Monday, 15 August 2022

दिवंगत कन्येच्या स्मरणार्थ मारुलकर दांपत्याकडून विद्यापीठास ३५ लाख

 

कै. अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ ३५ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना माजी सहाय्यक कुलसचिव पंडित मारुलकर, रजनी मारुलकर आणि त्यांचे कुटुंबिय व स्नेही. सोबत (डावीकडून) डॉ. (श्रीमती) एस.एच. ठकार, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. धनंजय सुतार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. विलास शिंदे, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. केदार मारुलकर, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. अजितसिंह जाधव, अभय जायभाये आदी.


देणगीमधून साकारणार संशोधक विद्यार्थिनींचे वसतीगृह

कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: अत्यंत सुदृढावस्थेत जन्मलेली एक बालिका अचानक ताप येण्याचे निमित्त होऊन वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच विकलांग, इंद्रियशिथिल बनते... आणि आई-बापाचा तिला पूर्ववत करण्याचा संघर्ष सुरू होतो... हे मूल आता बरे होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती एक दिवस सामोरी येते... त्या वस्तुस्थितीसह ते तिला जीवापाड सांभाळतात... आपल्या माघारी तिच्या आयुष्याची तरतूद म्हणून पै न पै जोडून ३५ लाख रुपयांची बचत करतात... मात्र, वयाच्या ४५व्या वर्षी ती मुलगी अखेरचा श्वास घेते... तिच्या जाण्याने कोलमडून पडलेले हे दांपत्य त्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा एक अतिशय मोठा निर्णय घेते... आणि त्या मुलीचेच असणारे ३५ लाख रुपये तिच्याच स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाला प्रदान करतात... आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा हृद्य सोहळा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सर्वच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडून आला... या निधीमधून आता विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थिनींसाठीचे वसतीगृह साकारले जाणार आहे...

कोल्हापूर येथील पंडित सदाशिव मारुलकर आणि सौ. रजनी पंडित मारुलकर हे या ज्येष्ठ दांपत्याचे नाव आणि अस्मिता पंडित मारुलकर ही त्यांची दिवंगत कन्या!

श्री. मारूकर हे १९६८ ते १९९९ या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत होते. सहाय्यक कुलसचिव पदावरून ते निवृत्त झाले. त्यांची कन्या अस्मिता तीन वर्षांची असताना तापाचे निमित्त होन अंथरूणाला खिळली. तिच्या शरीराचे नियंत्रण करणारे मेंदूतील केंद्र निकामी झाले. केवळ दृष्टी, श्रवण आणि बुद्धीमत्ता एवढेच कायम राहिले. १९ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ४व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. आपल्या माघारी तिची हेळसांड होऊ नये, यासाठी या दांपत्याने पै न पै साठवून ३५ लाख रुपयांची बचत केली. मात्र, आता मुलगीच न राहिल्याने तिचाच अधिकार असलेल्या रकमेचा विनियोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करण्याचा निर्णय मारुलकर दांपत्याने घेतला.

सौ. रजनी आणि पंडित मारूकर या दांपत्याने अस्मिता हिच्या स्मृती शिवाजी विद्यापीठामध्ये कायमस्वरुपी जतन केल्या जाव्यात, यासाठी तिच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास ३५ लाख रुपये इतकी रक्कम विनाअट देणगीरूपाने आज प्रदान केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज विद्यापीठाच्या वतीने या निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मारुलकर कुटुंबियांनी ज्या भावनेतून हा निधी विद्यापीठास प्रदान केला, तिचा आदर राखून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनींसाठी प्रस्तावित असलेल्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी या निधीचा विनियोग करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे वसतीगृहाच्या प्रथम मजल्यावर सौ रजनी पंडीत मारूकर आणि पंडीत मारूकर यांनी कन्या अस्मिता हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून या मजल्याचे बांधकाम झालेशी कोनशिला दर्शनी भागात बसविण्यात येईल, असेही सांगितले. मारुलकर दांपत्याने या देणगीद्वारे दातृत्वाचे एक महान उदाहरण जगासमोर ठेवले आहे, असे गौरवोद्गारही कुलगुरूंनी काढले.

मारुलकर दांपत्यास विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली द्विखंडीय तुकारामबोवांची गाथा प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या प्रसंगी मारुलकर यांची विद्यापीठीय सेवेमधील चोख कामगिरी आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर असलेल्या वृत्तीचा गौरव केला.

यावेळी मारुलकर यांनी, हा निधी अस्मिताचा आहे. तो केवळ तिच्या वतीने आम्ही विद्यापीठास सुपूर्द करीत आहोत. त्याचा विद्यापीठाने योग्य कारणास्तव विनियोग करावा, अशी निरलस अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह अधिकारी व मारुलकर कुटुंबियांचे स्नेही व नातेवाईक उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment