कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील विविध अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्याकडून सलग पाच वर्षासाठी (सन २०२२ ते २०२७) मान्यता प्राप्त झाली आहे. ही माहिती कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली.
कुलगुरु डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजीसीकडून मान्यता मिळालेल्या अभ्यासक्रमामध्ये बी.ए., बी.कॉम., एम.ए., भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्र (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र) एम.कॉम. एम.एस्सी. (गणित) या पदवी व पदव्युत्तर विषयांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ८६ अभ्यास केंद्रामध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेशित होता येणार आहे. विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in
या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/
या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा. असे आवाहनही कुलगुरु डॉ. शिर्के यांनी केले.
दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील एकूण बारा अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे आणि विद्यापीठातील विविध अधिकार मंडळे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे सांगून कुलगुरु डॉ. शिर्के यांनी आवाहन केले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी नियमित व दूरस्थ पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment