेशन” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. एस. व्ही. थोरात यांनी प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले. डॉ. आर. डी. खामकर यांनी आभार मानले. या वेबिनारसाठी देशभरातील ५०० हून अधिक अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधक  विद्यार्थी संग्राम किल्लेदार यांनी केले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी

मनुष्यबळ व्यवस्थापकांचे योगदान महत्वाचे: डॉ. ए.एम. गुरव

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उपस्थित मानव संसाधन व्यवस्थापकांशी संवाद साधताना डॉ. ए.एम. गुरव.

कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिक्षणव्यवस्थेत येत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे गरजेचे आहे. सर्वांच्या योगदानातून या धोरणानुसार होणारे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत उद्योग क्षेत्रातील मानव संसाधन व्यवस्थापकांनी सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका बजावावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए.एम. गुरव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील उद्योजक व मानव संसाधन व्यवस्थापक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२०: उद्योजक व मानव संसाधन व्यवस्थापक यांची भूमिका या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. गुरव बोलत होते. यावेळी संजय बेनके, संघसेन जगतकर, अनंत पाटील उपस्थित होते.

डॉ. गुरव म्हणाले, येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिवाजी विदयापीठ तयार असून धोरणानुरुप होणारे बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम व उद्योगक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक धोरणात समाजातील अनेक घटकांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना वाव मिळणार आहे. हेच विद्यार्थी उद्या देशाची सेवा करणार आहेत. ही सेवा देशाला प्रगतीपथावर नेणारी ठरावी, यासाठी शिक्षण व्यवस्थेत उद्योग क्षेत्राने मार्गदर्शकाची  भूमिका चांगल्या प्रकारे निभावणे गरजेचे आहे.

यावेळी संघसेन जगतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य मानव संसाधन व्यवस्थापक उपस्थित होते. महेश चव्हाण यांनी आभार मानले.

Wednesday 20 July 2022

वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना

शिवाजी विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

वसंत आबाजी डहाके

दिशा पिंकी शेख


कोल्हापूर, दि. २० जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चासतीश काळसेकर काव्य पुरस्कारज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना, तरऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारदिशा पिंकी शेख (श्रीरामपूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

कवी सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार देण्यात येतात. अनुक्रमे रुपये २१,०००/- व १०,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सतीश काळसेकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून शिवाजी विद्यापीठातर्फे प्रतिवर्षी दोन पुरस्कार देण्यात येत आहेत. काव्यक्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या कवीस दर वर्षीसतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर नव्या पिढीतील कवीसऋत्विज काळसेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

वसंत आबाजी डहाके प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, ललित गद्यलेखक व संपादक म्हणून परिचित आहेत. साठोत्तरी पिढीतील ते महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी आधुनिकतावादी व राजकीय जाणिवांची लिहिलेली कविता महत्त्वाची आहे. लघुनियतकालिक चळवळीत त्यांचा महत्त्वाचा असा सहभाग होता. कविता, समीक्षा, कलामीमांसा या क्षेत्रातील त्यांची कामगिरी मौलिक ठरली. कवितेविषयी, काव्यप्रतिती, कविता विसाव्या शतकाची, मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती, मराठी समीक्षेची सद्य:स्थिती अशा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. अतिशय गांभीर्यपूर्ण आणि चिंतनशील लेखनाबरोबरच त्यांनी ज्ञानकोशनिर्मितीमध्येही मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्या या वाङ्मयीन योगदानाबद्दल पहिल्यासतीश काळसेकर काव्य पुरस्कारासाठी  वसंत आबाजी डहाके यांची निवड केली आहे.

ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारदिशा पिंकी शेख यांना जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख ह्या सामाजिक कार्यकर्त्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून सर्वपरिचित आहेत. भारतीय जनजीवनातील लिंगभाव, जातीयवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद, समूहांच्या अस्मिता, स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंतीचा अनोखा पट त्यांनी आपल्या कवितांतून चित्रित केला आहे. पारलिंगी समूहातील स्त्रियांचे दु:, तृतीयपंथीयांचे प्रश्न त्यांनीकुरूपया काव्यसंग्रहातून मांडले आहेत. रुपये दहा हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. अविनाश सप्रे, डॉ. नितीन रिंढे (मुंबई) आणि डॉ. गोविंद काजरेकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले.  

पुरस्कार प्रदान समारंभ दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली आहे.


सतीश काळसेकर
ऋत्विज काळसेकर

Saturday 16 July 2022

वैज्ञानिक माहितीची जोड लाभल्यास रेशीमशेतीच्या उत्पादनात वाढ: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. सोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. सोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेतील सहभागी शेतकऱ्यांसमवेत चर्चा करताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटीलसोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेतील सहभागी शेतकऱ्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटीलसोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.


शेतकऱ्यांसाठी प्राणीशास्त्र विभागात रेशीमशास्त्रविषयक कार्यशाळा

कोल्हापूर, दि. १६ जुलै: रेशीम शेती करणारे राज्यभरातील शेतकरी कौशल्यप्राप्तीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात शिक्षण घेतात. या शेतकऱ्यांनी प्रवेश घेतलाच, परंतु यशस्वीपणे परीक्षाही दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नांना मिळत असलेली ही पोचपावती आहे. शेतकरी हुशार असतोच, मात्र त्याला विज्ञानाची जोड मिळाल्यास रेशीम शेती उत्पादन आणि गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी आज सकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या सेंटर ऑफ एक्सन्स ॲन्ड इनक्युबेशन इन सेरिकल्चर यांच्या वतीने निलांबरी सभागृहात एकदिवसीय राज्यस्तरीय 'रेशीम शास्त्र कौशल्य तंत्रज्ञान' कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यसाळेचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. राज्यातील बारा जिल्ह्यांतील ५०हून अधिक शेतकरी कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलले असून तो अधिक स्वावलंबी व स्वाभिमानी बनला आहे. शेतकरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे. त्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास शिवाजी विद्यापीठ तत्पर आहे. चंद्रपूरपासून ते सिंधुदुर्गपर्यंतचे शेतकरी कार्यशाळेला उपस्थित आहेत, ही महत्त्वाची व उत्साहवर्धक बाब आहे. येथे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची तसेच स्वत:चा रेशीम शेतीमधील आत्मविश्वास वाढविण्याची तळमळ दिसून येते. शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठामार्फत विविध संकल्पना आणि योजना उपलब्ध करून देण्याचा आमचा यापुढेही प्रयत्न राहील.

यावेळी अभियंते दामोदर पांढरे, प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. शिष देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत रेशीम शेती, अंडीपुंज निर्मिती, धागा निर्मिती, रेशीम शेती सेवा केंद्र अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उस्मानाबादचे बापू नहाने, राधानगरी तालुक्यातील दीपक शेट्टी, सांगोला येथील विष्णू काशीद, पुणे येथील विजय गारगोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. ए. डी. जाधव यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, कृषी विभागाचे उपसंचालक रविंद्र फाटक आदी उपस्थित होते.