Thursday, 1 September 2022

कोल्हापुरात प्रथमच ‘सेन्चुरी पाम’ला फुलोरा

वनस्पतीविश्वातील सर्वात मोठा फुलोरा शिवाजी विद्यापीठाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये

 


शिवाजी विद्यापीठाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमधील सेंच्युरी पामला रोपणानंतर २४ वर्षांनी प्रथमच फुलोरा आलेला आहे.

कोल्हापूर, दि. १ सप्टेंबर: सेंच्युरी पाम या ताडाच्या प्रजातीस सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात एकदाच येणारा फुलोरा हा वनस्पतींच्या विश्वामध्ये सर्वाधिक मोठा आणि तितकाच दुर्मिळ फुलोरा म्हणून ओळखला जातो. शिवाजी विद्यापीठाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्येही या प्रजातीचे ताड २४ वर्षांपूर्वी लावण्यात आले असून यंदा त्या वनस्पतीस मनमोहक फुलोरा आलेला आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ व वनस्पतीप्रेमी यांना हा दुर्मिळ नजारा पाहण्याची ही एक संधीच आहे. ही माहिती ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांनी आज येथे दिली.

डॉ. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्चुरी पाम या वनस्पतीचे कोरिफा अम्राकुलीफ्लोरा (Corypha umbraculiflora) असे शास्त्रीय नाव आहे. सेन्चुरीऑन ट्री, तालेपाम, तालापॉटपाम, ताडपत्री अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. जगात आशिया व ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कोरीफाच्या पाच प्रजाती आढळतात. त्यातील तीन प्रजाती भारतात आढळतात. कोरिफा अम्राकुलीफ्लोरा हा एक देखणा विशाल ताड आहे. तो दक्षिण भारतातील घनदाट जंगलांमध्ये वाढतो. उडुपीजवळील याना येथील जंगलांमध्ये याचे अनेक वृक्ष पाहावयास मिळतात. या ताडाच्या सेन्चुरी पाम या इंग्रजी नावावरून याचे आयुष्य शंभर वर्षे आहे, असा समज आढळतो. परंतु प्रत्यक्षात या ताडाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे आयुष्य २५ ते ८० वर्षापर्यंत असते. या वृक्षाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला २५ ते ८० वर्षांमध्ये केव्हाही फुलोरा येतो. हा फुलोरा वनस्पती विश्वातील सर्वात मोठा मानला जातो. तो ४ X ४ मीटर एवढा असतो आणि त्यामध्ये लाखो फुले बहरतात. त्याच्या बिया तयार झाल्यानंतर वृक्ष वठून जातो. याला मोनोकार्पी (Monocarpy) असे म्हणतात. सन १९९८ मध्ये सावंतवाडी येथील सेंच्युरी पामला फुलोरा आला होता. त्या वर्षी त्याच्या बिया गोळा करून शिवाजी विद्यापीठ आणल्या गेल्या. विद्यापिठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये त्यांची रोपे तयार करण्यात आली. त्यांचे या बागेतच रोपण करण्यात आले. यावर्षी त्या ताडांपैकी एक वृक्ष आज तब्बल २४ वर्षानंतर फुलोऱ्याला आला आहे. करवीर नगरीमध्ये प्रथमच सेन्चुरी पामचा ऐतिहासिक फुलोरा वनस्पतीशास्त्र विभागाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये बहरला आहे. वृक्षप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.

सेन्चुरी पाम हा स्वदेशी, विशाल व मोहक स्वरुपाचा ताड असून कोणत्याही उद्यानामध्ये सर्वांसाठी तो आकर्षणबिंदू असतो. हा वृक्ष सहजतेने वाढवता येतो. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत नाही. हा ताड उष्णकटिबंध व समशितोष्ण कटिबंधामधल्या वातावरणात सर्व प्रकारच्या जमिनींत योग्य पाणीपुरवठ्याने वाढवता येतो. या दुर्मिळ व डौलदार ताडाची मोठ्या उद्यानामध्ये लागवड केल्यास तो बागेची आणि शहराची शोभा वाढवितो. त्यासोबत या ताडाचे संवर्धनही होऊ शकेल, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.

 

बहुपयोगी सेंच्युरी पाम...

पूर्वी दक्षिण व दक्षिणपूर्व आशियामध्ये या ताडाची पाने हस्तलिखितासाठी वापरली जात असत. फिलीपाईन्समध्ये याच ताडाला बुरी किंवा बुखी या नावाने ओळखले जाते. याची पाने घराचे छत शाकारण्यासाठी वापरली जातात. या ताडामधून येणाऱ्या रसापासून वाईनही बनवली जाते. याची पाने हस्तलिखितासाठी वापरता येतात. पावसाळ्यामध्ये स्थानिक लोक ताडाच्या पानांची छत्री करून वापरतात. अरब देशांमध्ये याच्या कठीण बियांपासून गळ्यामध्ये अलंकार म्हणून घालण्याच्या माळा बनवल्या जातात.

No comments:

Post a Comment