दक्षिण कोरिया आणि जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये निवड
कोल्हापूर, दि. २४ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील सात विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियामधील तर एकाची जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे.
शरद सुनील माने (रा. कोळोली, कोल्हापूर) यांची जपानमधील ओसाका विद्यापीठ (जागतिक क्रमवारी ६८) येथे निवड झाली आहे. जिनेश ललितकुमार चौहान (रा. कोल्हापूर) यांची कोरिया विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ७४), धनंजय दत्तात्रय कुंभार (रा. सुळगांव, बेळगांव) यांची ग्योंगसांग राष्ट्रीय विद्यापीठ, जिंजू (जागतिक क्रमवारी ३०१), ओमकार येल्लोसा पवार (रा. कोल्हापूर) आणि ज्ञानेश्वर हिंदुराव घाटगे (रा. चिंचवाड, कोल्हापूर) यांची जीऑनबुक राष्ट्रीय विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ५५१), पवन मल्लेशाम कोडम (रा. सोलापूर) यांची चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठ, योंगबोंग (जागतिक क्रमवारी ७५१), चंद्रशेखर संभाजी पाटील (रा. कुरणी, कोल्हापूर) यांची जेजू राष्ट्रीय विद्यापीठ, जेजू (जागतिक क्रमवारी १००१) आणि योगेश दादासो डांगे (रा. आष्टा, सांगली) यांची गॅचोन विद्यापीठ, सेओंगनाम, दक्षिण कोरिया येथे भरघोस विद्यावेतनासह निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी बी.एस्सी.- एम.एस्सी. नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पूर्ण केलेला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. किरणकुमार शर्मा व सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment