Monday, 20 September 2021

डॉ. मेघा पानसरे संपादित ‘विदेशी भाषा: शिक्षण आणि करिअर’चे विद्यापीठात प्रकाशन

विदेशी भाषांमधील संधींची साकल्याने माहिती देणारा ग्रंथ: डॉ. दिलीप चव्हाण

 

डॉ. मेघा पानसरे संपादित ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन करताना डॉ. उज्ज्वला बर्वे

प्रमुख वक्ते डॉ. दिलीप चव्हाण

पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ


कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: विदेशी भाषांमधील शिक्षण व करिअर संधींची साकल्याने माहिती देणारा ग्रंथ डॉ. मेघा पानसरे यांनी साकारला आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी भाषा विभागाचे डॉ. दिलीप चव्हाण यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी संपादित केलेल्या विदेशी भाषा: शिक्षण आणि करिअर या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख तथा रशियन व जर्मन भाषेच्या अभ्यासक, भाषांतरकार डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या हस्ते पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.

डॉ. चव्हाण म्हणाले, डॉ. पानसरे यांनी संपादित केलेले पुस्तक हे व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आहेच, शिवाय मराठी भाषेतून विदेशी भाषांविषयीची माहिती देण्यात आल्याने जिज्ञासू विद्यार्थ्यांची गरज या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. भारताचे परकीय भाषाविषयक धोरण आजतागायत निश्चित झालेले नाही. त्या धोरणाची निश्चिती होणे आजघडीची मोठी गरज आहे. इंग्रजीखेरीज आणखी एखादी परकीय भाषा शालेय स्तरापासून शिकविण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. देशात सर्वच पातळ्यांवर आढळणारा परकीय भाषांकडे पाहण्याचा संकुचित दृष्टीकोन आपण सोडून द्यायला हवा. परकीय भाषांच्या लोकशाहीकरणासाठी सामाजिक जाणिवांनी समृद्ध अशा शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, विदेशी भाषा शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे आणि व्यावहारिक उपयोजनासाठीचे पुस्तक शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित करणे, ही अभिनंदनाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाचा प्रकाशन विभाग हा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रगत व सक्रियपणे कार्यरत आहे. राजर्षी शाहू महाराजांविषयीचे खंड, ताराबाईकालीन कागदपत्रे यांच्यापासून ते तुकारामबोवांच्या गाथेपर्यंत अनेक दर्जेदार प्रकाशने शिवाजी विद्यापीठाकडून वाचकांना सादर करण्यात आली आहेत.

डॉ. उज्ज्वला बर्वे

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून यावेळी डॉ. उज्ज्वला बर्वे म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ज्ञानाच्या व जाणिवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी कोणतीही अतिरिक्त भाषा शिकायला हवी. ती भाषा परदेशीच असायला हवी, असे नव्हे; तर, आपल्या देशांतर्गतही अनेक भाषा आहेत. त्याही शिकायला हव्यात. भाषिक अस्मितांचे टोकदारपण टाकून देऊन या भाषा आत्मसात करायला हव्यात. भाषा आपल्यासाठी संस्कृतीची द्वारे खुली करतात. त्यातून आपले व्यक्तीमत्त्व निश्चितपणे अधिक विकसित होण्यास मदत होते.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात विदेशी भाषांच्या शैक्षणिक प्रसारामध्ये विदेशी भाषा विभागाने गेल्या ५० वर्षांत मोठे योगदान दिलेले आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत विदेशी भाषा पोहोचविण्यासाठी हायस्कूलमधील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठातर्फे दर्जेदार पुस्तकांच्या अनुवादाचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. त्या कामीही विभागाने विदेशी भाषांच्या अनुवादकांना सामावून घेऊन योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शीतल कुलकर्णी सूत्रसंचालन व स्वागत केले. डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका माळकर यांनी आभार मानले.

1 comment:

  1. या समारंभाची फित कुठे मिळेल? पुस्तक कसं मिळेल? नवीन उपक्रम - सहभागी होण्याजोगे - यांविषयी सुध्दा सांगावेत. धन्यवाद.

    ReplyDelete