शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसमवेत |
कोल्हापूर, दि.
३० सप्टेंबर: शिवाजी
विद्यापीठ परिवारातील विविध घटकांसह कोल्हापूरकरांकडून लाभलेले प्रेम व सहकार्य
अविस्मरणीय स्वरुपाचे आहे, अशा भावना विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतून
पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच.डी. संशोधन पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या परदेशी
विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
विद्यापीठाच्या अधिविभागांमध्ये तसेच संलग्नित महाविद्यालयांत केंद्रीय परराष्ट्र
विभागाच्या इंडियन कौन्सिल
फॉर कल्चरल रिलेशन्स (नवी दिल्ली) स्कॉलरशीप स्कीम अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये पदवीसाठी व सन २०१९-२० मध्ये
पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी प्रवेशित झालेले होते. त्याचप्रमाणए सन
२०१७-१८मध्ये पीएच.डी.साठीही काही विद्यार्थी प्रवेशित झाले. सदर विद्यार्थ्यांनी येथील शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना निरोपादाखल मंगळवारी सायंकाळी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
परदेशी
विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये आपल्याला खूपच आपुलकी लाभल्याचे सांगितले.
विशेषतः कोविड-१९ साथीच्या कालखंडात घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही
विद्यापीठाने खूप जिव्हाळ्याने काळजी घेतली. विशेषतः आंतरराष्ट्रीय कक्षाचे डॉ.
अनिल घुले, वसतीगृह अधीक्षक डॉ. जे.बी. यादव यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी विशेष
कृतज्ञता व्यक्त केली. संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही
कोल्हापूरवासीयांकडून कोठेही परकेपणाची वागणूक मिळाली नाही. येथील नागरिकांमध्ये
खूप आत्मियतेची भावना असल्याचे नमूद केले. या प्रेमाबद्दल विद्यापीठाचे तसेच
कोल्हापूरचे आपण कायम ऋणी आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यांनी कोविड-१९सारख्या विपरित परिस्थितीतूनही या विद्यार्थ्यांनी आपापले
अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले.
त्याचप्रमाणे त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिर्के
यांच्या हस्ते विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.
डॉ. जी.एस. राशीनकर यांनी या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्याबाबतची
कार्यवाही केली. यावेळी डॉ. ए. व्ही. घुले यांनी प्रास्ताविक
केले, तर जे.बी. यादव यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन
मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. व्ही. वाय.
धुपधाळे आदी उपस्थित होते.
इराणचे वर्घा मोखलेसी विद्यापीठाचे पहिले परदेशी पीएच.डी.धारक विद्यार्थी
सन २०१७-१८मध्ये
शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र या विषयात पीएच.डी.साठी प्रवेश घेणारे वर्घा बाहमन
मोखलेसी हे इराणचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे
पहिले परदेशी विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्यासह एकूण २० विद्यार्थ्यांनी यंदा
शिवाजी विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यात तीन पदवी
स्तरावरील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांत इराक, मॉरिशस,
अफगाणिस्तान, मोझांबिक आणि गिनिआ बिस्सू या देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहेत.
यात चार विद्यार्थिनीही आहेत.
No comments:
Post a Comment