कोल्हापूर, दि. ५ सप्टेंबर: कोविड-१९ च्या महामारीने शिक्षणाची,
जगण्याची सर्व परिमाणे बदलून टाकली असताना या नव्या ‘न्यू
नॉर्मल’शी जोडून घेण्यामध्ये आपले शेतकरी बांधवही मागे
नाहीत. याची प्रचिती शिवाजी विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विषयातील पदविका
अभ्यासक्रमांदरम्यान आली. राज्याच्या विविध भागांतील ४६ शेतकऱ्यांनी या
अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ऑनलाईन माध्यमातून हे अभ्यासक्रम पूर्ण केलेच; शिवाय, आता ते ऑनलाईन परीक्षाही यशस्वीपणे देत आहेत. नवतंत्रज्ञानाच्या
माध्यमातून शेतीतील नवे ज्ञान आत्मसात करण्याची या शेतकऱ्यांची ही जिज्ञासा तरुण
विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक स्वरुपाची ठरली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स अॅन्ड इनक्युबेशन इन सेरीकल्चर यांच्यामार्फत सन
२०१७-१८पासून रेशीमशास्त्र पदविका आणि पदव्युत्तर पदविका हे अभ्यासक्रम खास शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात
आले. देशातील अकृषी व कृषी विद्यापीठांत अशा प्रकारचा अभ्यासक्रम
चालविणारे शिवाजी विद्यापीठ पहिलेच आणि एकमेव आहे. दरवर्षी पदविका व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 40 जागांवर रेशीमशेती करू इच्छिणारे,
तसेच त्याविषयी अभ्यास करू इच्छिणारे शेतकरी, प्रवेश घेतात. कौशल्याला शास्त्रीय ज्ञानाची
जोड मिळाल्याने त्यातील अनेक यशस्वी रेशीम उद्योजक बनले आहेत.
गेल्या वर्षभरात कोविड-१९चा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी सदर अभ्यासक्रमात ऑनलाईन सहभागी झाले. ४ विषयांसाठीची ऑनलाईन
व्याख्याने, एक प्रात्यक्षिक
पेपर व एका प्रकल्पाद्वारे त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला. या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन परीक्षेला कालपासून (दि.
४) सुरवात झाली. खाद्यवनस्पती लागवड व व्यवस्थापन या विषयाची ऑनलाईन
परीक्षा ४६ शेतकऱ्यांनी
यशस्वीरित्या दिली. ही परीक्षा ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. ए.ए. देशमुख, रेशीमशास्त्र अभ्यासक्रम समन्वयक डॉ. ए.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा
प्रमुख डॉ. अण्णा गोफणे परीक्षा यशस्वीपणे
पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment