शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलताना डॉ. नरेंद्र विसपुते |
कोल्हापूर, दि. २३ सप्टेंबर: भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये
करिअर करण्याच्या मुबलक संधी आहेत. त्यासाठी योग्य तयारी करून त्यांचा लाभ
घेण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मुंबई दूरदर्शन केंद्राचे
सहाय्यक संचालक व संरक्षण विभागाचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. नरेंद्र विसपुते (आय.आय.एस.)
यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये 'संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. विसपुते यांनी संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी अगदी पहिलीपासून कशा प्रकारे शैक्षणिक संधी
आहेत, याची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले, जिथे जिथे संरक्षणविषयक क्षेत्रे,
कार्यालये आहेत, अशा कॅन्टॉनमेंट क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यांच्या
शाळा असतात. अशा शाळांमध्ये विद्यार्त्यांना प्रवेश घेता येतो. ‘सी-कॅडेट’ स्कूलमध्ये चौथीपासून प्रवेश घेता
येतो. तिथे या विद्यार्थ्यांना अगदी तराफा बांधणीपासून ते तराफा, छोट्या बोटी
चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात येते. त्याखेरीज देशभरात ३१ सैनिक स्कूल आणि पाच
मिलीट्री स्कूल आहेत. त्यांमध्ये सहावी आणि नववी या दोन टप्प्यांवर प्रवेश घेता
येतो. दहावीनंतर तिन्ही संरक्षण दलांमध्ये ग्राऊंड लेव्हल भरती करण्यात येते.
त्यांत जवानांपासून ते सर्व प्रकारच्या पदांच्या भरतीचा समावेश असतो. बारावीनंतर
एनडीएच्या माध्यमातून प्रवेशाचा राजमार्ग तर सर्वांनाच ठाऊक आहे. एनडीएद्वारे
विद्यार्थिनींसाठी तिन्ही दलांसाठी ऑफिसर्स स्तरीय भरती आणि प्रशिक्षणही देण्यात येते. पदवी
परीक्षेनंतर कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस (सी.डी.एस.) या माध्यमातून संरक्षण दलात
ऑफिसर पदासाठी तसेच पदव्युत्तर पात्रतेनंतरही शैक्षणिक, लॉजिस्टीक्स, प्रशासकीय
अशा अनेक सेवांमध्ये संधी आहेत. तांत्रिक पदांमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी
टेक्नीकल ग्रॅज्युएशन केलेले असणे आवश्यक आहे. Dr. Narendra Vispute
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. पी.एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment