Friday, 9 September 2022

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के


कोल्हापूर, दि. ९ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले. डॉ. शिर्के  उद्या, शनिवारी (दि. १०) मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

डॉ. शिर्के यांना गेल्या ३५ वर्षांचा शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी विद्यापीठाशी निगडित सर्व अधिकार मंडळांसह कुलसचिव, प्र-कुलगुरू पदे भूषविली आहेत. 

या निवडीबद्दल डॉ. शिर्के यांनी, कुलपती श्री. कोश्यारी यांचे आभार मानले असून कुलपतींनी केलेली निवड ही सुखद धक्का देणारी असून त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न राहील. या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण या कार्यकाळात प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे-

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के यांनी कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून पदवी (१९८५) आणि शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी अधिविभागातून पदव्युत्तर (१९८७) शिक्षण पूर्ण केले. 'सी.एस.आय.आर.'चे संशोधन फेलो म्हणून ते सांख्यिकी अधिविभागात १९८७मध्ये रुजू झाले आणि त्यानंतर सन १९९०मध्ये सांख्यिकी अधिविभागात अध्यापक म्हणून रुजू  झाले. सन २००५ ते २०१५ या कालावधीत सांख्यिकी अधिविभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांना सुमारे ३० वर्षांचा अध्यापनाचा आणि ३३ वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे ७५हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. विविध राष्ट्रीय निधी एजन्सीद्वारे अर्थसहाय्यित असे पाच संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. त्याच्या सक्षम मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएचडी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांनी ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे तर सहा आयोजित केल्या आहेत. एक उत्कृष्ट संशोधक म्हणून त्यांनी भारतासह अन्य देशांतील विविध परिषदा, कार्यशाळा, रिफ्रेशर आणि ओरिएंटेशन अभ्यासक्रमांमधून व्याख्याने दिली आहेत. शैक्षणिक व संशोधनपर उपक्रमांसाठी त्यांनी भारतासह यूएसए, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर आणि मलेशिया आदी देशांचा दौरा केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून त्यांचे देशातील आणि बाहेरील देशांसमवेत त्यांचे संशोधन सहकार्य आहे.

शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच त्यांचा प्रशासकीय अनुभवही वैविध्यपूर्ण आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रभारी कुलसचिव, रुसाचे संस्थात्मक समन्वयक, विद्यापीठ-उद्योग संपर्क कक्षाचे समन्वयक, यूजीसी-एसएपी, इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्सचे समन्वयक आदी पदांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, वित्त व लेखा समिती, अर्थसंकल्प समिती, आयक्यूएसी यांच्यासह अनेक अधिकार मंडळांवर त्यांनी काम केले आहे. अलीकडेच त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून तीन वर्षे काम केले आहे.

त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय योगदानाची दखल घेऊन सन २०११ मध्ये शिवाजी विद्यापीठाने त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केले. अंगभूत कार्यकुशलतेच्या बळावर त्यांनी विविध पुरस्कार व फेलोशिप प्राप्त केल्या आहेत. विद्यार्थी दशेतही त्यांनी राज्य सरकार शिष्यवृत्ती, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केल्या आहेत. विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवर ते विद्यापीठात सर्वप्रथम आले आहेत. या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पात्रतेच्या गौरवादाखल त्यांना दोन वेळा जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड पुरस्कार व भारतीय विज्ञान अकादमीचे समर रिसर्च फेलो म्हणून गौरविण्यात आले.

ते नेदरलँड्सच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्थेचे निर्वाचित सदस्य आहेत तसेच सांख्यिकी क्षेत्रातील अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य आहेत.


No comments:

Post a Comment