Wednesday, 21 September 2022

'महाराणी जिजाबाई: कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या' ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

 

शिवाजी विद्यापीठात 'महाराणी जिजाबाई: कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या' या पुस्तकाचे प्रकाशन करताना संयोगिता राजे छत्रपती आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) लेखिका डॉ. विजयाराणी पाटील, डॉ. रमेश जाधव आणि डॉ. भारती पाटील.


 

कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर - शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने 'महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संयोगिता राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते विद्यापीठाच्या वस्तू संग्रहालयात पार पडला.

करवीरच्या छत्रपती जिजाबाई या छत्रपती ताराराणी यांच्या स्नुषा. त्यांनी कोल्हापूर राज्याचे संरक्षण केले, काही कुणबीनींणा प्रशासनाची जबाबदारी दिली, त्यांनी सती बंदीचा कायदा केला. परंतु, अशा या कर्ऱ्तत्ववान जिजाबाई यांच्या बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक आज शिवाजी विद्यापीठात प्रकाशित झाले. डॉ. विजयाराणी पाटील यांनी सदरचे पुस्तक लिहीले असून ते आज छत्रपती संयोगिताराजे यांच्या हस्ते प्रकाशित झाले.

सुरवातीला शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी पुस्तक प्रकाशनामागील अध्यासनाची भुमिका स्पष्ट केली. दडलेल्या परंतू कर्तत्ववान स्त्रिया समाजापुढे आणणे हे शारदाबाई पवार अध्यासनाचे व्रत आहे, असे त्या म्हणाल्या.

छ. संयोगिता राजे म्हणाल्या की, छत्रपती ताराराणी यांनी कोल्हापूर संस्थानाची स्थापना केली. परंतु, कोल्हापूर राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी मात्र छ. जिजाबाईंनी पार पाडली. डॉ. विजयाराणी पाटील यांनी हे पुस्तक प्रकाशन करुन अतिशय भरीव काम केल्याचेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रमेश जाधव यांनी सदरचे पुस्तक प्रकाशित करुन लेखिकेने करवीर संस्थांनाच्या इतिहासात मोलाची भर घातली असून माहिती उपलब्ध नसलेल्या विषयावर पीएच.डी. करुन डॉ. विजयाराणी पाटील यांनी मोठे धैर्य दाखवले आहे, असे कौतुकोद्गार काढले.

अध्यक्षीय समारोपात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, की सदर ग्रंथाचा इंग्रजीसह अन्य भाषांत अनुवाद झाल्यास छ. जिजाबाईचे कार्यकर्तृत्व सर्वदूर पोहचेल.

सुस्मिता खुटाळे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. नेहा वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. एस. एन. पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment