Friday, 22 July 2022

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी

मनुष्यबळ व्यवस्थापकांचे योगदान महत्वाचे: डॉ. ए.एम. गुरव

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उपस्थित मानव संसाधन व्यवस्थापकांशी संवाद साधताना डॉ. ए.एम. गुरव.

कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिक्षणव्यवस्थेत येत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे गरजेचे आहे. सर्वांच्या योगदानातून या धोरणानुसार होणारे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत उद्योग क्षेत्रातील मानव संसाधन व्यवस्थापकांनी सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका बजावावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए.एम. गुरव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील उद्योजक व मानव संसाधन व्यवस्थापक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२०: उद्योजक व मानव संसाधन व्यवस्थापक यांची भूमिका या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. गुरव बोलत होते. यावेळी संजय बेनके, संघसेन जगतकर, अनंत पाटील उपस्थित होते.

डॉ. गुरव म्हणाले, येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिवाजी विदयापीठ तयार असून धोरणानुरुप होणारे बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम व उद्योगक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक धोरणात समाजातील अनेक घटकांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना वाव मिळणार आहे. हेच विद्यार्थी उद्या देशाची सेवा करणार आहेत. ही सेवा देशाला प्रगतीपथावर नेणारी ठरावी, यासाठी शिक्षण व्यवस्थेत उद्योग क्षेत्राने मार्गदर्शकाची  भूमिका चांगल्या प्रकारे निभावणे गरजेचे आहे.

यावेळी संघसेन जगतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य मानव संसाधन व्यवस्थापक उपस्थित होते. महेश चव्हाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment