Wednesday 27 July 2022

विद्यापीठाच्या ‘एनएसएस’चे कार्य आदर्शवत: जयंत किशोर




कोल्हापूर, दि. २७ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य समाजाभिमुख आणि आदर्शवत स्वरुपाचे आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचे सहाय्यक सचिव जयंत किशोर (आय.ए.एस.) यांनी काल येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागास काल श्री. किशोर यांनी भेट देऊन योजनेच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी यांच्यासमवेत आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी श्री. किशोर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेशी निगडित घटकांसाठी शासकीय स्तरावर आणखी धोरणात्मक योजना आखण्याचा मनोदय असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी कुलसचिव डॉ शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही स्वयंसेवकांच्या तनामनामध्ये रुजलेली असते त्यातून त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास घडतो.

यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अभय जायभाये यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ. संजय ठिगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार व माजी राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ समन्वयक डॉ.संजय ठिगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पोपटराव माळी यांनी आभार मानले. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ४५० स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी, श्री. किशोर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्याशी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांबाबत चर्चा केली. त्यानंतर विद्यापीठातील व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागांना भेटी दिल्या.

No comments:

Post a Comment