Saturday, 30 October 2021

विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे केशवराव जेधे तेजस्वी पर्व: डॉ. अरुण भोसले

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अरुण भोसले

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अरुण भोसले


कोल्हापूर, दि. ३० ऑक्टोबर: विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनातील केशवराव जेधे हे तेजस्वी पर्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची योग्य दखल घेतल्याखेरीज आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अरुण भोसले यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने संयोजित डॉ. उषा मेहता स्मृती व्याख्यानमाला-२०२१अंतर्गत देशभक्त केशवराव जेधे: कार्यकर्तृत्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ होते.

डॉ. अरुण भोसले म्हणाले, महाराष्ट्राच्या जनमानसावर आपल्या व्यक्तीमत्त्वाचा तेजस्वी प्रभाव केशवराव जेधे यांनी प्रस्थापित केलेला होता. ते केवळ सामाजिक, राजकीय नेते होते, असे नव्हे; तर, लेखक, पत्रकार, शिक्षक, गीतकार, कवी, गायक असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व त्यांना लाभलेले होते. सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची अनोखी शैली त्यांना लाभलेली होती. त्यांची भाषा साधीसोपी, खोचक आणि परखड असे. निर्भयता आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्या वक्तृत्व, लेखनाची वैशिष्ट्ये होती.

डॉ. भोसले पुढे म्हणाले, केशवराव जेधे यांच्या जीवनकर्तृत्वाचे प्रामुख्याने चार टप्पे होतात. सन १९१७-१८ ते १९२८-२९ या साधारण दशकभराच्या कालखंडात सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीचे त्यांनी जवळकरांच्या साथीने अत्यंत जोरकस नेतृत्व केले. ब्राह्मणेतर चळवळीला जहाल सुधारणावादी स्वरुप प्रदान करीत ही चळवळ महाराष्ट्रात सर्वदूर विस्तारित करण्याचे कार्य त्यांनी या काळात केले. त्यानंतर १९३० ते १९४८ या कालखंडात त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून काकासाहेब गाडगीळ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. पुढे काँग्रेसमधून बाहेर पडून १३ मे १९४८ रोजी तुळशीदास जाधव आणि शंकरराव मोरे यांच्या साथीने भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना त्यांनी केली. काँग्रेसला सक्षम पर्याय उभा करण्याचा त्यांचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. सन १९५४मध्ये ते काँग्रेसमध्ये अर्थात स्वगृही परतले. कदाचित संघटनेत यावेळी त्यांना दुय्यम स्थान लाभले असेल, मात्र जनमानसावरील त्यांचा प्रभाव, सन्मान हा १२ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेईपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील सर्वसामान्यांचे ते जणू दैवत बनलेले होते.

किशोर बेडकीहाळ
अध्यक्षीय भाषणात किशोर बेडकीहाळ म्हणाले, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील जहाल नेते हे सनातन विचारांचे कट्टर समर्थक असल्याने जहाल म्हणजे सुधारणाविरोधी असे चित्र निर्माण झालेले होते. या पार्श्वभूमीवर केशवराव जेधे यांचे जहालपण हे सुधारणांच्या बाजूने, सुधारणांसाठीचे होते, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांचे नेतृत्व हे तत्कालीन सार्वजनिक जीवनात म्हणूनच वेगळे उठून दिसणारे आहे. जेधे हे हाडाचे कार्यकर्ते होते. लोकांमध्ये रमणे, संघटन करणे आणि लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाणे, हा त्यांचा पिंड होता. म्हणूनच शेवटपर्यंत जनमानसातील नेतृत्व म्हणून त्यांचे स्थान अबाधित राहिले. डॉ. भोसले यांनी जेधे यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची समग्र देखल घेत अत्यंत रास्तपणे, संयमाने तर्कतथ्यांनिशी केलेली मांडणी महत्त्वाची आहे.

यावेळी गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. एस.एस. महाजन, अशोक बाबर, डॉ. बी.एम. हिर्डेकर, दशरथ पारेकर, नंदा पारेकर, डॉ. अरुण शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment