Friday, 3 September 2021

शिक्षकांच्या सन्मानार्थ माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता निधी

संख्याशास्त्र अधिविभागात चार माजी शिक्षकांच्या नावे शिष्यवृत्तीची शिक्षक दिनी होणार सुरवात

 



कोल्हापूर, दि. ३ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता निधी संकलित करून विभागातील चार निवृत्त शिक्षकांच्या नावे होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी रोख रकमेच्या चार शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. या शिष्यवृत्ती योजनेस या शैक्षणिक वर्षापासून औपचारिक प्रारंभ करण्यात येत असून दर वर्षी शिक्षक दिनास (दि. ५ सप्टेंबर) शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल.

शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागाची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख शिक्षक- संख्याशास्त्रज्ञांमध्ये प्रा. एम.एस. प्रसाद, प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी, प्रा. एस.आर. कुलकर्णी आणि प्रा. बी.व्ही. धांद्रा यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८४ ते १९९५ या कालावधीत एम.एस्सी. व पीएच.डी. संशोधन पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकांच्या योगदानाच्या कायमस्वरुपी सन्मानस्मृती जपण्याच्या भावनेतून त्यांच्या नावे चार विविध शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा कृतज्ञता निधी उभारला. हा निधी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आला असून त्या निधीच्या व्याजामधून अधिविभागात एम.एस्सी. प्रथम व द्वितिय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकी दोन या प्रमाणे चार होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० रुपयांची शिष्यवृत्ती दर वर्षी शिक्षक दिनास प्रदान करण्याचे ठरविले. प्रा. एम.एस. प्रसाद शिष्यवृत्ती, प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी शिष्यवृत्ती, प्रा. एस.आर. कुलकर्णी शिष्यवृत्ती आणि प्रा. बी.व्ही. धांद्रा शिष्यवृत्ती अशी या शिष्यवृत्तींची नावे आहेत. संबंधित विद्यार्थ्यास किमान ५५ टक्के गुण (प्रथम वर्षाच्या बाबतीत प्रवेश परीक्षेतील गुण आणि द्वितिय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील गुण) असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अन्य कोणतीही रोख शिष्यवृत्ती वा फेलोशीप घेतलेली असू नये, एवढीच अट त्यासाठी आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अधिविभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. अन्य दोन सदस्य हे अधिविभागातील शिक्षकांमधील असतील. ही माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. (श्रीमती) एच.व्ही. कुलकर्णी व माजी विद्यार्थी समिती समन्वयक डॉ. सोमनाथ पवार यांनी दिली.

 

माजी विद्यार्थ्यांचे स्वागतार्ह व अनुकरणीय पाऊल: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, नूतन विद्यापीठ कायद्यामध्ये त्याचप्रमाणे नॅकच्या मूल्यांकन निकषांमध्येही विभागाच्या, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान, सहकार्य कशा प्रकारे प्राप्त होते, या बाबीला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, संख्याशास्त्र अधिविभागाच्या सन १९८४ ते १९९५ या कालखंडात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उचललेले शिष्यवृत्तीचे हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आणि अनुकरणीय स्वरुपाचे आहे. या माध्यमातून संख्याशास्त्र अधिविभागाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदरभाव जपला जाईलच, शिवाय, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगली आर्थिक मदतही होईल. या निमित्ताने संख्याशास्त्र अधिविभागाच्या अन्य बॅचच्या विद्यार्थ्यांनीही पुढे येऊन आपले योगदान द्यावे. तसेच, अन्य अधिविभागांनी, महाविद्यालयांनी अशा प्रकारे आपल्या माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

No comments:

Post a Comment